31 C
Panjim
Saturday, March 6, 2021

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवरील हायब्रिड इफ्फी

  • बबन भगत

‘‘कोविडचे संकट असतानाही गोवा सरकारने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. सरकारने चित्रपट रसिकांना या महोत्सवापासून तुटू दिले नाही. उपस्थित राहू न शकणार्‍या रसिकांना त्यांनी ऑनलाईन इफ्फीची सोय उपलब्ध करून दिली. हायब्रिड इफ्फी ही संकल्पना खूप चांगली असून ती राबवणारे गोवा सरकार अभिनंदनास पात्र आहे.’’

दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पार पडणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा जानेवारी महिन्यात झाला. आता याच वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात परत एकदा या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. नुकताच झालेला ‘इफ्फी’ हा २०२० या वर्षासाठीचा होता. कोविड महामारीमुळे त्याचे आयोजन २०२० या साली होऊ शकले नाही व सुमारे महिन्याभराच्या विलंबाने तो २०२१ च्या जानेवारी महिन्यात ‘हायब्रिड’ स्वरूपात संपन्न झाला. म्हणजेच ज्या प्रतिनिधींना आपल्या घरी बसून इफ्फीतील चित्रपट पाहायचे होते, त्यांच्यासाठी तशी ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने चित्रपट पाहण्यासाठीची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. या अशा प्रतिनिधींसाठी नोंदणीही वेगळी होती व व्हर्च्युअल पद्धतीने चित्रपट पाहण्यासाठी नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना इफ्फीस्थळी प्रवेश नव्हता. तसेच प्रत्यक्ष इफ्फीस्थळी हजर राहून महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना व्हर्च्युअल पद्धतीने सिनेमा पाहण्यासाठीची सोय उपलब्ध नव्हती. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर इफ्फीस्थळी गर्दी होऊ नये यासाठी ही सोय करण्यात आली होती.

प्रत्यक्ष इफ्फीस्थळी हजर राहून महोत्सवात सहभागी होण्यासाठी यंदा अडीच हजारांच्या आसपास प्रतिनिधींनी नोंदणी केली होती, तर सामाजिक अंतराचे नियम पाळून चित्रपटगृहात बसण्याची सोय करण्यात आल्याने वेगवेगळ्या थिएटरांमध्ये मिळून एकावेळी फक्त एक हजार रसिकांनाच प्रवेश मिळाला होता. मात्र, असे असले तरी कुठेही चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही.

