सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील खाणींवर बंदीचे संकट आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यासंबंधी तोडगा काढण्यासंबंधी आपण खाणींशी संबंधित सर्व घटकांशी बोलणी करणार असून आज बुधवारी खाण परिसरातील सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांनी सांगितले.
खाणींसंबंधी आपण नक्की काय करणार आहे हे आत्ताच सांगू शकत नाही.
त्यासंबंधी माझी स्वत:ची अशी नक्कीच एक भूमिका आहे व त्यानुसार आपण योग्य तो निर्णयही घेऊ. पण त्यापूर्वीच विविध घटकांकडून मत आजमावणी करून घेणे हे शहाणपणाचे ठरणार आहे.
खाण परिसरातील सर्व आमदारांची आज आपण बैठक बोलावली असून ह्या विषयावर त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा करणार आहे. त्यानंतर खाण क्षेत्राशी संबंधित अन्य घटकांशी चर्चा करणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. खाणींचा लिलाव करणे हाच एक चांगला पर्याय आहे असे तुम्हाला वाटते काय, असे विचारले असता एक महिना थांबा. आपण योग्य काय तो निर्णय घेऊ असे पर्रीकर म्हणाले. दोन दिवसांपूर्वी मात्र पर्रीकर यांनी राज्यातील खाणींचा लिलाव करणे हाच एक चांगला पर्याय असल्याची प्रतिक्रिया दिली होती. लिलावासंबंधीच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत बदल झाला की काय असे वाटल्याने पत्रकारांनी त्यांना लिलावासंबंधी तुमचे काय म्हणणे आहे असे विचारले. सरकारातील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने राज्यातील खाणी गोव्यातील खाण मालकांच्याच ताब्यात असायला हव्यात अशी भूमिका घेतलेली आहे, असे त्यांच्या नजरेस आणून दिले असता ती त्यांची भूमिका आहे. असे पर्रीकर म्हणाले. माझेही एक मत आहे. पण आपण आता सर्व संंबंधित घटकांशी चर्चा करूनच योग्य काय तो निर्णय घेणार असल्याचे पर्रीकर यांनी काल स्पष्ट केले. खाणींचा लिलाव करणे व खाण महामंडळ स्थापन करून सरकारने खाणी स्वत:कडे ठेवणे ह्यापैकी कोणता पर्याय तुम्हाला चांगला वाटतो असे विचारले असता त्यानी मौन पाळणेच पसंत केले.

