कोरोना संकटाचा पुढील टप्पा घातक

0
852
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

सध्या देशात कोरोनाची ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी राज्यात आणि संपूर्ण देशात लष्कराच्या मदतीने ‘टोटल लॉकडाऊन’ करणे आवश्यक भासेल. कुठल्याही विषाणूचा प्रसार घातांक वक्ररेषा आलेखानुसार होतो आणि इन्व्हेस्टीगेशन, रिकग्निशन, इनिशिएशन, ऍक्सिलरेशन आणि डिसीलरेशन या पाच स्तरीय टप्प्यांमधून जातो.

चीनमधील वुहान प्रांतात कोविड १९ कोरोना विषाणूचा उगम झाला हे आता सर्वविदित आहे. चीनमधील नरसंहारानंतर, ह्या विषाणूंचा फैलाव अतिवेगाने झाला. जागतिक आरोग्य संघटनेनुसार १८ मार्च २०२० पर्यंत जगभरातील दोन लाख दहा हजार लोकांना याची लागण झाली असून ९१०० वर लोक मृत्युमुखी पडले आहेत. चीनमध्ये ८० हजार, इटलीमध्ये २१ हजार व इराणमध्येे १४ हजार लोक या रोगाने पीडित झाले असून तो दक्षिण कोरिया, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीतही मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. याला आटोक्यात आणण्यासाठी काय करावे, ह्या बद्दल अनेक देशांमध्ये संभ्रम आहे.
कोविड १९ कोरोना विषाणू हवेतून प्रसार करत, स्पर्शाने पसरणारा सांसर्गिक रोग असून, आम्ही यावर तोडगा काढला आहे अशी शेखी अमेरिका व इस्रायलने मारली असली तरी त्याला जागतिक आरोग्य संघटनेने पुष्टी दिलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूंच्या उपसर्गाला जागतिक संसर्गजन्य रोगाची संज्ञा देऊन वैद्यकीय आणीबाणी जाहीर केली आहे.