इफ्फीच्या इतिहासात यंदा प्रथमच व्हर्च्युअल पद्धतीने परिसंवाद झाले. ‘इन कन्व्हर्सेशन’ म्हणजे चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांशी चित्रपटांविषयीच्या वेगवेगळ्या विषयांवरील संवाद व्हर्च्युअल पद्धतीने झाले. तसेच यंदा चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचे मास्टर क्लासेसही आभासी पद्धतीने (व्हर्च्युअल) आयोजित करण्यात आले होते. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर इफ्फीच्या आयोजकांनी यंदा तंत्रज्ञानाचा हायब्रिड इफ्फीसाठी फार यशस्वीपणे वापर केला.
यंदाच्या इफ्फीविषयी गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा राज्यात इफ्फीचे आयोजन कसे करायचे ही समस्या आमच्यासमोर आ वासून उभी राहिली होती. जगभरातील आघाडीचे चित्रपट महोत्सव महामारीच्या संकटामुळे एक तर रद्द करण्यात आले होते किंवा ऑनलाईन आयोजित करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर आम्ही इफ्फी हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला हे शिवधनुष्य पेलेल की काय अशी शंका व्यक्त करण्यात येऊ लागली होती. पण आम्ही आव्हान स्वीकारले आणि ते यशस्वीही करून दाखवले. हायब्रिड पद्धतीने इफ्फी आयोजित करण्याचा आमचा प्रयोग यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया जेव्हा देश-विदेशांतून इफ्फीसाठी आलेले चित्रपटसृष्टीतील दिग्गज तसेच इफ्फीत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी दिल्या तेव्हा आमचा प्रयोग यशस्वी झाल्याची पावती आम्हाला मिळाली, असे फळदेसाई पुढे बोलताना म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सहकार्याशिवाय ईएसजीला हे यश मिळवता आले नसते असेही ते म्हणाले. फळदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामारीचा काळ असतानाही विदेशांतून चित्रपट क्षेत्रातील सुमारे ६० कलाकार इफ्फीला आले होते. त्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, पटकथा लेखक, संपादक, संगीतकार आदींचा समावेश होता. त्यात प्रामुख्याने इफ्फीसाठी ज्यांच्या चित्रपटांची निवड झाली होती त्यांचा समावेश होता. देशभरातून इफ्फीसाठी आलेल्या चित्रपट क्षेत्रातील लोकांचा आकडा २०० च्या आसपास होता. त्यात इंडियन पॅनोरमा व अन्य काही विभागांतून ज्या चित्रपटांची निवड झाली होती, त्या चित्रपटांशी संबंधित कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, लेखक मंडळी, तंत्रज्ञ आदींचा समावेश होता.
यंदाच्या इफ्फीत हवशानवशांची गर्दी नव्हती. इफ्फीला उत्सवी स्वरूप नव्हते. थिएटर्समध्ये गर्दी नव्हती. लांब रांगा नव्हत्या. तिकीट बुकिंग ऑनलाईन पद्धतीने असल्याने तिकिटा काढण्यासाठी लांब-लांब अजगरासारख्या रांगा नव्हत्या. आपणाला थिएटर्समध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून भांडणे नव्हती. मात्र, मोजकेच असे जे प्रतिनिधी यंदा होते ते थिएटर्समध्ये बसून इफ्फीतील अभिजात अशा चित्रपटांचा आनंद लुटताना दिसत होते.

देश-विदेशांतील कलाकारांकडून कौतुक
देश-विदेशांतून इफ्फीसाठी आलेले चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ हे पत्रकार परिषदांच्या वेळी इफ्फीचे कौतुक करताना दिसले. कोरोना महामारीचे संकट असताना ज्या पद्धतीने कोणत्याही अडचणीशिवाय इफ्फीचे आयोजन करण्यात आले त्याविषयी ते आयोजकांचे कौतुक करत होते. त्यांपैकी बर्‍याच जणांनी इफ्फीच्या आयोजकांनी महामारीच्या काळातही अशा महोत्सवाचे कसे आयोजन करायचे याचा वस्तुपाठच घालून दिला असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.

उद्घाटन व समारोप सोहळा ः नेटका व आटोपशीर
यंदा इफ्फीचा उद्घाटन व समारोप सोहळा नेटका व आटोपशीर झाला. इफ्फीच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा उद्घाटन सोहळ्यात गोमंतकीय कलाकारांना आपल्या लोककलेचे सादरीकरण करता आले, आणि आपणाला मिळालेल्या या संधीचे या कलाकारांनी सोने केले. त्यांनी सादर केलेले समई नृत्य, घोडेमोडणी नृत्य, गोफ नृत्य या नृत्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हे दोन्ही सोहळे यंदा ठरलेल्या वेळी विनाविलंब सुरू झाले. ते नेटके व आटोपशीर होते व त्यांचे आयोजनही सुंदर असेच होते. यंदा उद्घाटन व समारोप सोहळ्याला अवघ्या ४०० लोकांना प्रवेश देण्यात आला होता. महामारीमुळे दरवर्षीप्रमाणे यंदा सात हजार प्रेक्षकांना या सोहळ्यांना प्रवेश देणे शक्य नव्हते. अवघे ४०० प्रेक्षक असतानाही या समारोपांची शान काही कमी नव्हती. समारोप सोहळ्यातील कार्यक्रमही रंगतदार झाला. यावेळी उद्घाटन व समारोप सोहळ्याला बॉलिवूडमधील कलाकारांची मांदियाळी नव्हती. त्याविषयी विचारले असता सुभाष फळदेसाई म्हणाले, बॉलिवूड कलाकारांना इफ्फीसाठी किमान तीन महिन्यांआधी निमंत्रण द्यावे लागते. कारण त्यांना त्यांचे शेड्युल आधीच ठरवावे लागते. त्यांना चित्रीकरणासाठी वगैरे देश-विदेशांत जायचे असते. यंदा महामारीमुळे इफ्फी कधी होईल, होईल की नाही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. दरवर्षी इफ्फी हा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येत असे, पण यंदा तो कधी होईल याविषयीच सगळी अनिश्‍चितता होती. परिणामी बॉलिवूडमधील कलाकारांना निमंत्रण देणे शक्य नव्हते. ते यंदा येऊ शकले नाहीत याचे मात्र फार वाईट वाटलेे असे फळदेसाई म्हणाले.

रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते मनोज जोशी यांनीही पत्रकारांशी बोलताना यंदाच्या इफ्फीचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले ः ‘‘कोविडचे संकट असतानाही गोवा सरकारने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. सरकारने चित्रपट रसिकांना या महोत्सवापासून तुटू दिले नाही. उपस्थित राहू न शकणार्‍या रसिकांना त्यांनी ऑनलाईन इफ्फीची सोय उपलब्ध करून दिली. हायब्रिड इफ्फी ही संकल्पना खूप चांगली असून ती राबवणारे गोवा सरकार अभिनंदनास पात्र आहे.’’ आपण इफ्फीत काही चित्रपट पाहिले असून चित्रपटांची निवडही चांगली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
‘ब्रिज’ या यंदाच्या इफ्फीतील पुरस्कार विजेत्या आसामी चित्रपटाचे दिग्दर्शक (‘ब्रिज’ला स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कार प्राप्त झाला) कृपाल कलिता यांनीही पत्रकार परिषदेच्या वेळी बोलताना इफ्फीचे कौतुक केले. कोविड महामारीचे संकट असताना गोव्यात अगदी उत्साहात इफ्फीचे जे आयोजन करण्यात आले ते पाहून आपणाला खूप आनंद झाल्याचे सांगून संपूर्ण जगभरातील चित्रपट महोत्सवांसाठी इफ्फी हे एक चांगले उदाहरण ठरणार असल्याचे ते म्हणाले. यंदाच्या इफ्फीत दाखवण्यात आलेला त्यांचा ‘ब्रिज’ हा चित्रपट आसाममध्ये दरवर्षी येणार्‍या पुरावर भाष्य करणारा आहे. त्याविषयी बोलताना त्यांनी आसाममध्ये दरवर्षी पावसाळ्यात न चुकता पूर येऊन लोकांची घरे त्यात बुडून संसार उद्ध्वस्त होत असतात. पण भारताबाहेरील लोक सोडा, भारतातील लोकही आसाम व आसामी लोकांच्या या संकटाकडे पाहत नसून सहानुभूतीही व्यक्त करताना दिसत नसल्याचे ते म्हणाले. देशी वृत्तवाहिन्याही या पुराचे वृत्तांकन करताना ते गंभीरपणे करीत नसल्याचे ते म्हणाले. आपल्या ‘ब्रिज’ या चित्रपटातून आपण आसाममधील पुराच्या संकटाकडे जगाचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

फोकस कंट्री बांगलादेश
यंदाच्या इफ्फीत फोकस कंट्री ही बांगलादेश होती. त्यामुळे बांगलादेशातील काही महत्त्वाचे चित्रपट यावेळी इफ्फीत दाखवण्यात आले. बांगलादेशच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या नेत्यांपैकी एक नेते असलेले पूर्व पाकिस्तानचे राजकारणी शेख मुजिबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनावरील ‘बंगबंधू’ या चित्रपटाची संयुक्तपणे भारत व बांगलादेश निर्मिती करीत असून ज्येष्ठ व जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेले हिंदी चित्रपट दिग्दर्शक शाम बेनेगल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. बांगलादेशच्या राष्ट्रपित्याच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी ही निर्मिती केली जात आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात या सहनिर्मितीचा उल्लेख करून एकप्रकारे प्रोमोशनच केले.

