- जनार्दन वेर्लेकर
सुमन कल्याणपूर हा आम्हा तमाम संगीतप्रेमी रसिकांच्या वाट्याला आलेला भाग्ययोग होता. त्यांचा वियोग शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला जाणवणार नाही. त्यांच्या सुरांचा परिमळ त्यांच्या नावासारखाच आमच्या कानांमनात दरवळत आहे- राहील…
सुमन कल्याणपूर गेल्या आणि केतकीच्या बनातला मोर नाच विसरला. एरव्ही घनभरल्या नभी गहिवरणारा, धीर सोडणारा, बरसणारा अशी त्याची ख्याती विसरून हिरमुसला. ‘जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते’ असा संकेत मीलनाचा देणाऱ्या प्रियकर-प्रेयसी आपला वादा विसरल्या. आपल्या लाडक्या छकुलीला ‘जुही की कली मेरी लाडली’ या शब्दसुमनांनी मायेची शाल पांघरणाऱ्या आया आपला कंठ रुद्ध झाल्यामुळे गायला विसरल्या, आणि प्रणयगंधात धुंद नायक-नायिका पुन्हा भेटायचा वादा करतानाही ‘ठहरिये, होश में आ लूँ, तो चले जाईयेगा। आपको दिल में बिठा लूँ, तो चले जाइयेगा!’ हे चिरतरुण द्वंद्वगीत गायचेही चक्क विसरल्या. अशी कितीतरी हिंदी-मराठी भावगीते, चित्रपट गीते, अंगाई गीते, अभंग, गझला आणि भक्तिरचना आपल्या मृदुल सुरांनी छेडणाऱ्या सुमनताई 31 मे 2026 रोजी देवाघरी गेल्या. त्या दीर्घायुषी होत्या हे आम्हा त्यांच्या लक्षावधी चाहत्यांचे अहोभाग्य! लतादीदी (93), आशाताई (93) तर सुमनताईंना 89 वर्षांची उमर लाभली. आशाताई गेल्याची जखम ताजी-ओली (निधन 12 एप्रिल 2026) असतानाच सुमनताई गेल्याच्या बातमीने जणू मन खिन्न झाले. लता-आशा-सुमन या तीन मराठमोळ्या गायिका याच क्रमाने संगीतविश्वाला अंतरल्या तरी त्यांचे नक्षत्रांचे देणे नेहमीच आमच्या श्रवणानंदाचे कायमस्वरूपी निधान आहे, हा दिलासा मोठा आहे.
मराठमोळ्या सुमनचा जन्म 28 जानेवारी 1937 चा. मात्र तिला कोकणी ही तिची मातृभाषा बोलता यायची नाही, कारण तिचा जन्म आजच्या कोलकाता शहराचा. सुविद्य, सुसंस्कृत, ललित कलांची आवड जोपासणाऱ्या. चित्रापूर सारस्वत कुटुंबात जन्मल्यामुळे हा वारसा जणू बाळकडूच म्हणून तिला लाभला. वडिलांचे नाव (पपा) शंकरराव हेमाडी तर आई सीताबाई. कलकत्ता येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडियामध्ये शाखाप्रमुख हे पद इंग्रजांच्या राजवटीत त्यांना प्राप्त झाले होते. कारण बहुतेक बँक अधिकारी आणि शाखाप्रमुख पदे गोऱ्या साहेबांनीच भूषवायची, हाच शिरस्ता होता. कलकत्त्याहून पपांची बदली ढाका या शहरात झाल्यामुळे कलकत्ता आणि ढाका येथे प्राथमिक शिक्षण बंगाली, इंग्रजी, हिंदी या भाषांतून झाले. या तिन्ही भाषांमध्ये त्या अस्खलीत बोलायच्या. कलकत्ता आणि ढाका या शहरांमध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्यसंग्रामाचा लढा उग्र होत चालला होता. त्यातच हिंदू-मुसलमान दंगे उद्भवत असत. हेमाडी कुटुंबाला या झळा बाधायला लागल्या आणि शंकररावांनी मुंबईत बदलीसाठी प्रयत्न सुरू केले. तशातच चितगाँव शहर बॉम्बस्फोटांनी हादरले. शंकररावांनी नाईलाजाने आपल्या कुटुंबाला मुंबईला धाडायचे ठरवले. ते वर्ष होते 1942. ‘चले जाव’ आंदोलनाची चळवळ जोरात सुरू होती. मुंबई रिकामी होऊ लागली होती. तसा हुकूमच निघाला होता. तालमकी वाडी, आनंदाश्रम वगैरे चित्रापूर सारस्वतांच्या खास वसाहती ओस पडल्या होत्या. म्हणून सीताबाई मुलींना घेऊन कुंदापूरला आपल्या वडिलांकडे गेल्या. नाती आजोबांना भेटल्या. आजोबा देवळाच्या वाठारांत उत्तम भजनं गात असत. छोटी सुमन त्या सुरांनी तल्लीन होऊन जाई. अखेर पपांची मुंबईत बदली झाली आणि तीन मुलींना घेऊन सीताबाई कुंदापूरहून मुंबईस परतल्या.
