राज्य सरकारला 14 खनिज डंप लिलावातून सुमारे 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. राज्यातील सुमारे 25 खनिज डंपचा लिलाव केला जाणार आहे. त्यातील आत्तापर्यंत 14 खनिज डंपचा लिलाव करण्यात आला असून, पुढील आठवड्यात 14 जुलैला आणखी 6 खनिज डंपचा लिलाव केला जाणार आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक नारायण गाड यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
दक्षिण गोव्यातील 13 खनिज डंप आणि उत्तर गोव्यातील 1 खनिज डंपचा लिलाव पूर्ण झाला आहे. दक्षिण गोव्यातील खनिज पट्टे जैवसंवेदनशील विभागात येत असल्याने त्याचा लिलाव प्राधान्याने करण्यात आला आहे. या खनिज डंपसाठी कमी प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे. एका खनिज डंपसाठी सर्वाधिक 51 टक्के प्रीमियमची बोली लावण्यात आली आहे. या लिलाव प्रक्रियेतून सुमारे 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, असेही नारायण गाड यांनी सांगितले.
या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणि योग्य व्यवस्थापन राखण्यात आले आहे. खनिज डंप हाताळणीवर खाण विभाग आणि नियुक्त देखरेख संस्थेकडून लक्ष ठेवले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

