गोव्यातील २ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी जर आपल्याला येथे खाण व्यवसाय नको असा कौल दिला तर हा व्यवसाय बंद करण्यास आपली कोणतीच हरकत नाही. त्यासंदर्भात आपण राज्यातील एनजीओना आव्हान देत असल्याचे खाण उद्योजक अवधूत तिंबलो यांनी काल एका मुलाखतीद्वारे जाहीर केले.
या विषयावर जनमत कौल घ्यावा व २ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी खाणी नको असा कौल दिला तर त्यासाठी आपण तयार आहे असे ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. खाण उद्योग हा भारतातील सर्वात स्वच्छ उद्योग आहे. या व्यवसायाद्वारे सर्वाधिक कररूपी महसूल सरकारला मिळतो. या व्यवसायामुळे सर्वात कमी धूळ निर्माण होते. ही धूळही अपायकारक नाही. या व्यवसायामुळे विकास व पर्यावरण याचा समतोल राखला जातो असा दावा तिंबलो यांनी केला.
आज जर मला कोणी खाण उद्योगात उतरण्यास सांगितले असते तर मी या व्यवसायात प्रवेश केला नसता असेही ते म्हणाले. खाण व्यवसायासंदर्भात पणजी, म्हापशात राहून आपल्याला कोणी प्रवचने देऊ नये असे त्यांनी सुनावले.
चांगल्या खाण व्यवसायासाठी आम्हाला केंद्राकडून ३ हजार कोटी रुपये मिळायला हवेत. तसे झाल्यास स्वीडनपेक्षा गोव्यात चांगला खाण उद्योग निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.