कोरोनाची ३री लाट ः मुलांसाठी सुवर्णप्राशन

0
136
 • डॉ. मनाली पवार

आता हा कोरोना मुलांना बाधित करणार असेल, तर तसे घडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम कोरोनाची भीती मनातून काढून टाका व आपली व आपल्या मुलांची व्याधी प्रतिकारशक्ती वाढवा. या कोरोनाचे विपरित परिणाम जर मुलांवर होऊ द्यायचे नसतील, तर सर्वप्रथम या तिसर्‍या लाटेची भीती पळवून लावा.

कोविड-१९ ची लागण २०१९ मध्ये झाली, पण भारतात या कोरोनाचा संसर्ग मार्च २०२० पासून सुरू झाला. मार्च २०२० पासूनच साधारण या काळरूपी कोरोनाची भीती तसेच त्याबद्दलचे समज-गैरसमज चालूच आहेत. त्यामुळे याबद्दल शास्त्रीय माहिती जाणणे आवश्यक आहे. कोरोना वृद्धांना झाला तर काय? गर्भवतीला कोरोना झाला तर काय? स्तन्यपान करणार्‍या महिलेला कोरोना झाला तर? डायबेटिक रुग्णामध्ये कोरोनाची बाधा झाल्यास? तसेच खूप महत्त्वाचे म्हणजे मुलांना कोरोनाची बाधा झाली तर … असे अनेक प्रश्‍न सामान्य जनतेच्या मनात गुंतागुंत निर्माण करतात. तिसरी लाट येणार असे का बरे म्हणत आहेत?…
या कोरोना विषाणू व रोगाबद्दल आजपर्यंत बरीच माहिती प्रसार माध्यमातून लोकांनी गोळा केलेली आहे, पण त्याबद्दल चुकीचे समजच जास्त पसरवले गेले. त्यामुळे कोरोना विषाणूबद्दल पहिले जाणून घेऊ.

कोरोना विषाणूचा प्रसार युहान, चीनमधून झाला हे सर्वश्रुत आहे. वटवाघुळामार्फत हे विषाणू संक्रमित झाले. तेव्हापासून या विषाणूबद्दल संशोधन चालूच आहे. पहिले चीनच्या काही प्रांतात हा विषाणू संक्रमित झाला. नंतर पूर्ण देशात, मग एका देशातून दुसर्‍या देशात.. अशाप्रकारे २५० देशात या विषाणूचा प्रसार झाला. खरं तर मानवाने एवढी प्रगती केली, अण्वस्त्रे तयार केली की जी अण्वस्त्रे पृथ्वीचा नाश करू शकतात. पण आज स्थिती अशी आहे की एक सूक्ष्म जंतू, अगदी सुईच्या टोकावर हजारो- करोडो जंतू बसतील अशा जंतुंनी मानवजातीला गुडघ्यावर आणले आहे. आपण हैराण झालो आहोत. यांना कसे नियंत्रणात आणायचे, त्यांचा उपचार काय? याबद्दल सारखे नवनवीन शोध चालूच आहेत.

ह्यापूर्वीही बर्‍याच वेळा साथीचे रोग आलेत. मानवाने बर्‍यापैकी अशाप्रकारच्या साथीच्या रोगांचा सामना केलेला आहे. मग ह्याचवेळी निसर्ग आपल्यावर का कोपला असेल? आपण निसर्गाला आव्हान तर केले नाही ना! या दीड वर्षांत या विषाणूवर बरेच संशोधन झाले. वेळोवेळी उपचारांमध्ये बदल करून करून या आजारावर मात करणे चालू आहे. पण आता ही तिसरी लाट… मुलांच्या बाबतीत त्रासदायक असू शकते अशा बातम्या सर्वत्र प्रसारित होत आहेत. त्याची लक्षणे, उपचार याबाबत डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करणारच. पण महत्त्वाचे आहे ते लोकशिक्षण. उपचारासंबंधी डॉक्टर पाहतीलच, पण निर्बंध मात्र समाजाने पाळायला हवेत.

लहान मुलांमध्ये हा विषाणू संक्रमित होणार असे म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे हा विषाणू सारखे आपले रंग बदलत असतो. म्हणजे यामध्ये जेनेटिक बदल होत असतात. त्यामुळे मोठ्यांच्या शरीरात गेल्यास त्याचा प्रतिकार करण्याचे शिक्षण आता मोठ्या माणसांना झालेले आहे. त्याचप्रमाणे लसीकरण झालेले आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर, या नियमांचे पालन अंगवळणी पडले आहे. पण मुलांसाठी अजून व्हॅक्सीन तयार झाले नाही. मुले बंधन पाळू शकत नाही. तसेच ही मुले गतीशील राहतात. हीच मुले सुपर स्प्रेडर ठरू शकतात. म्हणजेच मुलांना संक्रमण होऊन परत घरचे इतरही संक्रमित होऊ शकतात.

