– डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)
अशा प्रकारच्या महामारीत व्याधींचे निवारण करणे हे केवळ वैद्यकीय, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते किंवा शासन यांचे कार्य नाही. सर्व जनतेने त्यांना सहकार्य दिले तरच ही गोष्ट शक्य होते. आपण आतापर्यंत केलेले कष्ट, कोरोना संसर्ग दूर करण्यासाठी उचललेली पावले आपल्या एका छोट्या चुकीमुळे आपल्याला कोरोनाच्या विळख्यात घेऊन जाऊ शकतात… याची सुजाण जनतेने नोंद घ्यावी.
आपल्या जीवनाची किंमत काय?.. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःसाठी आता नक्की विचारावा. सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे व धोकाही तेवढाच वाढला आहे. आपण सगळ्यांनी दोन महिने चांगली काळजी घेतली. परंतु अजुनही आपल्याला जास्त दक्ष राहणे आवश्यक आहे. असे असताना अद्यापही बरेच नागरिक बाजारात विनाकारण फिरतात. ग्रामीण भागात मास्कसुद्धा वापरत नाहीत. भाजीपाला, मासे-मटण खरेदी करण्यासाठी भरपूर गर्दी केली जाते. काही युवक-युवती गरज नसताना बाजारात हिंडताना दिसतात व पोलिसांनी किंवा पथिकांनी हटकल्यास भाजीपाल्याचे, सामान-सुमानाचे निमित्त सांगतात. ही फसवणूक कोणाची?
किराणामालाचे दुकानावर अजूनही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येते. काही परवानगी नसणारी आस्थापने, दुकाने चोरून उघडली जातात. हा कोरोनाचा विषाणू या चोरमार्गाने आपल्या घरात तर शिरणार नाही ना? यातून आपण स्वतःला व स्वतःच्या परिवाराला धोक्यात आणत आहात. आपण प्रशासनाला फसवत नसून स्वतःला फसवत आहात याची जाणीव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थोड्याशा पैशांच्या हव्यासापोटी आपण आपला जीव धोक्यात घालत आहोत.
आपण आतापर्यंत केलेले कष्ट, कोरोना संसर्ग दूर करण्यासाठी उचललेली पावले आपल्या एका छोट्या चुकीमुळे आपल्याला कोरोनाच्या विळख्यात घेऊन जाऊ शकतात… याची सुजाण जनतेने नोंद घ्यावी. आयुर्वेद शास्त्रातसुद्धा एकाच वेळी अनेक व्यक्तीसमूहाचा किंवा जनपद मंडलांचा उद्ध्वंस करणार्या व्याधिप्रकारांच्या कारणांचा, त्या व्याधींच्या स्वरुपाचा, त्यांच्या प्रतिबंधाचा आणि चिकित्सेचा विस्तृत विचार ‘जनपदोद्ध्वंसनीय’ या स्वरूपात मांडलेला आहे. त्या काळातसुद्धा अशा प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी विशिष्ट उपाय सांगितले आहेत…
– संक्रमण म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे.
‘‘प्रसंगात् गात्रसंस्पर्शात् निःश्वासात् सहभोजनात् |
एक शय्यासनाच्चापि वस्त्रमाल्यानुलेपनात् ॥
– रोगी व्यक्तीशी मैथुन करणे
– त्याच्या शरिराचा सतत स्पर्श होणे
– त्याच्या श्वासातून, खोकण्यातून अथवा शिंकण्यामुळे चांगल्या प्राकृत मनुष्याचे प्राणवहस्रोतस दुष्ट होणे
– रुग्णाने वापरलेली भोजन, इत्यादीची भांडी अथवा त्याचे कपडे, अंथरुण, पांघरुण, टॉवेल यांचा चांगल्या मनुष्याने उपयोग करणे, तसेच रुग्णाच्याच शय्येत झोपणे या गोष्टींनी कंडू, कुष्ठ, उपदंश, भूतोन्माद, ज्वर, शोष, नेत्राभिष्यंद हे व्याधी एका मनुष्याकडून दुसर्या मनुष्याकडे संक्रमित होतात.
