कोरोना… पुढे काय??

0
117
  • डॉ. राजेंद्र साखरदांडे

आता पुढे येणारी कोविडची तिसरी फेरी… तिसर्‍या फेरीत १८ वर्षांखालील वयोगटाच्या मुलांना प्रादुर्भाव होणार असे जगभर सांगितले जाते. लसीकरणाचे प्रमाण बघितले तर हर्ड इम्युनिटी समाजात पसरली नाही. १८ वर्षाखालील मुलांना लसीकरण झालेले नाही. मग नेहमीप्रमाणे…..

कोविडचे रणांगण पेटलेच… प्रत्येकाच्या मनात कोविडविषयीचे भय… चक्क घाबरगुंडी उडालेली आहे. जनता एवढी घाबरलेली आहे की सांगता सोय नाही. सरकार सांगते ते ते करायला ती तयार आहेच. शहरी भागातील सुसंस्कृत लोक वेगळ्या प्रकारे विचार करतात… आपापल्या परीने पुढे काय करायचे ते ठरवतात… तर प्रत्येकजण, भारताच्या कानाकोपर्‍यातला माणूस फक्त आणि फक्त कोविडविषयी बोलतो, ऐकतो, स्वप्नंही बघतो.

गोवा हा जगाच्या नकाशावर प्रकर्षाने प्रकाशणारा प्रदेश… प्रत्येकजण गोव्यावर एवढा मोहीत झालेला आहे की तो गोव्याला भेट देतोच. इतर राज्यातील लाखो कामगार जास्त करून उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, राजस्थान तर शेजारचे कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील इतर नाना प्रकारचे व्यावसायिक लोक स्थायिक व्हायलाच गोव्याला येतात. नेते मंडळी आपापल्या मतदारसंघात हजारो लोकांची परराज्यातून आयात करतात… झोपडपट्टी सजते…त्यावर रंगकाम करायला तयार. म्हणजे त्यांची रेशनकार्डे, आधार कार्ड, त्यांचा वीज, पाणी पुरवठा चालूच. मग त्यांच्याबरोबर त्यांचे रोगही आलेच. कोविडपण अशाच प्रकारे कामगार, देशी व विदेशी पर्यटकांद्वारे गोव्यात शिरला.

सुरुवातीला सगळेच नवीन… कोविडविषयीचे ज्ञान अपुरे…जगाला त्याचा परिचय होईतोवर तो पसरला होता. राज्यांना तटबंदी केली गेली. विमानतळावर, सीमेवर येणार्‍या प्रत्येकाची तपासणी केली जाऊ लागली… तयारी अपुरी पडली.. तपासणीचे किट कमी पडले, त्यात पारदर्शकता राहिली नाही. १४ दिवसांचे क्वारंटाईन लावले गेले. घरी क्वारंटाईन करण्याचा विचार पहिल्यांदा आलाच नाही. जागोजागी क्वारंटाइन जागा तयार केल्या गेल्या. ऍडमिट करण्यासाठी इस्पितळे सजवावी लागली… गोवा मेडिकल कॉलेज, ईएसआय इस्पितळ, मडगाव, म्हापसा व फोंडाच्या इस्पितळांमध्ये सोय करण्यात आली. स्टार हॉटेल्समध्ये सोय केली गेली…
शेजारील राज्यातील कामगार, पर्यटकांची तपासणी सीमेवर करण्याची सोय केली गेली. तरीही ती अपुरी ठरली होती… गोव्यातील लोकांत कोविडची तोवर रीघ लागली होती.

इस्पितळात केलेली सोय अपुरी पडली… प्रत्येक बाबतीत.. कोविडचे धनुर्धारी सैनिक त्यांना दिलेल्या रायफलने लढाई लढू लागले… गोवा मेडिकलची हालत फार बिघडली. इएसआयचे इस्पितळ तुडुंब भरून वाहू लागले. तरीही तिथल्या प्रसिद्ध डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम क्वारंटाइनच्या रुग्णांसाठी सजविले गेले… कॉट, त्यावर मऊ गादी, साइड लॉकर, खुर्च्या… त्याचा वापर किती झाला याची माहिती गोपनीय राहिली.

राज्यात कोविडची लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली. लस मोहिमेला फार धार दिली गेली नाही. आजवर फक्त दोन-अडीच लाख गोवेकरांनीच दोन्ही लसी घेतल्या. बाकीचे ८-९ लाख.. फक्त लसीचा एकच डोज… तेव्हा त्या पहिल्या, फक्त पहिल्या एका लसीने विशेष प्रतिकारशक्ती मिळणे अशक्य व आता पहिला लसीचा डोज घेतल्यावर दुसरा डोज ६४ दिवसांनंतर.

आजवर कोविडने मरणार्‍यांची संख्या ३००० वर गेलेली आहे. दर दिवशी आकडेवारी प्रसिद्ध केली जाते त्यात किती खरे किती खोटे..! मागे प्रायव्हेट इस्पितळातील मरणार्‍या लोकांची बेरीज केली गेली नव्हती. त्यांनी ते सरकारला कळवले नाही… मागे एका धनवान व्यक्तीने आपल्या घरच्या लग्नाचा सोहळा गोव्यातील विविध पाच स्टार हॉटेल्समध्ये साजरा केला. नव्वद ते हजार लोक… विविध स्तरावरचे… देशी.. विदेशी.. नवरा- नवरी सहित १०० ते १५० लोक कोविड पॉझिटिव्ह झाले… त्यांची नावे सरकार दरबारी लिखित झाली नाहीत.
मागे फोंडाच्या मातृछायात ७ रुग्ण व पणजी रीट्‌झ हॉटेलात चार रुग्ण मिळाले. मांडवीतील कॅसिनामध्ये ३०-४० कोरोनाचे रोगी सापडले.
आता पुढे येणारी कोविडची तिसरी फेरी… सरकार कशाप्रकारे तोंड देणार हे पहावे लागेल. ती फेरी कशी, कोणत्या प्रकारे येणार ते कोणालाच माहिती नाही. कशाप्रकारे त्याचा मुकाबला करणार? तिसर्‍या फेरीत १८ वर्षांखालील वयोगटाच्या मुलांना त्याचा प्रादुर्भाव होणार असे जगभर सांगितले जाते. लसीकरणाचे प्रमाण बघितले तर हर्ड इम्युनिटी समाजात पसरली नाही. १८ वर्षाखालील मुलांना लसीकरण झालेले नाही. तेव्हा लाट आली की मग नेहमीप्रमाणे आपात्कालीन तयारी… म्हणजे केलेल्या खर्चावर ऑडिट नाही.

हॉस्पिटल्समध्ये पूर्ण औषधांचा पुरवठा आहे असे सरकार म्हणते. ऑक्सीजन पुरवठा सुरळीत आहे…पण मागे ऑक्सीजन नसल्याने ३०-४० लोक दगावले.

गोवा राज्य हे भारतातील छोटेखानी राज्य… ते कसे परिपूर्ण राहावे.. ते संपूर्ण देशात आदर्श राज्य होऊ शकते. पण आमच्या सीमा सुरक्षित नाही… यंत्रणा शिस्तबद्ध नाही. कितीही आटापिटा केला तरी तेही माणसंच आहेत. त्यांच्याही सीमा आहेत. असो. सरकार गोवेकरांची आणखी सत्वपरीक्षा न बघता काम करत राहो, विश्‍वास संपादन करत राहो ही ईश्‍वरचरणी प्रार्थना!