राज्य व केंद्र सरकार गोव्यातील कायदेशीर खाणी सुरू करण्याच्या बाबतीत अनास्था दाखवीत असल्याचा आरोप करून खाण मंचने पुन्हा रस्त्यावर उतरण्याचे ठरविले असून दि. १५ पासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे धरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयटक नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यातील चार ते पाच लाख लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले. या धरणे आंदोलनात ट्रक मालक, यंत्रसामुग्री मालक, बार्ज मालक, खाण कामगार आदी सर्व घटक सहभागी होणार असून गोव्याच्या या गंभीर प्रश्नाकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठीच धरणे आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे फोन्सेका यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील खनिज निर्यात करण्यासही पर्यावरणवाले विरोध करतात. त्याचप्रमाणे ट्रक मालकांना पॅकेज देण्यासही त्यांची हरकत असल्याचे सांगून ट्रक मालक संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश देसाई यांनी पर्यावरणवाद्यांवर यावेळी प्रखर टीका केली.