या साथीवर भारतातील केंद्र सरकारने विमानांच्या उड्डाणांवर बंदी आणणे, रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे तेथून येणार्‍या लोकांना देशात येण्याची परवानगी (व्हिसा) न देणे, इतर देशांमधून येणार्‍या प्रवाशांची उतरताच आरोग्य तपासणी करणे, त्यांना लष्कराने तयार केलेल्या व चालवलेल्या आठ आयसोलेशन कँप्समध्ये ठेवणे, सर्व रुग्णालयांना आयसोलेशन वॉर्डस् तयार करण्याचे आदेश देणे, मित्र देशांच्या सीमा केवळ पर्यटनासाठी बंद करणे इत्यादी उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. संबंधित राज्य सरकारांनी देखील आपल्या स्तरावर केंद सरकारच्या आदेशांना पूरक अशा उपाययोजना केल्या असल्या तरी जनता त्या आदेशांचे शब्दश: पालन करताना दिसत नाही. त्यामुळे सध्या देशात ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी राज्यात आणि संपूर्ण देशात लष्कराच्या मदतीने ‘टोटल लॉकडाऊन’ करणे आवश्यक भासेल. कुठल्याही विषाणूचा प्रसार घातांक वक्ररेषा आलेखानुसार होतो आणि इन्व्हेस्टीगेशन, रिकग्निशन, इनिशिएशन, ऍक्सिलरेशन आणि डिसीलरेशन या पाच स्तरीय टप्प्यांमधून जातो. सुरवातीला हा घातांक आलेख लंबरेषेत जात असल्यामुळे या रोगाच्या कमी लागणीबद्दल अंदाज व्यक्त केला जातो, जी स्थिती सध्या भारतात आहे. पण पुढे हा आलेख वक्ररेषेत जायला लागल्यामुळे याचा नक्की ङ्गैलाव किती झाला आहे किंवा होईल याबद्दल संभ्रम आहे. अमेरिका, युरोपमध्ये ही स्थिती आहे. म्हणूनच सुरवातीला ह्या रोगाची लागण फार मोठ्या प्रमाणात होणार नाही असा विश्वास वाटून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुरवातीला चीनमध्ये असेच झाले. कुठलाही विषाणू शांत झाल्यानंतर परत जोमाने उभारू शकतो हे मात्र अशा आलेखाच्या माध्यमातून स्पष्ट होत नाही. आलेखाचे केंद्र एकदम वर जाऊन सरळ झाल्यास किंवा खाली गेले तर त्याला बीजगणितात कन्व्हर्शन ऑफ एपी कर्व्ह इन टू साइन वेव्ह म्हणतात. विषाणूंच्या संसर्गामध्ये सुरवातीला, लागण झाल्यांपैकी केवळ पाच किंवा दहा टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते; पण जसजसा आलेख वेगाने वर जाऊ लागतो तसतशी इंटेन्सिव्ह केयर युनिटमधे लागणार्‍या खाटांच्या संख्येत प्रचंड वृद्धी होऊन ती संख्या, उपलब्ध रुग्णालयांच्या आवाक्याबाहेर जाते. अशी स्थिती आज इटलीत झालेली प्रत्ययाला येते. भारताला हे सर्व टाळायचे आहे आणि जरूर लागली तर त्यासाठी लष्कराची मदत घेतली जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणूंची साथ एक्सपोनेन्शियल कर्व्हच्या आलेखानुसार कार्यरत राहील हे मानण्याची चूक भारताने करता कामा नये. कोविड १९ कोरोना विषाणूच्या संदर्भात नवीन रुग्णांची संख्या सुरवातीला झपाट्याने वाढते. टोकाला पोहोचते आणि नंतर ती संख्या कमी व्हायला लागते. अशा आलेखाला संक्रमकीय आरोग्य वक्ररेषा म्हणतात. चीन आणि दक्षिण कोरियामध्ये या रोगाच्या प्रादुर्भावात असा आलेख पाहायला मिळाला. अशा आलेखाचा चरमबिंदू समांतर राहणे धोकादायक असते, कारण त्यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर न सोसवणारा त्राण पडतो. भारत सरकार व राज्य सरकारांनी ज्या प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या आहेत त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव भारतात इतर देशांच्या तुलनेत कमी प्रमाणावर होईल अशी आशा करायला वाव आहे. किंबहुना जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या या बाबतीतील प्रयत्नांची वाखाणणी केली आहे. पण जनतेच्या उदासीनतेमुळे अथवा सरकारने घातलेल्या प्रतिबंधांना धुडकावण्याच्या विकृत मानसिकतेमुळे या रोगांनी पीडित होणार्‍या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली तर टोटल लॉक डाऊनशिवाय पर्यायच उरणार नाही आणि ते लष्कराच्या योगदानाशिवाय शक्य होणार नाही.

चीनमधे पहिली कोरोना विषाणू केस उघडकीस आल्यानंतर संक्रमकीय आरोग्य वक्ररेषा : एपिडेमियॉलॉजिकल कर्व्ह त्याच्या चरमपंथावर पोचून खाली जायला एक महिना लागला. मात्र उर्वरित जगात पहिला रुग्ण जानेवारी, २०२० मध्ये आढळल्यानंतर देखील जागतिक वक्ररेषा आपल्या चरमबिंदूवर पोचलेली दिसत नाही. उलटपक्षी,रुग्णांची संख्या झपाट्याने वृद्धिंगतच होते आहे. चीनने या विषाणूंच्या उपसर्गाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केले आणि तापमान तपासणी, मुखावरण घालणए व हात धुणे करणे अनिवार्य केले. संसर्ग टोकाला पोचला त्यावेळी चीनने संपूर्ण वुहान प्रांताला विलग केले. भारतात बाहेरून आलेल्या रुग्णांची संख्या स्थानिक उपसर्गामुळे नव्या धोक्यात परिवर्तित होण्याची शक्यता आहे. म्हणूनच मार्च महिना जगासाठी आणि खास करून भारतासाठी महत्वाचा आहे. या रोगाचा पुढचा टप्पा येऊ नये यासाठी या काळात सर्वेतोपरी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे व ते लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य होणार नाही.