सेंट कोलंबा ही मुंबईची मुलींची पहिली शाळा. ग्रँट रोडला गावदेवी परिसरातली दगडी बांधणीची ही भव्य शाळा 1855 ची. या शाळेने साहित्य, संगीत, कला, नाट्य, राजकारण अशा विविध क्षेत्रांत अनेक गुणी व्यक्तिमत्त्वं दिली. या शाळेतच सीताबाई शिकलेल्या. सुमनला प्रवेश सहजगत्या मिळाला. पियानोवर नन् गाणं शिकवायच्या. हा तास तिच्या आवडीचा. पाश्चात्त्य प्रार्थना-संगीताचे संस्कार तिच्यावर झाले. मोरल सायन्सचा वर्ग तिला आवडायचा. गोष्टी देवांच्या-सैतानांच्या. आपण कुठल्या मार्गाने जायचं- देवाच्या की सैतानाच्या? एकाच वेळी संगीताचे सात सूर आणि जगात वावरताना प्रामाणिकपणा, सदाचार, सद्वर्तनाचे धडे ती शिकत गेली.
मुंबईत सुरुवातीला घरात रेडिओ नव्हता. शेजारच्या घरातून सूर कानी पडायचे. 1944 ला पपांनी रेडिओ आणला. सुमनला तो अल्लाउद्दिनचा जादूचा दिवाच वाटला. बटण फिरवताक्षणी नूरजहाँ, राजकुमारी, सुरैया, अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबालावाली यांची गाणी म्हणजे आवाजाची मुलायम दुनिया. पुढे मॉडेल हाऊसमध्ये 1948 च्या सुमारास ज्योत्स्नाबाई भोळे यांची नाट्यगीते ऐकायला मिळाली. विशेषतः ‘बोला अमृत बोला’ हे नाट्यपद. काय सुंदर तान ज्योत्स्नामावशींची! ‘अनमोल घडी’, ‘रतन’, ‘दिल्लगी’ची एकाहून एक सरस गाणी… ऐकून ऐकून पाठ व्हायची.
सुमनला चित्रकलेचाही छंद. ती चित्रकर्ती होणार असंच साऱ्यांना वाटायचं. शाळेत कुणीही आग्रह केला की ही नाजूक, हळुवार गोड गळ्याची मुलगी सहजगत्या गायला लागायची. मॉडेल हाऊसच्या वास्तव्यात तिच्या कलागुणांना वाव मिळाला. याच इमारतीत शिल्पकार डी. बी. जोग राहायचे. रविवारी घरातली मंडळी वामकुक्षी करीत तेव्हा सुमन जोगमामांच्या घरी टपके. ते चित्रं काढून देत. त्याबरहुकूम सुमन चित्रे काढी- रंगवे. नाटककार-दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर यांचा फ्लॅट याच इमारतीत. रांगणेकरांकडे भोळेकाका (संगीतकार केशवराव भोळे) आणि ज्योत्स्नामावशी (ज्योत्स्नाबाई भोळे) वरचेवर येत. शंकरराव, जोगमामा, रांगणेकर यांच्या गप्पा एकीकडे, तर दुसरीकडे जोगमामांच्या दरवाजात सीताबाई, जोगमामी आणि ज्योत्स्नाबाई यांच्या उभ्याउभ्या गप्पा रंगत.
