- शशांक मो. गुळगुळे
क्रिप्टोमधील गुंतवणुकीइतकेच महत्त्वाचे म्हणजे त्या गुंतवणुकीचे योग्य करनियोजन. या गुुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभावर प्राप्तिकर लागू होतो. पारदर्शक व्यवहार, योग्य कागदपत्रे आणि अचूक कर विवरणपत्र हीच क्रिप्टो गुंतवणूकदारांसाठी सर्वात चांगली सुरक्षा आहे.
गेल्या काही वर्षांत बिटकॉइन, इथेरियम आदी विविध क्रिप्टो करन्सीमध्ये देशवासीयांचे गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर देशात करविषयक विशेष नियम लागू आहेत. हे नियम इतर प्रकारच्या गुंतवणूक योजनांहून वेगळे असल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांकडून चुका होतात- आणि पुढे प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. म्हणूनच ‘क्रिप्टो’मध्ये व्यवहार करणाऱ्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना सर्व बाबींची माहिती करून घ्यायला हवी.
बिटकॉइन, इथेरियम आदी विविध क्रिप्टो करन्सीत काहीजण दीर्घकालीन गुंतवणूक करतात, तर काहीजण नियमित खरेदी-विक्री करून नफा मिळविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, या गुुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभावर प्राप्तिकर लागू होतो. त्याबाबतचे नियम शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी असलेल्या नियमांपेक्षा वेगळे आहेत, याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे अनेकदा प्राप्तिकर विवरणपत्र चुकीचे भरले जाते. त्यामुळे क्रिप्टो करन्सीतील गुंतवणुकीबाबत असलेले प्राप्तिकर नियम माहीत असायला हवेत. अनेक गुंतवणूकदारांचा असा गैरसमज असतो की त्यांनी पैसे खात्यातून काढले नसतील किंवा नफा फार कमी असेल तर तो क्रिप्टो व्यवहार प्राप्तिकर विवरणपत्रात दाखविण्याची गरज नाही. प्रत्यक्षात हा समज चुकीचा आहे. गुंतवणूकदाराने वर्षभरात बिटकॉइन, इथेरियम किंवा इतर कोणत्याही क्रिप्टो मालमत्तेची खरेदी-विक्री केली असेल तर त्या व्यवहारांची माहिती विवरणपत्रात देणे आवश्यक आहे. नफा किंवा तोटा झाला असेल किंवा अगदी कमी रकमेचे व्यवहार असतील, तरीही त्यांची नोंद ठेवणे आणि विवरणपत्रात योग्य माहिती देणे आवश्यक आहे. विवरणपत्रामध्ये यासाठी स्वतंत्र व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता अनुसूची दिलेली असते. प्रत्येक विक्री व्यवहाराचा तपशील या अनुसूचीमध्ये भरावा लागतो.
कर-रचना
क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांमधून झालेल्या लाभावर विशेष करदर लागू करण्यात आला आहे. सध्या यात मिळालेल्या लाभावर 30 टक्के दराने कर आकारला जातो. याशिवाय आरोग्य व शिक्षण उपकर आणि लागू असल्यास अधिभारही भरावा लागू शकतो. एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपये किमतीचे बिटकॉइन खरेदी केले आणि काही महिन्यांनंतर ते 1.50 लाख रुपयांना विकले तर त्याला 50 हजार रुपये