खाजगी प्रवासी बसेसमध्ये नियमाची अंमलबजावणी नाही

0
68

महिलांसाठी राखीव आसनांचा प्रश्‍न

राज्यातील सार्वजनिक प्रवासी बसगाड्यांमध्ये महिलांसाठी १२ आसने आरक्षित करण्याच्या निर्णयाची सरकारने अंमलबजावणी केली असली तरी प्रत्यक्षात कदंब महामंडळाच्या बसेस वगळता अन्य खाजगी बसगाड्यांमध्ये या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

यासंबंधी वाहतूक संचालक अरुण देसाई यांच्याशी संपर्क साधला असता वरील निर्णयाचे सर्व बस मालकांनी काटेकोरपणे पालन करावे म्हणून वेळोवेळी अधिकार्‍यांना तपासणी करण्याचा आदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कदंब बसगाड्यांमध्ये महिलांना १२ आसने राखीव ठेवण्यात आले आहेत. परंतु काही बसमधील कंडक्टर महिलांच्या आसनांवर बसणार्‍या पुरुष प्रवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यास टाळटाळ करीत आहेत. काही पुरूष प्रवासी महिला प्रवाशांना जागा देण्यास राजी होत नाहीत, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे वाहतूक खात्याने कदंब तसेच खाजगी बसमधील कंडक्टरना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी महिला प्रवाशांची मागणी आहे.