स्टोयरो यांना जीवन गौरव
यंदाच्या इफ्फीत जगप्रसिद्ध इटालियन सिने छायाचित्रकार व्हिटोरियो स्टोयरो यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. इंडियन पॅनोरमा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग, रेट्रोस्पेक्टिव्ह, सत्यजीत रे आदरांजली विभाग, मिडफिस्ट, गोमंतकीय विभाग, स्पेशल स्क्रिनिंग, उद्घाटन व समारोपाचे चित्रपट आदी १६ विभागांतून १८० चित्रपट यंदा दाखवण्यात आले. ऑस्कर पुरस्कार विजेते जगप्रसिद्ध बंगाली चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांना विशेष आदरांजली म्हणून त्यांचे पाच चित्रपट इफ्फीत दाखवण्यात आले. त्यात ‘चारूलता’, ‘घरे बाइरे’, ‘पथेर पांचाली’, ‘शतरंज के खिलाडी’ व ‘शोनार केल्ला’ हे चित्रपट दाखवण्यात आले.

मराठी चित्रपट कमी
यंदाच्या इफ्फीत मराठी चित्रपटांची तुलनेत कमी निवड झाली. दखल घेण्यासारखे ‘प्रवास’ (अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे अभिनित) व ‘जून’ हे दोनच चित्रपट होते. पैकी ‘प्रवास’ या चित्रपटाला गांधी शांतता पुरस्कारासाठीचे नामांकन मिळाले होते. मात्र, दुर्दैवाने या चित्रपटाला तो पुरस्कार मिळू शकला नाही. यंंंंंदा इंडियन पॅनोरमा विभागात त्याचा ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
गर्दी नसलेला पण दर्दी असे प्रतिनिधी असलेला, सेलिब्रिटींची मांदियाळी नसलेला मात्र गंभीरपणे आयोजन केल्याने खर्‍या अर्थाने सिनेमाचा महोत्सव म्हणून यादगार ठरलेला असा यंदाचा इफ्फी होता व त्यामुळे तो कायम सर्व प्रतिनिधींच्या स्मरणात राहण्यासारखा होता असे जाता जाता म्हणावेसे वाटते. दरवर्षी असाच सुंदर इफ्फी होवो अशी मनोकामनाही करावीशी वाटते. आता पुढचा इफ्फी फार दूर नाही, तो याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.

यंदाचा पाऊस गेला व ऑक्टोबर महिना उजाडला की इफ्फीच्या चाहत्यांना मग २०२१ च्या इफ्फीचे वेध लागू लागतील. माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास देश-विदेशांतील चित्रपट क्षेत्रातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी पत्रकार परिषदांच्या निमित्ताने चर्चा करायची संधी मिळाल्याने इफ्फी माझ्यासाठी खूप आनंददायी ठरला. त्यांनी बनवलेले सुंदर व अभिजात असे चित्रपट पाहून इफ्फीचे प्रतिनिधी नक्कीच धन्य झाले असतील.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच - सहाशे मीटरवर...

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

ALSO IN THIS SECTION

आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम

दत्ता भि. नाईक आगामी मार्च-एप्रिलच्या काळात आसाम, प. बंगाल, तामिळनाडू व पुदुचेरी अशा तीन राज्यांत व एका छोट्याशा...

‘एलआयसी’ अंतर्बाह्य कशी आहे?

शशांक मो. गुळगुळे आतापर्यंत खाजगी कंपन्यांच्या भागभांडवल विक्रीपेक्षा सरकारी कंपन्यांच्या भागभांडवल विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि या...

खांडेकर-कुसुमाग्रज-बोरकर अनोखा त्रिवेणी संगम

राम देशपांडे भाऊंनी पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी साहित्याच्या क्षेत्रावर अधिराज्य केले. स्वतःचा असा एक वेगळा ठसा मराठी मनावर...

अस्त

अंजली आमोणकर देहोपनिषद सिद्ध झालं म्हणजे देहकथा पूर्ण झाली. विसर्जनाची वेळ झाली. गीतेत म्हटले आहे- ‘तू त्रिगुणातीत हो!’...

आनंद सुधा बरसे…

रामनाथ न. पै रायकर मराठी संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गोमंतकीय गायक-नट, रामदास कामत यांनी नुकतीच वयाची नव्वदी पार केली...