कोरोनाशी दोन हात

0
140

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत चालली असून भारतामध्ये ती गुरुवारपर्यंत २८ वर पोहोचली. जगभरात आतापावेतो ऐंशी देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाल्याचे आढळले असून ३१९० जण मृत्युमुखी पडले आहेत. विषाणूबाधितांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या विषाणूचा उगम ज्या चीनमध्ये झाला, त्या देशातील मृतांची आणि बाधितांची नेमकी संख्या कळणे अवघड आहे. आता चीन, दक्षिण कोरिया, इराण व इटली आदी विषाणूबाधित देशांमध्ये प्रवास टाळण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत आणि विदेशातून येणार्‍या सर्व प्रवाशांची विमानतळावरच वैद्यकीय तपासणी चालली आहे. अर्थात, हे पाऊल अपुरे आहे, कारण मुळात या विषाणूच्या संपर्कात आल्यापासून प्रत्यक्ष लक्षणे दिसायला एक ते चौदा दिवस लागू शकतात. शिवाय या आजाराची सर्व लक्षणे सामान्य सर्दी – पडशाप्रमाणेच असल्याने नेमके निदान करणेही कठीण बनले आहे. सर्वांत भीतीदायक बाब म्हणजे या विषाणूवर कोणतीही उपलब्ध प्रतिजैविके काम करीत नाहीत, त्यामुळे केवळ आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल तरच आपण या विषाणूचा सामना करू शकतो. हे सगळे लक्षात घेता प्रत्येकाने शक्य तेवढी खबरदारी घेऊन या विषाणूचा प्रसार रोखण्याचे आपल्यापरीने प्रयत्न करणेच आपल्या हाती उरले आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये सगळे जग जवळ आलेले असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या मोठी आहे. नोकरी, व्यवसाय व पर्यटनाच्या निमित्ताने तर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रवास केला जात असल्यामुळे अशा प्रकारच्या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार सहजी होऊ शकतो. त्यामुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढेल अशी भीती आहे आणि ती अनाठायी नाही. आजपर्यंत अनेक विषाणूंनी वेळोवेळी असेच भीतीचे वातावरण जगभरामध्ये निर्माण केले. बर्ड फ्लू, सार्स, इबोला, झिका अशा नानाविध विषाणूंनी जी घबराट निर्माण केली, तसेच चित्र यावेळीही दिसते आहे, परंतु यावेळी तीव्रता अधिक आहे, कारण त्याचा प्रसार अधिक मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि त्यावर उपचार सध्या तरी उपलब्ध नाहीत. सोशल मीडियामुळे कोरोनाविषयक अफवांमध्ये कैकपटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच दुसरीकडे या अफवांचा फैलाव रोखणेही तितकेच जरूरीचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना दिलेल्या निर्देशांनुसार भारत सरकारनेही राज्य सरकारांना सतर्क केले आहे आणि गोवा सरकारनेही त्या दृष्टीने दोन ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्याची घोषणा केलेली आहे. गोमेकॉमध्ये दोन संशयित सध्या दाखल आहेत, जे कोरोनाबाधित नसतील अशी आशा करुया. सध्या दिल्ली, जयपूर आणि हैदराबाद ही तीन शहरे या विषाणूच्या भारतातील प्रसाराची केंद्रे ठरली आहेत. राजस्थान भेटीवर आलेल्या इटलीतील पर्यटकांच्या एका गटामुळे या विषाणूचा संसर्ग त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना झाला. गोवा हे पर्यटनाभिमुख राज्य आहे. देशी विदेशी पर्यटकांचा येथे राबता असतो. सध्या तर पर्यटक हंगाम सुरू आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने जगभरात हलकल्लोळ माजवलेला असतानाही पर्यटक गोव्यात येत आहेत याची शेखी न मिरवता या विदेशी पर्यटकांचे हे येणे म्हणजे गोव्यावरील धोक्याची टांगती तलवार आहे याची जाणीव ठेवून त्यांची विमानतळावर काटेकोर तपासणी आणि परत पाठवणी कसोशीने झाली पाहिजे. अनेक पर्यटक हे मुंबई वा दिल्लीत उतरून रेल्वेने गोव्यात येत असतात. त्यांच्या छाननीचे काय? सरकारने अजून मोठ्या प्रमाणावर आपली वैद्यकीय यंत्रणा कामाला लावणे गरजेचे आहे. एकदा या विषाणूची बाधा झाली की त्याचा संसर्ग झपाट्याने होताना दिसून आलेला आहे. त्यामुळेच त्याची तीव्रताही तेवढीच वाढते हे लक्षात घ्यावे लागेल. लवकरच उन्हाळ्याची सुटी लागेल. भारतातून युरोप पर्यटनावर जाणार्‍यांची संख्या फार मोठी असते. आपल्या पर्यटकसंस्था मोठ्या प्रमाणावर तेथे पर्यटक नेत असतात. इटलीतील रोम हे त्यांचे ठाणे असतेच असते. त्यामुळे या पर्यटनावरही सध्या निर्बंध असणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये एकदा हा विषाणू पसरला तर त्याचा संसर्ग किती पटींनी वाढेल याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात या आव्हानाचा सामना करण्यास आपली आरोग्ययंत्रणा मुळात सिद्ध आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जातीने या संदर्भात परिस्थितीवर नजर ठेवून आहेत ही दिलासादायक बाब आहे. उच्चस्तरीय मंत्रिगट कामाला लागला आहे. सरकारने कोरोनावर आयुर्वेदीय उपचार काय असू शकतात हे जाहीर केले आहे. बाबा रामदेवांनी गुळवेलीचा उपाय सुचवला आहे. परंतु तळागाळापर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि विलगीकरण व उपचार सुविधा प्रभावीपणे पोहोचेल हे सर्व पातळ्यांवरून पाहिले गेले तरच या संकटाला आपण निभावून नेऊ शकू. कोरोनाबाबत नाहक भीतीचे वातावरण निर्माण केले जाऊ नये, परंतु हे आव्हान मोठे आहे हेही विसरले जाता कामा नये. सर्वांनी मिळून ते एकजुटीने पेलावे लागणार आहे.