कौटुंबिक वादातून भावावर हल्ला

0
7

मयेतील घटना; संशयिताला पोलिसांकडून अटक

मये येथील हळदणवाडीत कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात धाकटा भाऊ गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मोठ्या भावाला अटक केली आहे.

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरा सागर माईणकर (30) यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. संजय गुरुदास माईणकर (41, रा. हळदणवाडी-मये) याने आपला धाकटा भाऊ सागर गुरुदास माईणकर (38) याच्यावर हल्ला केला. रविवारी रात्री सुमारे 9.30 ते 11.10 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
संजय हा आपल्या राहत्या घरी आला असता त्याचा धाकटा भाऊ सागर याने दरवाजा न उघडल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात संजयने सागरवर चाकूने शरीरावर वार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात सागर माईणकर हा जखमी झाला असून त्याला तात्काळ गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी संजय माईणकर याला काल सकाळी अटक केली. भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 109 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश परवार करीत आहेत.