Home बातम्या कोरगावचा चौपाटीतला श्रीगणेश

कोरगावचा चौपाटीतला श्रीगणेश

0

निवृत्ती शिरोडकर

कोरगाव येथील शेट्ये बंधूंचा चौपाटीतला गणपती हा गोमंतकात प्रसिद्ध आहे. या चौपाटीतील शेट्ये कुटुंबाची संख्या दीड हजारांवर पोचलेली आहे. मात्र, आजपर्यंत कुणीही स्वतंत्रपणे चतुर्थीला गणपती पुजलेला नाही. चौपाटीत दर चतुर्थीला ९ ते १० फूट उंचीची मूर्ती पुजली जाते. एका वर्षी फेटाधारी तर दुसर्‍या वर्षी मुकूटधारी महागणपतीची मूर्ती पुजली जाते. या गणेशाचे खास वैशिष्ट्य म्हणजे चतुर्थीच्या दिवशी दुपारी १२ वाजता विधिवत शेट्ये कुटुंबातील हजारो सदस्यांच्या उपस्थितीत मूर्तिकार गणपतीची नजर उघडत असतो.

……….

पेडणे महालाचा गोमंतकाच्या सांस्कृतिक इतिहासात फार मोठा वाटा आहे. या महालावर निसर्गानेही सढळ हस्ते उधळण केली आहे. या तालुक्यातील कोरगाव येथील शेट्ये बंधूंचा चौपाटीतला गणपती हा गोमंतकात प्रसिद्ध आहे. या चौपाटीतील शेट्ये कुटुंबाची संख्या दीड हजारांवर पोचलेली आहे. मात्र, आजपर्यंत कुणीही स्वतंत्रपणे चतुर्थीला गणपती पुजलेला नाही. चौपाटीत दर चतुर्थीला ९ ते १० फूट उंचीची मूर्ती पुजली जाते. एका वर्षी फेटाधारी तर दुसर्‍या वर्षी मुकूटधारी महागणपतीची मूर्ती पुजली जाते. या गणेशाचे खास वैशिष्ट्य म्हणजे चतुर्थीच्या दिवशी दुपारी १२ वाजता विधिवत शेट्ये कुटुंबातील हजारो सदस्यांच्या उपस्थितीत मूर्तिकार गणपतीची नजर उघडत असतो. वैभवशाली पेडणे महालातील हा चौपाटीचा गणपती उत्सव आगळीवेगळी परंपरा सांभाळीत मोठ्या थाटामाटात स्वाभिमानाने साजरा केला जातो. हा गणपती शेट्ये कुटुंबीयांना आनंदाने एकत्रित नांदवत असतो. श्रद्धेला पावणारा हा गणपती अशी शेट्ये मंडळीची भावपूर्ण श्रद्धा आहे.

पेठेचावाडा, कोरगाव येथील पाच शेट्ये कुटुंबीयांपैकी इच्छेटघराणे महत्त्वाचे मानले जाते. या कुटुंबीयांची सदस्य संख्या दीड हजारांपेक्षा जास्त आहे. बहुतेक आपापल्या कामानिमित्त गोव्यात तसेच शेजारच्या राज्यांत विविध ठिकाणी स्थायिक झाले असले तरी चतुर्थीची चाहूल लागताच त्यांचे पाय हळूहळू कोरगाव या आपल्या मूळ जन्मगावी वळतात. आणि चतुर्थीला चौपाटीत शेट्ये कुटुंबीयांचा जनसागर उपस्थित होतो. चतुर्थीच्या उत्सवात शेट्ये कुटुंबीयांनी आपली श्रद्धा आणि निष्ठा कायम ठेवत आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीतही एकाच घरात दोन गणपती पुजले जात असताना शेट्ये मंडळींनी मात्र हजारो लोकांचा एकच गणपती आणि तोही चौपाटीतला गणपती म्हणून नावारूपास आणत इतर कुटुंबीयांना चांगल्या प्रकारे एक आदर्श घालून दिला आहे. या कुटुंबीयांपैकी कुणाच्याही मनात आजपावेतो वेगळा गणपती पुजण्याविषयी विचारही स्वप्नात आलेला नाही हे विशेष! ही कृपा चौपाटीतल्या श्रीगणेशाची असल्याचे शेट्ये मंडळी मानतात.

इच्छेट घराण्याचा हा गणपती जणू एखाद्या राजघराण्यात पुजल्याचा भास होतो. ९६ कुळी क्षत्रिय मराठ्यांचे हे चौपाटी निवासस्थान! पूर्वी अनेक वाड्यांचा हा राजवाडा होता असे सांगितले जाते. या निवासस्थानाविषयी शेट्ये मंडळींना स्वाभिमान आहे. पूर्वीच्या काळी अनेक कुटुंबे मोठमोठ्या घरांमध्ये राहायची. वास्तुस्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना ठरावा असे प्रसिद्ध शेट्ये कुटुंबीयांच्या प्रशस्त घरात मोठे चौक, राजांगण आहे. अंगणाला साजेल असे भव्य तुळशीवृंदावन, मध्यभागी चौक, चौपाटी सभोवताली चोहोबाजूंनी पुष्कळ खोल्या अन् त्यात विस्तारलेली सगळी कुटुंबे. या चौपाटीत पूर्वी बारा कुटुंबे राहत होती.