यासाठी भारताला खालील गोष्टींची आवश्यकता आहे
अ) केंद्र व राज्य सरकारने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्र व राज्यस्तरीय उपाययोजना राबवल्या पाहिजेत. मुख्य म्हणजे, देशातील लोकांनी या निर्देशांचे शब्दश: पालन केले पाहिजे. राष्ट्रीय दृढ ऐक्य आणि खंबीर नेतृत्वाखालील बहुस्तरीय प्रशासकीय समन्वयाद्वारे जनतेसाठी बरेच काही करता येते. पण त्याला सहकार्य करणे हे जनतेचे काम आहे;
ब) कोरोना विषाणूचा देशभरातील प्रादुर्भाव, क्वारंटाईन आणि सर्वंकष उपाय योजनांच्या माध्यमातूनच रोखता येईल. मात्र अशा उपाययोजनांना अमलात आणणे सरकार-पोलिसांच्या आवाक्यातील गोष्ट नाही. त्यासाठी सरकारला लष्कराची मदत घ्यावीच लागेल. जेव्हा पर्याय कमी व दुर्लभ असतात, त्यावेळी सरकारपाशी तो अमलात आणण्यासाठी लष्कराशिवाय पर्यायच नसतो.

भारतात कोविड १९ कोरोना विषाणूंची लागण होत असतांनाच, सीमेवर सतत गोळीबार करून पाकिस्तान नीच कृत्य करत आहे, ही बाब शस्त्रसंधी भंगाच्या वाढलेल्या घटनांमधून प्रत्ययाला येते. यात त्याला यश मिळावे म्हणून जिहादी संघटनांना काश्मिरमध्ये हल्ले करण्यास बाध्य केले जात आहे हे रोज मारल्या जाणार्‍या जिहादी संख्येतून स्पष्ट होते. स्वतःवरही हेच संकट घोंगावत असतांना सीमेवर व काश्मिरात तणाव वृद्धिंगत करण्यातील पाकिस्तानच स्वारस्य अगम्य आहे. कदाचित पाकिस्तानमधील संसर्गावरून तेथील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीचा हा प्रयत्न असेल. तालीबान व अमेरिकेमधे झालेल्या अफगाण शांती करारात पाकिस्तानला फारसा वाव मिळाला नसल्यामुळे अमेरिकेचे लक्ष्य परत एकदा वेधून घेण्यासाठी त्यानी हा पर्याय निवडला असावा. सीमेवरील तणावामुळे विचलित झालेल मोदी सरकार कोविड १९ कोरोना विषाणू विरोधी अभियानाकडे हवे तसे लक्ष देऊ शकणार नाही, त्याच्या निर्णयक्षमतेत बाधा उत्पन्न होईल यापैकी काहीही, सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी भंगाचे कारण असू शकते.

मोदी सरकारच्या रोगनिवारणातील निर्णयक्षमतेवर किंवा त्यांना मिळणार्‍या लष्करी-सामरिक सल्ल्यांवर शस्त्रसंधी भंगाचा परिणाम कसा व काय होईल हे जसे अगम्य आहे, तसेच पाकिस्तानी राजकीय व लष्करी नेतृत्व कोरोना विषाणूंच्या प्रकोपाला कसे तोंड देते हे पहाणे देखील औत्सुक्याचे असेल. स्वतःच्या देशात कोरोना विषाणू हैदोस घालत असतांना भारत व पाकिस्तान दोघांनाही युद्धपर्याय निवडणे अवघड आहे. त्यामुळेच आपला प्रतिस्पर्धी जीवघेण्या संकटाचा सामना करत असतांना त्याच्यावर वार करण्याची संधी पाकिस्तान व तेथील जिहादी संघटना साधत आहेत. पाकिस्तानी कुरापतींचा समाचार योग्य वेळी घेण्यात येईल हे लष्कराचे आणि भारताचे धोरण आहे.

कोरोनाच्या साथीवर मात केल्यानंतर या विषाणूंची लागण नव्या रोग्यांना होऊ नये, त्यांचे पुंजके तयार होऊ नयेत हे साध्य करणे हीच भारताची कसोटी असणार आहे. रोगाची साथ सुरु असतांना लोकांमध्ये आरोग्य रक्षणार्थ, आचरणवादी बदल होणे स्वाभाविक असल्याने एकमेकांवर दोषारोपण करण राजकीय पक्षांनी टाळले पाहिजे. या विषाणूंवर मात करण्यासाठी भारताकडे कुठल्याही प्रकारची जादुई छडी नाही. मात्र यातून घेतलेल्या धड्यांना आत्मसात करणे आवश्यक असेल. हा पहिला किंवा शेवटचा साथीचा रोग नसल्यामुळे वुई कॅन नॉट अफोर्ड टू लर्न स्लोली.