नफा झाला म्हणून 30 टक्के दराने कर भरावा लागेल. गुंतवणूकदाराचा प्राप्तिकराचा ‘स्लॅब’ कोणताही असला तरी त्या स्लॅबचा हा कर भरण्यात काहीही संबंध नाही. शेअर बाजारात अनेकदा तोटा झाल्यास तो इतर भांडवली लाभातून समायोजित करता येतो किंवा पुढील वर्षांसाठी पुढे नेता येतो. परंतु, क्रिप्टो व्यवहारांमध्ये अशी सवलत उपलब्ध नाही. समजा, क्रिप्टोच्या एका व्यवहारात तुम्हाला एक लाख रुपयांचा नफा झाला व दुसऱ्या व्यवहारात 80 हजार रुपयांचा तोटा झाला म्हणजे गुंतवणूकदाराला प्रत्यक्षात 20 हजार रुपयेच फायदा झाला तरी 1 लाख रुपये जो फायदा झाला आहे त्यावर 30 टक्के दराने कर भरावाच लागतो. क्रिप्टो व्यवहारात झालेला तोटा पगार, व्यवसाय उत्पन्न, घरमालमत्तेचे उत्पन्न किंवा इतर कोणत्याही उत्पन्नाविरुद्ध समायोजित करता येत नाही. व्यवसायात किंवा इतर काही गुंतवणुकींमध्ये व्यवहाराशी संबंधित विविध खर्च वजा करण्याची मुभा असते; मात्र क्रिप्टो विक्री करताना मूळ खरेदी किंमत वगळता इतर कोणताही खर्च वजा करता येत नाही. ते म्हणजे- इंटरनेट खर्च, संगणक किंवा मोबाईल खर्च, सल्लागार शुल्क, संशोधनासाठी केलेला खर्च व ट्रेडिंग प्लॅटफॉर्म शुल्काशी संबंधित इतर खर्च यांचा करगणनेत लाभ मिळत नाही. त्यामुळे करपात्र लाभ मोजताना फक्त खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्यातील फरक विचारात घेतला जातो. क्रिप्टो व्यवहारांवर एक टक्का ‘टीडीएस’ लागू होतो. अनेक भारतीय क्रिप्टो विनिमय मंच व्यवहाराच्या वेळी ही कपात करतात. हा ‘टीडीएस’ अंतिम कर नसतो, तो आधीच भरलेल्या करासारखा मानला जातो. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना तुमच्या खात्यावर झालेला ‘टीडीएस’ तपासून त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. म्हणून फॉर्म 26 एएस, वार्षिक माहिती विवरण (एआयएस) आणि कर माहिती विवरण यांची गुंतवणूकदारांनी पडताळणी करायला हवी.
क्रिप्टो व्यवहार अनेकदा वेगवेगळ्या मंचांवर केले जातात. काही व्यवहार भारतीय मंचांवर, तर काही परदेशी मंचांवर केलेले असू शकतात, म्हणून पुढील माहिती सांभाळून ठेवायला हवी ः खरेदीची तारीख, विक्रीची तारीख, खरेदी किंमत, विक्री किंमत, व्यवहार शुल्क व संबंधित मंचाचा तपशील. वर्षाच्या शेवटी ही माहिती कर-गणनेसाठी उपयोगी पडते आणि कोणतीही चौकशी झाल्यास पुरावा म्हणून सादर करता येते. गुंतवणूकदारांचा असा गैरसमज आहे की, क्रिप्टो व्यवहार पूर्णपणे गोपनीय असतात. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. बहुतेक विनिमय मंच ग्राहकांचे ‘केवायसी डॉक्युमेन्ट’ घेतात. व्यवहारांची माहिती, बँक खात्यातील हालचाली, टीडीएस तपशील आणि इतर आर्थिक माहिती विविध माध्यमांतून प्राप्तिकर खात्याकडे पोहोचू शकते. त्यामुळे क्रिप्टो व्यवहार लपविण्याचा प्रयत्न करू नका. उत्पन्न न दाखविल्यास कर, व्याज आणि दंड यांचा अतिरिक्त भार पडू शकतो.
