खलाशांना घेऊन येणारी आणखी दोन जहाजे संपर्कात ः मुख्यमंत्री

0
109

 

विदेशातून गोमंतकीय खलाशांना घेऊन येणार्‍या आणखी दोन जहाजांनी राज्य सरकारचे सचिव पी. एस. रेड्डी यांच्याशी संपर्क साधून बोलणी सुरू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

विदेशातून येणार्‍या जहाजावरील गोमंतकीय खलाशांचा क्वारंटाईन खर्च  जहाज मालकांनी देण्याची तयारी दर्शविली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई बंदरात असलेल्या कर्णिका बोटीच्या व्यवस्थापनाची जहाज महासंचालनालयाकडे बोलणी सुरू आहेत. तर, आंग्रिया ही बोट खलाशांना आणण्यासाठी पुन्हा रवाना झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

फार्मा कंपन्यांतील कामगारांबाबत

३ मे नंतरच निर्णय घेणार

राज्यातील फार्मा कंपन्यामध्ये काम करणार्‍या परराज्यातील नागरिकांना काम करण्यास मान्यता देण्याबाबत ३ मे २०२० नंतरच निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बुधवारी दिली.

खाणींसाठी प्रयत्न

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पर्यटन व्यवसायाला झळ पोहोचल्याने आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी खाण उद्योग सुरू करण्यास मान्यता मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न केला जात आहे. राज्यातील अनावश्यक खर्च कमी केला जाणार आहे. ग्रामपंचायत, नगरपालिकाच्या आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.