कोरोनाचे आणखी ९ रुग्ण, लॉकडाऊन ३१ पर्यंत

0
123

>> मुख्यमंत्र्यांची माहिती, एकूण रुग्ण संख्या २९

>> परीक्षा निश्‍चित वेळापत्रकानुसार

राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी ९ रुग्ण रविवारी आढळून आले असून कोरोना बाधित ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या २२ झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २९ झाली असून त्यातील ७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यात कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव झालेला नाही. केवळ परराज्यातून येणार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून येत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांत मिसळू न देताना थेट कोविड इस्पितळामध्ये दाखल केले जात आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. राज्यातील नागरिकांनी कोरोना विषाणूबाबत सतर्क राहवे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

राज्यात मागील आठवड्यापासून कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून येत आहे. परराज्यातील आलेल्या वाहन चालक, कामगार, प्रवासी यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आढळून येत आहे. मागील चार दिवसांत राज्यात २२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. १३ मे रोजी ७, १४ मे रोजी १, १६ मे रोजी ५ आणि १७ मे रोजी ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

राज्यात नवी दिल्लीतून आलेल्या रेल्वेगाडीमुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी राजधानी एक्सप्रेस या रेल्वेतून आलेल्या तीन प्रवाशांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे कोविड चाचणीत उघड झाले आहे. त्यांच्यासोबत प्रवास करणार्‍या रेल्वेच्या बोगीतील १८ ते २० सहप्रवाशांना क्वारंटाईन करण्याची सूचना करण्यात आली आहे. कोरोनाचा सामाजिक फैलाव होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ट्विट संदेशातून दिली आहे.

कारवार येथून आणण्यात आलेल्या एका कामगाराला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. गेल्या १४ मे रोजी कारवार येथून काही कामगारांना पोळे काणकोण येथून गोव्यात आणण्यात आले आहे. या कामगारांना वास्को येथे क्वारंटाईऩ करून ठेवण्यात आले आहे. त्यातील हा कामगार आहे.

शिथिलतेमुळे बाधित वाढले
गोव्यात परराज्यातून येणार्‍यांना व्यक्तींना प्रवेश देणे घातक ठरत आहे. राज्यात ३ एप्रिलनंतर सुमारे ४० दिवस कोरोनाची बाधा झालेला एकही रुग्ण नव्हता. राज्यात विदेशातून आलेल्या सहाजणांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. तसेच, विदेशातून आलेल्या एका व्यक्तीच्या बंधूला कोरोना विषाणूची लागण झाली. या सात जणांवर कोविड इस्पितळामध्ये उपचार करून बरे करण्यात आले. त्यानंतर कित्येक दिवस राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून न आल्याने केंद्राने गोव्याचा हरित विभागात समावेश केला होता.

सामाजिक फैलावाची भीती
गोव्याचा हरित विभागात समावेश केल्यानंतर गोव्यात परराज्यातून येणारी नागरिक, वाहनांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. परराज्यातून येणार्‍यांना प्रवेश देताना सीमेवर कोविड चाचणी केली जात नाही. केवळ थर्मल गनद्वारे तपासणी केली जाते. सरकारी क्वारंटाईऩमध्ये ठेवण्यात येणार्‍याची कोविड चाचणी घेतली जात आहे. १३ मेपासून पाच दिवसात कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आत्तापर्यंत कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव झालेला नाही. तथापि, परराज्यातून लोकांच्या प्रवेशामुळे वाढणार्‍या कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येमुळे कोरोनाचा सामाजिक फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारी आकडेवारीनुसार गोव्यात ११ ते १६ मे या सहा दिवसाच्या काळात परराज्यातून आलेल्या १४८२ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर, १९०३ लोकांना सरकारी क्वारंटाईनखाली ठेवण्यात आले आहेत.

सावधगिरी बाळगा ः मुख्यमंत्री
परराज्यातून येणारे वाहन चालक, कामगार, प्रवाशांमुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव होऊ नये म्हणून योग्य दक्षता घेतली जात आहे. परराज्यातून येणार्‍याची कोविड तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईऩ केले जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सरकारी पातळीवर योग्य प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात ३१मेपर्यंत लॉकडाऊन
राज्य सरकारने लॉकडाऊन-४ येत्या ३१ मेपर्यत वाढविला आहे. नवीन मार्गदर्शक सूचना सोमवार १८ मे रोजी जारी करण्यात येणार आहेत. लॉकडाऊन ४ मध्ये आणखी काही उद्योगधंदे सुरू करण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. राज्याच्या सीमा, नाके आणि रेल्वे स्थानकावर तपासणी सुविधा आणखी मजबूत केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमत्र्यांनी दिली. रविवारी दिल्लीहून दुसर्‍या रेल्वेने आलेल्या ३६८ प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईऩ करण्यात आले आहेत. कोरोना लाल विभागातून राज्यात येणार्‍या ट्रक चालकांचे सीमेवर स्क्रिनिंग करून चाचणी करण्याचा विचार सुरू आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यातील कोविड इस्पितळामध्ये शंभर खाटांची सोय आहे. तसेच आणखी रुग्णांची सोय करण्याची व्यवस्था आहे. तसेच, व्हॅन्टीलेटरवर २० ते २५ रुग्ण हातळण्याची सोय आहे. तातडीची गरज भासल्यास दुसरे इस्पितळ ताब्यात घेण्याची तयारी ठेवण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

परीक्षा निश्‍चित वेळापत्रकानुसार
राज्यातील दहावीच्या परीक्षेबाबत कुणीही गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. परीक्षा निश्‍चित वेळापत्रकानुसार सुरळीतपणे घेतली जाणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना घेतल्या जात आहेत. परीक्षेसाठी २४६० वर्गांचा वापर केला जाणार आहेत. प्रत्येक पंचायत क्षेत्रात परीक्षा केंद्र सुरू केले जाणार आहे. सीमा भागातून येणार्‍या मुलांच्या सोयीसाठी सीमेवरील शाळेत परीक्षा केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

दिल्लीहून येणारी एक रेल्वे स्थगित
नवी दिल्लीतून गोव्यात येणार्‍या दोन रेल्वेगाड्यांपैकी नवी दिल्ली ते मडगाव ही राजधानी एक्सप्रेस पुढील आठवड्यापासून तूर्त स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.