सुधाकर रेड्डींचा पर्रीकर सरकारवर आरोप
अखिल भारतीय कॉंग्रेस सचिव तथा प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी सुधाकर रेड्डी यांनी गोवा सरकारने खनिज व्यवसाय बंद करून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या जनतेला उघड्यावर टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच पर्रीकर सरकारचे पितळ आता उघडे पडू लागले असल्याने हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावाही रेड्डी यांनी केला आहे.
बायणा-वास्को येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील मतप्रदर्शन केले. पर्रीकर सरकारचे आजपर्यंतचे एकही धोरण स्पष्ट नसून त्यांनी गोमंतकीय जनतेची प्रत्येक वेळी दिशाभूल केल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर हेही उपस्थित होते.
मुरगाव गट कॉंग्रेस पक्षातर्फे प्रभाग १ व २ मधील कार्यकर्त्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, प्रभाग ३ व ४ मधील कार्यकर्त्यांसाठी माजी नगरसेविका शांती मांद्रेकर यांच्या निवासस्थानी, प्रभाग ५ व ६ मधील कार्यकर्त्यांसाठी जेटी गणपती मंदिर व ७ व ८ मधील कार्यकत्यांंसाठी बायणा येथील काझा बेला इमारतीवर आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले.
शिरोडकर यांनी आपल्या भाषणात लाडली लक्ष्मी आणि गृह आधार योजना अर्ज वितरणामध्ये गोव्यातील पर्रीकर सरकार भेदभाव करीत असल्याचा आरोप केला. मतदारांच्या घरावर स्टिकर चिकटावून मतदारांमध्ये वेगळेपणा दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शिरोडकर यांनी यावेळी केले. पक्षाचे प्रवक्ते सुदीप ताम्हणकर यांनीही आपल्या भाषणात पर्रीकर सरकावर टीका केली. खासदार फ्रान्सिस सार्दिन तसेच सरचिटणीस संकल्प आमोणकर यांचीही यावेळी भाषणे झाली.