भारतीय क्रिप्टो एक्स्चेंजवर केवळ क्रिप्टोची खरेदी केली असेल आणि संबंधित आर्थिक वर्षात कोणतीही विक्री, अदलाबदल किंवा हस्तांतर केले नसेल तर त्या खरेदीची माहिती अनुसूचीमध्ये देणे सामान्यतः बंधनकारक नसते; मात्र, खरेदीचे तपशील, व्यवहार अहवाल आणि संबंधित कागदपत्रे जतन करून ठेवावीत. परंतु, क्रिप्टो मालमत्ता परदेशी एक्स्चेंज, परदेशी वॉलेट किंवा इतर परदेशी मंचांवर ठेवलेली असल्यास परिस्थिती वेगळी असू शकते. अशा प्रकरणांमध्ये परदेशी मालमत्तेच्या प्रकटीकरणासंबंधी स्वतंत्र नियम लागू होऊ शकतात. त्यामुळे परदेशी एक्स्चेंज किंवा वॉलेटचा वापर करणाऱ्या गुंतवणूकदारांनी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. प्राप्तिकर विभागाकडून सूचना किंवा नोटीस आली तर ती दुर्लक्षित करू नका. सर्व व्यवहारांचा तपशील गोळा करा. आवश्यक असल्यास सुधारित माहिती द्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनेक प्रकरणांमध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यामुळे नोटीस पाठविली जाते. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे किंवा खरेदी-विक्री करणे ही केवळ नफा मिळविण्याची बाब नसून, कर-नियमांचे पालन करण्याची जबाबदारीही आहे. प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवा, प्राप्तिकर विवरणपत्रातील व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता अनुसूची योग्यरीत्या भरा, ‘टीडीएस’ची पडताळणी करा आणि नफ्यावर लागू होणाऱ्या कराची तरतूद आधीपासून ठेवा. योग्य माहिती देऊन विवरणपत्र भरल्यास भविष्यात नोटीस, दंड आणि अनावश्यक त्रास होणार नाही. क्रिप्टोमधील गुंतवणुकीइतकेच महत्त्वाचे म्हणजे त्या गुंतवणुकीचे योग्य करनियोजन होय. पारदर्शक व्यवहार, योग्य कागदपत्रे आणि अचूक कर विवरणपत्र हीच क्रिप्टो गुंतवणूकदारांसाठी सर्वात चांगली सुरक्षा आहे.
क्रिप्टो खरेदी-विक्री करण्यासाठी अनेक गुंतवणूकदार पीअर-टू-पीअर (पी-टू-पी) पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीमध्ये क्रिप्टो एक्स्चेंज थेट विक्रेता आणि खरेदीदार यांना जोडण्याचे काम करते. पैशांचे व्यवहार मात्र दोन व्यक्तींमध्ये थेट बँक खात्यांद्वारे होतात. अनेकदा अशा व्यवहारांमध्ये तुलनेने चांगला दर मिळतो किंवा व्यवहार लवकर पूर्ण होतात म्हणून काही गुंतवणूकदार हा पर्याय निवडतात. मात्र अशा व्यवहारांमध्ये अतिरिक्त धोकेही असतात. सर्वात मोठी अडचण म्हणजे समोरील व्यक्तीबद्दल मर्यादित माहिती उपलब्ध असते. पैसे पाठविणारी किंवा स्वीकारणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, तिच्या खात्यातील निधीचा स्रोत काय आहे किंवा तिच्या खात्याचा वापर इतर कोणत्या व्यवहारांसाठी झाला आहे याची पूर्ण माहिती आपल्याकडे नसते. काही प्रकरणांत सायबर फसवणूक, आर्थिक गुन्हे किंवा संशयास्पद व्यवहारांशी संबंधित खात्यांचा वापर झाल्याचे आढळून आले आहे. अशा परिस्थितीत चौकशीदरम्यान व्यवहार साखळीतील इतर खात्यांकडूनही स्पष्टीकरण मागविले जाऊ शकते. कराच्या दृष्टीनेही पी-टू-पी व्यवहारांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. काही गुंतवणूकदारांना असे वाटते की, एक्स्चेंजच्या बाहेर किंवा थेट व्यक्ती-व्यक्तींमध्ये व्यवहार केल्यास त्याची माहिती सरकारी यंत्रणांमार्फत पोहोचणार नाही. बँक व्यवहार, खाते हालचाली, आर्थिक माहिती आणि इतर उपलब्ध साधनांच्या आधारे व्यवहारांचा मागोवा घेणे शक्य असते. म्हणून पी-टू-पी व्यवहार करताना प्रत्येक व्यवहाराची संपूर्ण नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पैसे पाठविल्याचा किंवा प्राप्त झाल्याचा पुरावा, बँक व्यवहार क्रमांक, व्यवहाराची तारीख, रक्कम, संबंधित क्रिप्टोची माहिती आणि एक्स्चेंजवरील व्यवहाराचा तपशील जतन करून ठेवावा. तसेच केवायसी पडताळणी असलेल्या, नियमानुसार काम करणाऱ्या आणि व्यवहारांची योग्य नोंद उपलब्ध करून देणाऱ्या अधिकृत क्रिप्टो विनिमय मंचांचा वापर करणे अधिक सुरक्षित ठरू शकते.

