कोलवाळ अपघातात महिला पर्यटक ठार

0
13

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील एका कुटुंबाने भाड्याला घेतलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या मुंबईतील महिलेचा मृत्यू झाला. तिचा पती आणि चिमुकली मुलगी या अपघातातून सुदैवाने बचावली. अपघातानंतर स्कार्पिओ चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

या अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आकांक्षा जेन (36, रा. ठाणे मुंबई) असे असून तिच्या पतीचे नाव कल्पेश जेन (40)व मुलगी 4 वर्षाची आहे. या दोघांना काही झाले नसल्याची माहिती कोलवाळ पोलिसांनी दिली. हा अपघात शनिवारी रात्री झाला.

मुंबईतील सदर कुटुंब गोव्यात पर्यटनासाठी आले होते. पती, पत्नी आणि त्यांची लहान मुलगी असे तिघे भाड्याने घेतलेल्या दुचाकीवरून प्रवास करीत होते. कोलवाळ महामार्गावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव स्कार्पिओने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यात दुचाकीवर मागे बसलेल्या आकांक्षा यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी आकांक्षा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले; मात्र दुखापती गंभीर असल्याने उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

या अपघातात महिलेचा पती आणि लहान मुलगीही रस्त्यावर फेकले गेले. मात्र दोघेही सुदैवाने बचावले. अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळाची पाहणी करून घटनेची नोंद केली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या स्कार्पिओचा आणि त्याच्या चालकाचा शोध सुरू केला आहे. संबंधित स्कार्पिओ महाराष्ट्र पासिंगची असल्याचे सांगण्यात येत आहे.