गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांचा कौल काल मतदानयंत्रात बंदिस्त झाला. आता येत्या चार जूनपर्यंत आपल्याला निकालासाठी वाट पाहावी लागणार आहे व तोपर्यंत सारी सामसूम असेल. उत्तर आणि दक्षिण गोव्यामध्ये यावेळी प्रत्येकी आठ उमेदवार रिंगणात होते, परंतु दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप आणि इंडिया आघाडीत थेट लढती झालेल्या असतील अशी अपेक्षा आहे. तिसरा महत्त्वाचा घटक मानला जाणारा आरजी पक्ष कोणाच्या मतपेढीला किती खिंडार पाहू शकतो हेही पहावे लागेल. उत्तर गोव्यातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांच्यातील लढत चुरशीची होते की एकतर्फी ठरते ह्याबाबत उत्सुकता आहे. श्रीपाद नाईक सहाव्यांदा मतदारांना सामोरे गेले आहेत आणि आजवरच्या निवडणुकांतील भरभक्कम आघाडीमुळे यावेळीही त्यांनी आत्मविश्वासपूर्वक लढत दिली आहे. दुसरीकडे, त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून अखेरीस ज्यांच्या गळ्यात काँग्रेसने उमेदवारीची माळ घातली त्या रमाकांत खलप यांच्यासाठीही ही राजकीय पुनरागमनाची संधी आहे. तिचा ते कितपत लाभ उठवू शकतात, त्यावर त्यांचे राजकीय भवितव्य ठरेल. विश्वजित राणे यांनी सत्तरीतून श्रीपाद यांना सर्वांत मोठी आघाडी मिळवून देण्याचा चंग बांधला आहे आणि त्यात मुख्यमंत्र्यांवरही वरताण करण्याचा त्यांचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. खरी चुरस आहे ती दक्षिण गोव्यामध्ये. भारतीय जनता पक्षानेही सुरवातीला ह्या मतदारसंघातील आपला उमेदवार शोधायला भरपूर वेळ घेतला आणि भाजपने उमेदवारी जाहीर केली, तरी काँग्रेसने निर्णय घ्यायला त्याहून अधिक वेळ घेतला. भाजपने ह्यावेळी नारीशक्तीची किमया चाचपडण्याचा प्रयोग सर्वाधिक महिला मतदार असलेल्या दक्षिण गोव्यात केला आहे. दक्षिण गोवा मतदारसंघात सालसेतमधील सात मतदारसंघांतील ख्रिस्ती मतदारांचे नेहमीच प्राबल्य राहते आणि त्याचा निकालांवर थेट परिणाम होतो हे आजवरच्या जवळजवळ सर्व निवडणुकांत दिसून आले आहे, त्यामुळे ह्या ख्रिस्ती मतदारांना भाजपकडे आकृष्ट करू शकेल अशा नावाच्या शोधात भाजप होता. सामाजिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सदैव अग्रणी राहिलेल्या धेंपो घराण्याच्या नावाचा ह्या भाजपेतर मतदारांनाही जवळ आणण्यासाठी उपयोग होईल ह्या भूमिकेतून पल्लवी धेंपो यांना उमेदवारी पक्षाने दिली. वास्तविक त्या समाजकार्यामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असल्या, तरी राजकारणात पूर्ण नवख्या होत्या, परंतु आपल्याला मिळालेल्या मोजक्या वेळेमध्ये भाजपच्या शिस्तबद्ध नियोजनाबरहुकूम संपूर्ण मतदारसंघातील तीनही फेऱ्या व्यवस्थितरीत्या पूर्ण करून त्यांनी सर्व उमेदवारांहून व्यापक जनसंपर्क प्रस्थापित केलेला दिसून आला. काँग्रेसने हो ना करता शेवटी उमेदवारी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना दिली खरी, परंतु उशीरा नाव जाहीर झाल्याने विरियातो यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. काँग्रेसला मते देत आलेल्या पारंपरिक ख्रिस्ती मतदारांवरच त्यांची सारी भिस्त दिसली. दक्षिण गोव्यात ह्या मतदारांची किती मते आरजी पक्ष खेचू शकतो त्याचा विरियातोंच्या मतांवर थेट परिणाम होणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी गोव्याच्या दोनच जागा असल्या तरी ही निवडणूक गांभीर्याने घेतलेली दिसली. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या सभा त्याच्याच निदर्शक होत्या. भाजपसाठी दक्षिण गोव्यात यावेळी जमेची बाब म्हणजे वीसपैकी पंधरा मतदारसंघांमध्ये या घडीस भाजपचे आमदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दहा मतदारसंघांमध्ये काँग्रेसने, तर दहा मतदारसंघांमध्ये भाजपला आघाडी मिळाली होती, परंतु सालसेतच्या सर्व मतदारसंघांमधील एकगठ्ठा आघाडीने तेव्हा काँग्रेसच्या पारड्यात विजयश्री टाकली होती. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. दिगंबर कामतसारखा मोहरा आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकरांसारख्या सहकाऱ्यांसह भाजपकडे परत आला आहे. कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वाझ हेही भाजपच्या गोटात सामील आहेत. त्यांच्या समर्थकांनी यावेळी भाजपच्या पारड्यात किती प्रामाणिकपणे मते टाकली असतील, चर्चिल, लुईझिन, सार्दिन ह्या बड्या नेत्यांनी आपल्या समर्थकांना कोणता कानमंत्र दिलेला असेल, त्यावर सालसेतमधील चित्र बदलणार की नाही हे ठरेल. बाकी हिंदूबहुल मतदारसंघांमध्ये भाजपने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. मडगावपासून मडकईपर्यंत सर्व हिंदुबहुल मतदारसंघांमध्ये भाजप मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात होता. सालसेतचा तोटा भरून काढण्यासाठी भाजपने केलेली ही तजवीज किती फलदायी ठरते त्यावर दक्षिण गोव्याचा निकाल ठरेल. तूर्त चार जूनची वाट पाहूया!