सीताबाईंना गायनकलेबद्दल विलक्षण प्रेम. ज्योत्स्नाबाईंची गोड, सात्त्विक गायनशैली त्यांना आवडे. एकदा शाळकरी सुमन कुठलं तरी गाणं गुणगुणताना केशवराव भोळ्यांनी ऐकलं. म्हणाले, ‘व्वा! छान!’ सुमनने धिटाईने विचारलं, ‘मला शिकवाल का?’ त्यांनी आनंदाने होकार दिला. दर रविवारी ते सुमनला गाणं शिकवायला येऊ लागले. त्यांच्याच सांगण्यावरून पपांनी लेकीसाठी तानपुरा आणला. तानपुरा कसा लावायचा हे शिकवलं. त्या काळातली काही प्रसिद्ध भावगीतं, ज्योत्स्नामावशीची नाट्यपदं, ‘नाट्यमन्वंतर’ संस्थेच्या नाटकातली महत्त्वाची पदं शिकवून सुमनला सुरेल बनवलं. एका प्रेमळ, मर्मज्ञ संगीतकाराचे हे गानसंस्कार तिच्या भावी गानप्रवासाला प्रेरणादायी ठरले.
जोगमामांच्या सल्ल्यानुसार तिचं शालेय शिक्षण सुरू असतानाच चौदाव्या वर्षी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये प्रवेश घेतला. फाईन आर्टस्चं पहिलं वर्ष झालं. दुसऱ्या वर्षी ऑईल पेटिंग हा विषय अभ्यासाला होता. तो शिकताना रंगांमधल्या रसायनांची व टर्पेन्टाईनची भयंकर ॲलर्जी त्यांना सतावू लागली. त्यामुळे नाईलाजाने अभ्यासक्रम सोडून द्यावा लागला. गाण्याचा रियाज आणि प्रशिक्षण मात्र सुरू राहिलं. दहा-अकरा वर्षांची असताना वर्षभर ती कथ्थक नृत्यही शिकली. स्वतः पपा तिला देवधर स्कूलमध्ये घेऊन जायचे. नृत्याच्या मार्गदर्शनामुळे लयीचं भान आलं आणि पुढे गाताना त्याचा निश्चितच उपयोग झाला. ताल-लय-शब्द-सूर यांच्या सहयोगातून निर्माण होणाऱ्या गीतसृष्टीची मोहिनी मनावर आयुष्यभर गारुड करीत राहिली.
तावडेबुवांनी सुमनवर आरंभी शास्त्रीय संगीताचे विधिवत संस्कार केले. ते हेमाडींच्या घरी येऊन अतिशय निष्ठेने शिकवायचे. पण त्याचबरोबर सुगम-संगीताचे संस्कार होणेही आवश्यक होते. तशी संधी 1952 साली जुळून आली. प्रॉक्टर रोडवर आनंदाश्रम सारस्वत कॉलनीत यशवंत देवांचा गायनाचा क्लास होता. शब्दप्रधान सुगम-गायकीची मूल्यं कवी, संगीतकार आणि गुरू या तिन्ही भूमिकांतून ते अजमावीत होते. नवरंग नागपूरकर आणि खाँसाहेब उस्ताद अब्दुल रेहमान या दोन गुरूंनीही सुगम, उपशास्त्रीय आणि शास्त्रीय संगीत शैलीचं प्रशिक्षण दिलं. साधारणपणे 1951 सालापासून वार्षिक समारंभ, गणेशोत्सवात वगैरे होणाऱ्या कार्यक्रमांतून ती गायला लागली. लेकीला पेटीच्या साथीने घरात सराव करता यावा म्हणून पपांनी बाळ पार्टेंना पाचारण केलं. पुढे ते तिला कार्यक्रमातही साथ करू लागले.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या वार्षिक संमेलनात ती गायली. जहाँगीर हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात बाळ पार्टे यांनी तिला पेटीवर साथसंगत केली. तिच्या गायनाने जाणत्यांचं लक्ष वेधलं. डोंबिवलीत राहणाऱ्या आर्ट स्कूलच्या मंडळीनी संगीताचा एक कार्यक्रम डोंबिवलीत आयोजित केला. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध पार्श्वगायक तलत महमूद आले होते. त्यांना तिचा आवाज खूप आवडला. गाण्यांमधल्या जागा अचूक घेतल्याबद्दल आणि स्पष्ट शब्दोच्चाराबद्दल त्यांनी तिची मनापासून प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर एच.एम.व्ही.कडे तिच्या नावाची शिफारस केल्याचे तिला मागाहून कळले. त्या काळात एच.एम.व्ही.चे अधिकारी होते आद्य भावगीत गायक जी. एन. जोशी. त्यांनी तिच्या आवाजाची ट्रायल घेतली. ‘मुलीचा आवाज गोड आहे, पण अजून कोवळा आहे, तयार व्हायचा आहे’ असं त्यांचं मत पडलं.
