कोलवाळ गृहनिर्माण प्रकल्पासाठी इच्छा प्रस्ताव निविदा लवकरच

0
108

गृह निर्माण मंडळाच्या कोलवाळ येथील महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पासाठी अंतिम इच्छा प्रस्ताव निविदा लवकरच जारी केली जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी काल दिली.

या प्रकल्पासाठी जारी पूर्व पात्रता निविदांमध्ये देशातील आठ ते दहा बड्या कंपन्यानी सहभाग घेतला आहे. गोव्यातील एकाही कंपनीने सहभाग घेतला नाही, अशी माहिती मंत्री साळगावकर यांनी एका प्रश्‍नावर बोलताना दिली.

गोमंतकीय जनतेला उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम असलेले फ्लॅट माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कोलवाळ येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी परराज्यातील कंपन्या आघाडीवर आहेत. राज्यातील एक तरी कंपनी या प्रकल्पासाठी पूर्व पात्रता निविदेमध्ये सहभागी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, एकाही स्थानिक कंपनीने या प्रकल्पामध्ये रस दाखविलेला नाही. या प्रकल्पासाठी पात्र कंपन्याकडून अंतिम इच्छा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी निविदा जारी करून एका कंपनीची निवड केली जाणार आहे, असेही मंत्री साळगावकर यांनी सांगितले. या गृहनिर्माण प्रकल्पाचा खर्च २६७ कोटी रूपये एवढा आहे. यात एकूण १५६० सिंगल आणि डबल बेडरूमचे फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. यात १०८० सिंगल बेडरूम आणि ४८० डबल बेडरूमचा समावेश आहे. या प्रकल्पाचे बांधकाम दोन टप्प्यात हाती घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ८४० सिंगल बेडरूम आणि ३६० डबल बेडरूम फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. तर दुसर्‍या टप्प्यात २४० सिंगल बेडरूम आणि १२० डबल बेडरूम फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. साधारण अडीच वर्षात हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नियोजन केले जात आहे. पंधरा महिन्यात एक तृतियांश प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.