मनुष्याचे मन कमकुवत झाले म्हणजे आपल्याकडे नकारात्मक शक्ती आकृष्ट होते. त्यामुळे प्रत्येकाने नकारात्मक विचार करत राहिल्यास पुढे मुलांना त्रास होण्याची शक्यता असते. आता हा कोरोना मुलांना बाधित करणार असेल, तर तसे घडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम कोरोनाची भीती मनातून काढून टाका व आपली व आपल्या मुलांची व्याधी प्रतिकारशक्ती वाढवा. या कोरोनाचे विपरित परिणाम जर मुलांवर होऊ द्यायचे नसतील, तर सर्वप्रथम या तिसर्‍या लाटेची भीती पळवून लावा. आपल्या सगळ्यांना सावध राहून कोरोनाचा प्रतिकार करायचा आहे. कोरोनाच्या लाटांचा विचार करायचा नाही. कोरोना होता, आहे व राहणार. त्यामुळे अशा कितीही कोरोनाच्या लाटा आल्या तरी कोरोनावर प्रत्येकाने मात करायची आहे व ती ही कोरोना विषाणूसोबत राहूनच. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. हे त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेच उचललेले पाऊल आहे. त्यामुळे कृपया सर्व मुलांनी घरातच राहिले पाहिजे, उगाचच इथे-तिथे फिरता कामा नये. कितीही कंटाळा आला तरी घरातच वेगवेगळे उपक्रम योजून स्वतःला त्यात गुंतवून स्वस्थ रहा.

कोरोनापेक्षा स्वतःला मजबूत बनवा, यासाठी सरकारी सगळ्या नियमांचे पालन कराच, पण त्याबरोबर चांगल्या सात्विक पोषणमुल्ययुक्त आहाराचे सेवन करा. साधे-सोपे शरीर बळकट बनवणारे व्यायाम करा. योगासने- सूर्यनमस्कार यासारख्या व्यायाम प्रकारानेही व्याधीक्षमता वाढते.

आहार –
मुलांना जंकफूड, फास्टफूड, चटपटीत मसालेदार पदार्थच जास्त आवडतात व अशा प्रकारच्या आहाराची त्यांना सवयही झालेली आहे. सुरुवात तर जन्मल्यावर लगेच डबाबंद दूधापासूनच करतात. बाळाला अंगावरचे दूध पुरत नाही. काही महिन्यांनी लगेच कामाला रुजू व्हायचे आहे. या ना त्या कारणांनी बालकांना अंगावरचे दूध मिळत नाही व इथूनच व्याधीक्षमत्व कमी होते व पुढे जो आहार दिला जातो, त्याने पोट भरते, तो जिभेला चवदार लागतो; पण त्यातील पोषणमूल्ये नष्ट झालेली असतात. सध्या हॉटेलमध्ये जाता येत नसल्याने पिझ्झा, बर्गर, केक, तळलेले चिकन इत्यादी पदार्थ घरीच बनवून मुलांना दिले जात आहेत. आया-बायांनो अशा प्रकारच्या आहाराने मुलांचे पोषण होत नाही. त्यांचे कुपोषण होते व व्याधीप्रतिकार शक्तीही वाढत नाही. उलट कमी होते. त्यामुळे ह्या लॉकडाऊनचा फायदा करून घ्या, मुलांना घरात पारंपरिक पदार्थ करून खायला शिकवा. सॉल्टेड बटर, चीज पेक्षा घरातील घरात बनवलेले साजूक तूप, लोणी खायला द्या. दूध, बिस्कीट, ब्रेड, जाम, टोस्ट अशा रुक्ष पदार्थांचा नाश्ता देण्यापेक्षा साजूक तूपातील शिरा, उप्पीठ, उपमा, डोसा, घावणे, थालिपीठ इत्यादी अनेक भारतीय पदार्थ आहेत आणि जे भारतीय मुलांसाठी हितकारक आहेत असे पदार्थ मुलांना खायला घाला, मग बघा, व्याधिक्षमत्व कसे वाढते…!
वरण-भात, तूप, एखादी कडधान्याची उसळ, एखादी फळभाजी किंवा पालेभाजी, लिंबाचे लोणचे, कोथिंबीर अशा प्रकारचे दुपारचे जेवण घेतले तरी हा संतुलित आहार ठरतो. मांसाहारी सेवन करण्याने मासे, चिकन, मटण खावे. फक्त चिकन-मटण हे तेलात तळून भज्यांसारखे खाऊ नये. असे बनवलेले अन्न कितीही जिभेला बरे लागले तरी ते शून्य पोषण देणारे ठरते. विशेष म्हणजे, क्षयरोगासारख्या व्याधीत शरीराची ताकद वाढवण्यासाठी मांसाहाराचे सेवन करण्यास सांगितले जाते.