काही काळानंतर चित्रपटसृष्टीशी निगडीत एका आयोजकांनी मधुबाला जव्हेरी, तलत महमूद व सुमन हेमाडी या कलावंतांचा संच घेऊन काश्मीर दौरा आयोजित केला. तिच्या आयुष्यातला हा पहिला यशस्वी दौरा. पुढे सुमनताईंनी देश-विदेशांत अनेक दौरे गाजवले. परदेशातल्या बी.बी.सी. (लंडन) आणि त्रिनिनाद येथील दौऱ्यात पहिल्या भारतीय पार्श्वगायिका म्हणून त्या चमकल्या.
चित्रपटासाठी पार्श्वगायनाची संधी त्यांना आयुष्यात अकल्पितपणे लाभली. एकदा मॉडेल हाऊसमध्ये नेहमीप्रमाणे शंकरराव (पपा), जोगमामा (शिल्पकार जोग) आणि केशवराव भोळे (भोळे काका) यांची मैफल रंगली होती. गप्पाष्टकात जोगमामांचे मेहुणे प्रभाकर रानडे हजर होते. बोलता बोलता सहज कुणीतरी म्हटलं, ‘आपल्याकडे नायिका (बेबी शकुंतला), गायिका (सुमन), संगीत दिग्दर्शक (केशवराव भोळे) आहे.’ प्रभाकर रानडे उद्गारले, ‘क्या बात है! मग चित्रपटच काढतो.’ चित्रपटाचं नाव ठरलं- ‘शुक्राची चांदणी.’ केशवराव भोळे यांनी संगीतकार म्हणून यशवंत देव यांचं नाव सुचवलं. गीतंही त्यांनीच रचली. 1953 साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा मुहूर्त आणि दादरला बॉम्बेलॅबमध्ये पहिल्या गाण्याचं ध्वनिमुद्रण सुमनताईंच्या आवाजात झालं. गाणं होतं- ‘प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे? मला हवे तेही आहे परि नको तेही आहे।’ ही ‘शुक्राची चांदणी’ कधी उगवलीच नाही. मात्र या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी योगायोगाने हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मुहम्मद शफी हजर होते. त्यांना सुमनताईंचा आवाज अतिशय आवडला. आणि ‘मँगू’ या हिंदी चित्रपटासाठी या नव्या गळ्याला संधी देण्याचं त्यांनी ठरवलं. ‘मँगू’ हा शेख मुख्तार प्रॉडक्शनचा अपराधपट होता. मुहूर्ताला लतादीदी आणि हेमंतकुमार हे दोघे आवर्जून हजर होते. ‘मँगू’ हा मुहम्मद शफी यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा होता. त्यांनी सुमनताईंकडून या चित्रपटासाठी लोरी गाऊन घेतली. गायनाला नवख्या गायिकेने दिलेला न्याय पाहून- खरे तर ऐकून- त्यांनी आणखी दोन गाण्यांसाठी सुमनताईंचा आवाज वापरला. त्यातलं एक तलतजींबरोबर द्वंद्वगीत होतं, तर दुसरं होतं- ‘चंदा संग तारे करे अटखेलियाँ.’ सहगायिका होत्या उषा मंगेशकर व सविता बॅनर्जी (संगीतकार सलिल चौधरी यांच्या पत्नी). ‘मँगू’च्या लोरीला तर हेमंतकुमार आणि बेला बोस यांचे आलाप होते. ‘मँगू’ची गाणी तयार झाली, पण दुर्दैवाने चित्रपटाचे संगीतकार बदलले. ओ. पी. नय्यर यांच्याकडे सूत्रं आली. फक्त लोरी तेवढी राहिली. अन्य दोन गाणी निकालात निघाली.