असे संक्रमण मनुष्येतर प्राण्यांकडून उदा. व्याधी झालेल्या शेळी, गाय, म्हैस यांचे दूध पिणे, रोगित प्राण्यांचे मांस भक्षण करणे, त्यांच्या मल, मूत्र यांचा स्पर्श होणे, दंश होणे यामुळेही होऊ शकतो.
– नासा या श्वासमार्गाने दूषित (जंतुयुक्त) वायू गेल्यास श्वास, कास, प्रतिश्याय हे रोग होतात. हे आयुर्वेद शास्त्रातही नमूद आहे. अर्वाचीन परिभाषेनुसार हवेमार्फत रोगप्रसार होणे याला ड्रॉपलेट इन्फेक्शन असे म्हणतात.
एखादा धूमकेतू, ग्रह यांसारख्या ख-गोलक भ्रमण करून गेलेला असतो व शास्त्रज्ञाच्या निष्कर्षानुसार बाधाकर कृमींची (पॅथोजनिक व्हायरस) उत्पत्ती किंवा प्रसारण या ग्रहगोलकांच्या परिमाणातून निर्माण झालेले असते.
– चंद्र-सूर्यग्रहणांचा काल हासुद्धा अशा प्रकारचा बाधाकर असल्यामुळे त्या काली भोजन, विलास आदी न करता व्रतस्थ राहणे, ग्रहणानंतर घर, पात्रे, शरीर यांची शुद्धी करणे यांसारखे त्या अटळ घटनेचे परिणाम टाळण्याचे उपाय धर्मशास्त्राने सांगून ठेवले आहेत.
अशा प्रकारच्या महामारीत त्याकाळीसुद्धा जे उपाय सांगितले आहेत त्यातही उद्ध्वंसक हेतूंचे परिणाम होऊ न देण्याची जास्तीत जास्त दक्षता घेणे व व्याधी झाल्यास त्यावरील उपाय त्या व्याधीच्या स्वरुपानुसार करणे.
प्रतिबंधक उपाय ः-
१) उद्ध्वंसक हेतूंचा प्रादुर्भाव (भूमी, जल, सूर्य, पर्यावरण यांची दुष्टी) झालेला नसतो तेव्हा औषधी म्हणजे अन्नधान्य व औषधी वनस्पती उपदृत वीर्य नसतात, वीर्यवान असतात. म्हणून अशा वेळी अनपेक्षित उद्ध्वंसक कारणांचा धोका ध्यानात घेऊन त्यांचा संग्रह व देखभाल करणे महत्त्वाचे असते.
२) व्याधिक्षमत्वाचे वर्णन करताना उत्कृष्ट धातुबल असणारी व दोषसाम्य असणारी शरीर जनपदोद्ध्वंस व्याधींचा प्रतिकार करण्यात यशस्वी होतात असे दिग्दर्शन आहे. म्हणून धातुबल वाढविणे व दोषसाम्य टिकविणे यांकरिता अनुक्रमे धातुरसायन व पंचकर्मोपचारांनी दोषशोधन करून व्याधिक्षमत्व टिकविले व वाढविले पाहिजे.
३) जनपदोद्ध्वंसक वायूची शुद्धी करण्यासाठी लाख, हळद, अतिविष, हिरडा, नागरमोथा, रेणुकाबीज, वेलदोड्याची सालं, कोष्ठ, गव्हला या द्रव्यांचा धूर सर्वत्र पसरेल अशी व्यवस्था करावी.
– एलादिगणातील द्रव्ये वाटून त्यांचे जागोजागी सिंचन करावे.
– विषनाशक द्रव्यांचे लेप निरनिराळ्या वाद्यांना लावून ती वाद्ये वाजवावीत.
– जलदुष्टी नाहीशी करण्यासाठी पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जल शुद्ध करून घ्यावे व शक्यतो असे पाणी सोने, चांदी, तांबे किंवा रत्नखचित पात्रात साठवून ठेवून त्यातूनच प्यावे.
अशा प्रकारच्या महामारीत व्याधींचे निवारण करणे हे केवळ वैद्यकीय, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते किंवा शासन यांचे कार्य नाही. सर्व जनतेने त्यांना सहकार्य दिले तरच ही गोष्ट शक्य होते.