1 लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन आपकडून मुख्यमंत्र्यांना सादर; 15 दिवसांत रस्ते दुरुस्ती; मुख्यमंत्र्यांची माहिती
राज्यभरातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या विषयावरून आम आदमी पक्षाने काल पर्वरी येथील मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवेशद्वारावर अडवल्याने त्यांच्यात बरीच वादावादी झाली. वादावादीमुळे वातावरण बरेच तणावपूर्ण बनले होते. बराच वेळ उलटल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना मंत्रालयाच्या आवारात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर रस्त्यांच्या दुरवस्थेप्रकरणी सुमारे 1 लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर करण्यात आले.
आम आदमी पक्षाने गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी ‘बीजेपीचे बुराक’ नावाखाली एक सह्यांची मोहीम हाती घेतली होती. आपच्या कार्यकर्त्यांनी खराब रस्त्यांप्रकारणी सुमार 1 लाख नागरिकांच्या सह्या निवेदनावर घेतल्या होत्या. काल 1 लाख नागरिकांच्या सह्या असलेली निवेदने मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी एका वाहनात ठेवण्यात आली. त्यानंतर आपचे राष्ट्रीय समन्वयक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पणजीतील महालक्ष्मी देवस्थानजवळील आपच्या मुख्य कार्यालयाजवळून या वाहनाला पर्वरीच्या दिशेने मार्गस्थ केले.
आपच्या कार्यकर्त्यांनी 1 लाख सह्या असलेले वाहन घेऊन पर्वरी येथे मंत्रालयावर धडक दिली. पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांना पर्वरी येथे सचिवालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडविले. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बऱ्याच वेळानंतर आपच्या कार्यकर्त्यांना मंत्रालयाच्या आवारात प्रवेश देण्यात आला. आपचे सर्व कार्यकर्ते निवेदने असलेले वाहन घेऊन मंत्रालयात इमारतीजवळ एकत्र झाले. आपच्या सर्व कार्यकर्त्यांना मंत्रालयात प्रवेश देण्यावरून बराच वेळ पोलीस अधिकारी आणि आपचे कार्यकर्ते यांच्यातील वादावादीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर, आपच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांना भेटण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी खराब रस्त्यांबाबत निवेदन सादर केले. तसेच तातडीने रस्त्यांची दुरूस्ती करून वाहनचालकांना दिलासा देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, आमदार व्हेन्झी व्हिएगस, आमदार क्रूझ सिल्वा व इतरांची उपस्थिती होती.
भाजपकडून रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे केवळ आश्वासन दिले जात आहे. प्रत्यक्षात खड्ड्यांची दुरुस्ती केली जात नाही, असा आरोप आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केला.
राज्य सरकार जनेच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही. खराब रस्त्यांमुळे अनेकांनी जीव गमावला असून, अनेक जण जखमी झाले आहेत, असे आमदार व्हेन्झी व्हिएगश यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांची टीका
गोव्यातील तीन दिवसांच्या वास्तव्यात आपण येथील रस्त्यांवरील खड्ड्यांचा अनुभव घेतला आहे. गोव्यातील रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. भाजप सरकारने रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. गोव्यातील वाढत्या भ्रष्टाचारामुळे रस्ते काही दिवसांतच खराब होतात, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.
रस्ते दुरुस्तीचे काम सुरू : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, येत्या 15 दिवसांत ते पूर्ण होणार आहे, अशी माहिती पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना काल दिली.