मात्र ‘मँगू’च्या सुमनस्वराची बातमी कणोपकर्णी झाली. दिग्दर्शक साहीद लतीफ यांच्या कानावर गेली. आणि पंधरवड्यातच त्यांच्या ‘दरवाजा’ या चित्रपटासाठी सुमनताईंना बोलावणं आलं. या चित्रपटाचे संगीत-दिग्दर्शक होते ‘नाशाद.’ हा चित्रपट ‘मँगू’च्या आधीच प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांची दोन सोलो गीतं होती. पहिलं शायर खुमार यांनी रचलेलं ‘आग लगे इस सावन में’, तर दुसरं मजरूह सुलतानपुरी यांनी रचलेलं ‘छूटे तुमसे तो चले हम.’ यातलं सुमनताई व तलत महमूद यांनी गायलेलं द्वंद्वगीत ‘एक दिल दो है तलबगार’ चांगलंच लोकप्रिय झालं. यानंतर मात्र चित्रगुप्त, रोशनजी अशा संगीतकारांनी त्यांना पार्श्वगायनाची संधी दिली.
कारकिर्दीच्या आरंभीची पाच वर्षे ती दुय्यम गटात मोडतील अशा छोट्या बॅनरच्या चित्रपटांसाठी गायल्या. कारण तो त्यांच्या उमेदवारीचा कालखंड होता. 1958 साली त्या तब्बल 13 चित्रपटांसाठी गायल्या. संगीतकार बुलो-सी-रानी, एस. एन. त्रिपाठी, ज्ञानदत्त, जमाल सेन, हंसराज बहल, बी. एन. बाली, एन. दत्ता, अजित मर्चंट, सुरेश तलवार, शिवराम, निस्सार, सुधीर फडके यांच्याकडे त्यांनी पार्श्वगायन केले.
1960 पासून त्यांची कारकीर्द अधिकाधिक बहरत गेली. रवी, रोशन, हेमंतकुमार, सी. रामचंद्र, शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रॉबिन बॅनर्जी, उषा खन्ना, दत्ताराम, वसंत देसाई, राजेश रोशन, एस. डी. बर्मन, सलिल चौधरी, नौशादजी, सी. रामचंद्र, मदनमोहन यांनीही त्यांना पार्श्वगायनाचे दरवाजे खुले केले. संगीतकार खय्याम यांनी त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांतून त्यांना संधी दिली.
चित्रपट संगीतापलीकडेही उत्तम गझलगायन, कृष्णगीते, मीरा-सूरदास यांची भजने, बंगाली पूजागीतं, गुजराती व पंजाबी विवाहगीतं असा त्यांचा संगीताचा वैविध्यपूर्ण ऐवज आहे.
27 एप्रिल 1958 रोजी सुमन हेमाडी यांचा विवाह नंदाजी कल्याणपूर यांच्याशी झाला. चित्रापूर सारस्वत समाजाचेच नंदाजींचे थोरले बंधू दत्तात्रय मोठे धडाडीचे उद्योजक होते. मोटार स्पेअर पार्टस्चा उद्योग त्यांनी कष्टाने सुरू केला आणि देशभर या व्यवसायात आपला जम बसवला. 1952 साली त्यांना देवाज्ञा झाली. नंदाजी आणि धाकटे बंधू जयवंत यांनी व्यवसायाचा व्याप वाढवला आणि भावाच्या मागे नंदाजींनी वहिनी आणि पाच मुलं यांची जबाबदारी प्रेमाने आपल्या खांद्यावर घेतली. कल्याणपूर कुटुंब मोठं. नंदाजींना पाच भाऊ आणि तीन बहिणी. सर्वात मोठ्या परमपूज्य कलावती देवी (ज्यांचे अनुयायी संख्येने खूप व केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आहेत).
