क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी

0
11

क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला दिल्ली-देहरादून महामार्गावर काल पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. पंत दिल्लीहून त्याच्या उत्तराखंडमधील घरी जात असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ऋषभ पंतची कार उलटली. पुढच्या काही क्षणांत कारने पेट घेतला. सुदैवाने पंत बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. यावेळी एका बसचे चालक आणि वाहक पंतसाठी देवदूत ठरले. दोघांनी वेळीच पंतला कारच्या बाहेर काढले नसते, तर मोठा अनर्थ घडला असता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या गाडीचा पहाटे ५.३० च्या सुमारास नारसन सीमेवर अपघात झाला. ऋषभ पंत हा स्वतःच कार चालवत होता. पहाटेची वेळ असल्यामुळे त्याला झोप आली असावी आणि त्याचे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यानंतर काही कळण्याच्या आत त्याची कार दुभाजकाला जाऊन धडकली. त्याचवेळी तिथे एक बस उभी होती. त्या बसच्या चालकाने ही गोष्ट पहिल्यांदा पाहिली आणि आपल्या सहकार्‍यांसह त्याने घटनास्थळी धाव घेतली. बसचालकाने पंतला गाडीतून बाहेर काढले. त्याचबरोबर गाडीमध्ये अजून कोणी व्यक्ती आहेत का, अशी विचारणा केली. त्यावेळी पंतने मी एकटाच या गाडीत होतो, असे सांगितले. त्यानंतर बसचा ड्रायव्हर पंतला घेऊन बाजूला झाले. त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला. यानंतर रुग्णवाहिका बोलावून पंतला इस्पितळात दाखल करण्यात आले. पंत गंभीर जखमी झाला असला, तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.