Home बातम्या खडकीत झोपडीला आग; कुटुंब बेघर

खडकीत झोपडीला आग; कुटुंब बेघर

0

शिवाजीनगर खडकी येथील अर्जुन आत्माराम परवार यांची राहती झोपडी जळून खाक झाली असून गरीब कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले आहे.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पती-पत्नी दोघेही कामानिमित्त बाहेर गेली होती. घरात केवळ दोघेच मुले होती. त्यावेळी झोपडीला आग लागली. झोपडीला आग लागल्याचे समजताच दोघेही मुले बाहेर पळाली. त्यामुळे दोघाही मुलांना कोणतीही इजा झाली नाही.

आग लागल्याची माहिती गावातील नागरिकांना मिळताच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसेच वाळपई अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, पण झोपडीचे छप्पर झावळांपासून बनवलेले असल्याने झोपडी जळून खाक झाली. स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर होत असल्याने त्या ठिणगीतून आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अर्जुन परवार याच्या झोपडीत असलेली सोनसाखळी, कपडे, भांडी व इतर सामानही आगीत जळाल्याने त्यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले असून राहण्यासाठी असलेला निवारा जाऊन कुटुंब उघड्यावर पडले आहे. मुलाचे कपडे व दफ्तरही आगीत जळाल्याने त्या कोवळ्या मुलांना शाळेत सुद्धा जात आले नाही. अर्जुन परवार यांची घरची परिस्थिती हलाखीची असून पती-पत्नी कष्ट करून मुलांना शाळेत जाण्यापासून चौघांचा पोटापाण्याचा खर्च एकत्र करण्यासाठी दोघंही धडपड करीत असतात, पण आता त्यांच्यावर उदरनिर्वाहाबरोबर निवारा कुठं घ्यावा याचे संकट उभे राहिले आहे. सरकारतर्फे मिळणारी मदत ही फाईली हातावेगळ्या केल्यानंतर मिळणार आहे. पण सद्यस्थितीत आसरा कुठे घ्यावा या विषयी अर्जुन परवार यांच्या कुटुंबापुढे प्रश्‍नचिन्हच आहे. दोघा पती-पत्नीने घाम गाळून झोपडी उभी केली होती पण आता ती झोपडीसुद्धा राहिली नाही. नियतीने त्यांना बेघर करून सोडले आहे. त्यांना आता निवार्‍याबरोबर मुलांचे भविष्य पुन्हा बांधायचे आहे त्यासाठी त्यांना सरकारबरोबच इतरही लोकांकडून आधाराची गरज आहे. कारण त्या मुलांना घालायला कपडे नसल्याने शाळेतही जाता येत नाही. शाळेत जाण्यासाठी पुस्तकेही नाहीत त्यामुळे अर्जुन परवार कुटुंबाला चिंता लागून राहिली ती भविष्याची.