बेतकी-खांडोळा येथे गुरुवारी सकाळी जीप व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात महादेव चंद्रकांत सावंत (43, बांदा-सावंतवाडी, सध्या रा. जुवारवाडा-तिवरे) या दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेले महादेव सावंत हे कुंडई येथील औद्योगिक वसाहतीत नोकरी करीत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-07-एव्ही-2312 क्रमाकांची दुचाकी कुंडई येथे जात होती. खांडोळा येथे अचानक दुचाकी चुकीच्या दिशेने गेल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीए-06-टी-1679 क्रमांकाच्या जीपला धडक बसली. त्यात गंभीर जखमी झालेल्या महादेव सावंत यांना जवळील बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; पण आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. म्हार्दोळ पोलिसांनी निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा केला असून, दुचाकी चालवताना डुलकी लागल्याने अपघातात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