 • रक्तवाढीसाठी मुलांना गूळ-भिजवलेले शेंगदाणे द्यावेत. मनुका द्याव्यात.
 • कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यापेक्षा खारीक-बदाम खायला द्यावेत.
 • व्हिटामिन ‘सी’साठी आवळ्याचे सर्वच पदार्थ चालतात.
 • एखादं फळ रोज खायला द्यावं. फळाचा शेक करून घेण्याची गरज नाही.
 • वेगवेगळ्या भाज्यांचे सूप सेवन करण्यास द्यावे.
  अशा प्रकारे सात्विक आणि घरात बनवलेला आहार सेवन करण्यास दिल्यास मुलं स्वस्थ, बलवान राहतील व त्यांची व्याधिप्रतिकारशक्तीसुद्धा उत्तम असेल. मग कुठल्याच विषाणूला घाबरण्याची गरजच नाही.

विहार –
विहारमध्ये बौद्धिक खेळांचाही समावेश होतो. त्याचबरोबर प्राणायाम, दीर्घ श्‍वसन, अनुलोम-विलोम, ॐचा उच्चार करणे ही योगसाधना करून घेतल्यास मुलांचे मनोबल वाढले. त्याचबरोबर श्‍वसनाचे आजार होत नाहीत.

औषधोपचार –
व्याधी नसतानाही हा आजार आपल्यास होऊ नये म्हणून घेण्याचे औषधोपचार आयुर्वेद शास्त्रामध्ये मुलांसाठी सांगितले आहे. ज्याने मुलांचे व्याधिक्षमत्व वृद्धिंगत होते, ते म्हणजे सुवर्णप्राशन.

 • आयुर्वेद शास्त्रामध्ये सुवर्ण म्हणजे सोने हे उत्तम रसायनद्रव्य सांगितले आहे व हे सोन्याचे औषध कष्टसाध्य, असाध्य अशा रोगांमध्ये उपयोगात येते.
 • पूर्व दिशेला तोंड करून धुतलेल्या दगडावर थोड्या पाण्याच्या सहाय्याने सोन्याला उगाळावे. तयार झालेल्या चाटणात मध व गाईचे तूप मिसळून ते बालकाला चाटवावे. त्यात मध व गाईचे तूप एकसारखे असू नये. साधारणतः दर महिन्यात येणार्‍या पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन करावे. जन्मापासून १२ वर्षांपर्यंत बालकास सुवर्णप्राशन करण्यास द्यावे.
 • सुवर्णप्राशन नियमित १ महिना, ६ महिने केले तरी हरकत नाही. सध्या सुवर्णप्राशनाचे ड्रॉप्स वैद्यांकडे उपलब्ध असतात.
 • सुवर्णप्राशनाने बालकाची बुद्धी वाढते, त्याला चांगली भूक लागते. त्याची शारीरिक शक्ती वाढते. शरीराची कांती वाढते आणि लहान मुलांमध्ये ‘रोग प्रतिकारक्षमता’ वाढून त्यांचे अनेक रोगांपासून संरक्षण होते, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे.
 • सध्या या कोरोना विषाणूच्या महामारीत मुलांना सुरक्षा कवच म्हणून ‘सुवर्णप्राशन’ द्यावे. चांगल्या वैद्याच्या सल्ल्याने त्यांच्याकडून ‘सुवर्णप्राशन’ थेंब आणून मुलांना नियमित द्यावेत.
 • तसेच सुवर्णसिद्ध जलाचाही उपयोग करावा. सुवर्णसिद्ध जल करण्यासाठी पिण्यासाठी जे पाणी आपण उकळतो, त्यात सोन्याचं एखादं नाणं किंवा सोन्याचं वळसं पाण्यात टाकून पाणी उकळावं व हे पाणी मुलांना प्यायला द्यावं.
 • सुवर्णसिद्ध तूपही मुलांना देऊ शकतात. त्यासाठी लोणी कढवताना आत सोन्याचं नाणं घालून तूप बनवावं व हेच तूप मुलांना खायला द्यावं. अगदी तूप साखर दिवसातून एकदा दिली तरी हरकत नाही.
  मुलांना कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी मनातून भीती घालवा, सात्विक आहार मुलांना द्या. योगद्वारे मुलांना मानसिकरित्या सुदृढ बनवा आणि ‘सुवर्णप्राशन’ चालू करा.