सुमनताईंचाही माहेरचा कुटुंबकबिला मोठा. एकूण पाच बहिणी आणि एकुलता भाऊ ज्ञानेश मिळून सहा. पाठची बहीण उषा, गायिका बहीण श्यामा चित्तार, शिवाय उषा, मुक्ता आणि एक सावत्र बहीण सुमित्रा- सर्वात थोरली मुलगी म्हणून मित्राक्का. मात्र कुटुंबात सख्खी-सावत्र हा भेद नव्हता.
लग्नानंतर तब्बल आठ महिने सुमनताई संसारात रमल्यामुळे पार्श्वगायन थांबलं. मात्र नंदाजींसहित सगळ्यांनी तगादा लावला की, सुमनताईंनी पार्श्वगायन थांबवू नये. सुमनताईंच्या संगीतप्रवासात पप्पा पहाडासारखे तिच्या पाठीशी असायचे. ती जागा आता नंदाजींनी घेतली. पत्नीच्या ध्वनिमुद्रणाला ते जातीने हजर राहू लागले. व्यावसायिक तापव्यापांतून तिला कष्ट होऊ नयेत म्हणून पैशाच्या व्यवहारात तिला रसच नसल्यामुळे ती बाजू त्यांनी शर्थीने सांभाळली.
लग्नानंतर 7 वर्षांनी नंदाघरी पाळणा हलला. एकुलत्या लेकीचा- चारूलताचा- जन्म झाला. ती कुटुंबाची लाडकी चारूल. पेशाने ब्युटी थेरापिस्ट. तिचे पती नामवंत कार्डिॲक सर्जन डॉ. मनोज अग्नी. नातवंडं अविनाश आणि ऐशानी. असं सुमनताईंचं घराचं गोकुळ- नंदनवन.
दशरथ पुजारी, यशवंत देव, वसंत प्रभू, स्नेहल भाटकर, वसंत पवार, श्रीनिवास खळे, बाळ पळसुले, विश्वनाथ मोरे, राम कदम अशा संगीतकारांनी सुमनताईंचं भावगीत-भक्तिसंगीताचं दालन समृद्ध केलं. यांतील दोन नावे विशेष महत्त्वाची. कमलाकर भागवत आणि संगीतकार अशोक पत्की.
सुरुवातीला अशोक पत्की सुमनताईंना बाळ पार्टे यांच्यानंतर दौऱ्यांत आणि देश-विदेशांतील कार्यक्रमांतून त्यांना पेटीवर साथसंगत करायचे. पत्कींच्या चाली ऐकून सुमनताई सुखावल्या. त्यांनी पत्कींच्या चालीचं सोनं केलं. ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ ही अवीट गोडीची चाल पत्कींची. पत्की- कमलाकर भागवत- सुमनताई हा त्रिवेणी सूरसंगम ही आम्हा रसिकांच्या मर्मबंधातली ठेव.
आमच्या गोमंत विद्या निकेतन संस्थेमध्ये अशोक पत्की रजनी होती. डॉ. अजय वैद्य सूत्रसंचालनाची धुरा निभावत होते. पत्कीसरांना एक संवादिनी हवी होती. मी त्यांना म्हणालो, ‘माझ्याकडे आहे. अर्थात तुमच्या पसंतीस उतरली तर.’ त्यांनी माझ्या पेटीवरून मुलायम बोटांनी सूर छेडले. त्यांच्या नजरेत सुहास्य तरळले. म्हणाले ‘अत्युत्तम आहे.’ मी भरून पावलो.
कार्यक्रमात अशोकजींना ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ची फर्माईश झाली. त्यांनी हे भावगीत सादर करून आम्हाला केतकीच्या बनाची सैर घडवली. हे नमूद करताना माझे डोळे पाणावले आहेत… सुमनताईंच्या गदगदलेल्या आठवणींनी. अधिक काय लिहू?