श्रावण महिना सुरू झाला की शेट्ये कुटुंबातील सदस्यांना चतुर्थीचे वेध लागतात. नागपंचमीला मूर्तिकार चौपाटीत येऊन गणेशमूर्ती तयार करायला प्रारंभ करतो. ही मूर्ती आजपर्यंत पिढ्यान्‌पिढ्या मूळ जागेवरच पूर्वाभिमुख ठेवून तिचे काम सुरू करण्यात येते. ९ ते १० फूट उंचीची मूर्ती तयार केली जाते. ही मूर्ती राजेशाही थाटात असते. एक पाय दुमडून, जणू ही मूर्ती राजमहालात विराजमान झाल्याचा भास गणेशभक्तांना होत असतो. ही गणेशमूर्ती मुकुट किंवा मराठेशाहीच्या फेट्याने सजवलेली असते. दर्शन घेणार्‍या प्रत्येक भक्ताला उजवा हात अखंडपणे आशीर्वाद देत असतो. मूर्तीचा म तिलकही वैशिष्ट्यपूर्ण असा असतो. तो पूर्वीपासून जसा रंगवला जातो तसा आजही रंगवण्याची परंपरा कायम आहे. दोन भुवयांमध्ये ॐ हे अक्षर सारे ब्रह्मांड व्यापून जाते. सोंडेवरील कमल व वेल निसर्गाचे नाते सांगायला मागे पडत नाही. कानपळीवर कोरलेल्या राजमुद्रा, दंडकावर ओढलेले गंध घराणेशाहीची आठवण मनात रुजविते. नागपंचमीच्या दिवशी गणेशमूर्ती करायचे काम हाती घेतल्यावर प्रथेनुसार अष्टमीला कृष्णजयंतीला मूर्ती पूर्ण करण्याची प्रथा आहे. गणेशमूर्ती चतुर्थीपर्यंत पूर्णपणे रंगवून तयार केली जाते. मात्र, नजर आजपर्यंत चतुर्थीच्या दिवशी दुपारी १२ वाजता उघडण्याची प्रथा आहे. हा सोहळा आगळावेगळा असतो. सर्वांसमक्ष सर्वांच्यावतीने नारळाची ओटी गणपतीसमोर ठेवली जाते. सर्व शेट्ये कुटुंबाचे सदस्य देवाला शरण येतात आणि रंगमूर्तीकार मूर्तीची नजर उघडण्यास सुरुवात करतो. पूर्वी ही भव्य मूर्ती शशिकांत कोरगावकर हे कलाकार तयार करत होते. त्यांच्या पूर्वी त्यांचे वडील ही मूर्ती बनवत. शशिकांत कोरगावकर हे वयस्क झाले असल्याने आता ही मूर्ती उत्तम साळगावकर हे कलाकार मूर्ती साकारत आहेत. आज जरी साळगावकर यांची मूर्ती सुबक होत असली तरी पूर्वीच्या मूर्तीचे संस्कार या कुटुंबावर एवढे झाले आहेत की तयार होत असलेल्या मूर्तीत हे शेट्ये कुटुंबीय शशिकांत कोरगावकर घडवीत होते त्या मूर्तीची बैठक, रंगसंगती शोधतात व तद्वत साळगावकर यांच्याकडून ती तयार करून घेतात. शेट्ये कुटुंबीयांपैकी राजमोहन शेट्ये हेदेखील चित्रकार असल्याने तेही मूर्तिकाराला रंगकामात मदत करतात.

या महागणपतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्रीगणेश मातीच्या १२ मोठ्या गोळ्यांपासून तयार केला जातो. १२ गोळे म्हणजे १२ नैवेद्य घेऊन येणारी १२ शेट्ये कुटुंबे. एकदा का महागणपतीची नजर उघडली की सारा परिसर गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या गजराने दुमदुमून जातो. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. सगळ्या कुटुंबातली लहानथोर मंडळी एकत्र येतात. सुहासिनींकडून ओवाळून मूर्तीचे विधिवत पूजन झाल्यानंतर पाच दिवस चौपाटीचा गणेश उत्सव रंगतो. मूर्तीचे विधिवत पूजन झाल्यानंतर मखरात मूर्ती सजविली जाते. आकर्षक रोशणाई केली जाते. संबंध सभागृहात केलेली सजावट पाहून दर्शनाला येणारा प्रत्येक गणेशभक्त देहभान विसरून जातो. सजावट कामात कुटुंबातील सर्व तरुण मंडळी, बालगोपाळ ८ ते १० दिवस दिनरात्र पूर्व तयारी करतात. त्यांचा थकवाही दूर होतो. पहिल्या दिवशी संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत ४ ते ५ वाजतात व नंतरच नैवेद्य दाखवून तो ग्रहण केला जातो. फुगड्या, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविधांगी खेळ सर्वांना नकळत बालपण आठवून देतात. सर्वजण देहभान विसरून नृत्यखेळ प्रकारांत भाग घेतात. तिसर्‍या दिवशी नावाजलेल्या गायकगायिकांचा संगीत कार्यक्रम उत्सवाचा आनंद द्विगुणित करतो. चौथ्या दिवशी कीर्तन उत्सवाने मनावर संस्कार रुजविले जातात. वाड्यावरील सर्व लहानथोर चौपाटीत येऊन चौपाटीकरांच्या आनंदात सहभागी होत असल्याने उत्सवाला आनंदाचे भरते येते. इच्छेट घराण्याचे शेजारच्या पित्रे या ब्राह्मण घराण्याशी अतूट नाते आहे. पूर्वजांकडून प्रस्थापित झालेले हे संबंध आजही या पिढीने जोपासण्याचे महान कार्य चालूच ठेवले आहे. त्यांच्या शुभहस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या उत्सवाचा अगदी आनंदाला उधाण आणणारा क्षण अन् दु:खही तेवढेच देणारा दिवस म्हणजे पाचवा दिन. सकाळी पूजाअर्चा, नैवेद्य व सर्व एकत्र येऊन होणारे जेवणाचे म्हामणेयाची लज्जत काही औरच असते. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर शेट्ये कुटुंबातील सर्व मंडळी श्रीसमोर बसून महाप्रसादाचा लाभ मोठ्या भक्तीभावे घेतात. सर्वांनी एकत्र येऊन तयार केलेला महाप्रसाद मी वाढू की तू वाढूया भावनेने एकमेकांचे नाते वृद्धिंगत होण्यास मदत करतो. पाहणार्‍याच्या भावना उचंबळून येतात. नकळत आनंदाच्या अश्रुधाराही डोळ्यांतून वाट मोकळ्या करतात. संध्याकाळी प्रत्येकजण देवापुढे श्रीफळ ठेवून गार्‍हाणे घालतात. ते श्रीफळ मोठ्या भक्तिभावाने कौलप्रसाद म्हणून आपल्या घरी वर्षभर पूजेसाठी ठेवतात. अनेकजणांची देवाने केलेली मागणी पूर्ण झाल्याचा साक्षात पुरावा पाचव्या दिवशी गावातील अनेकजणांकडून नेलेल्या कौलप्रसादामुळे कळून येतो, हाच या महागणपतीचा साक्षात्कार!

परंपरेप्रमाणे इच्छेट घराण्याचा इच्छेटमूळपुरुष व राष्ट्रोळी अवसर येऊन सर्वांना आशीर्वाद देतात. उत्तरपूजा व गार्‍हाणे होते. नंतर सर्व कुटुंबे एकत्र येऊन मोठ्या झाडाचे बुंधे आसनस्थ गणपतीच्या चौरंगाला बांधतात व मूर्ती आसनावरून खाली आणताच ज्ञानबा तुकाराम, गणपती बाप्पा मोरयाऽऽ च्या गजरात विसर्जनाची मिरवणूक निघते. बायकांच्या फुगड्या, पुरुष मंडळीची दिंडी, भजन, लहान मुलांची फटाक्यांची आतषबाजी यामुळे सारा परिसर मंगलमय होऊन जातो. गावातील लहानथोर मंडळी या मिरवणुकीत सहभागी होत असल्याने हर्षोल्हासाचा वारा सर्वत्र वाहतो. रात्री बाराच्या सुमारास कोणीरयेते महागणपतीची आरती, सामूहिक गार्‍हाणे झाल्यावर शंभरदोनशे लोक मूर्ती खांद्यावर घेऊन विसर्जनासाठी पाण्यात जातात. याप्रसंगी कुटुंबातील सदस्यांना उमलून येणार्‍या भावना, डोळ्यांतून वाहणारे पाणी पाहिल्यावर ही मंडळी श्रीला किती भजतात याची प्रचिती येते. प्रत्येकजण श्रीला पुढच्या वर्षी लवकर येण्याचा आग्रह करत जड अंत:करणाने निरोप देतात. बालगोपाळांपासून थोरापर्यंत सर्वजण जड पावलांनी घरी परततात. ते पाच दिवस म्हणजे जणू पाच महिने एकत्र नांदल्यागत प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडत असतो. याच प्रेमाने, आपुलकीने पुन्हा पुढच्या वर्षाची वाट बघत प्रत्येकजण विसर्जनानंतर आपापल्या कामानिमित्त राहत्या ठिकाणी परततात. हा गणेशोत्सव आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या जमान्यात एकसंधतेचा नकळत संदेश देतो.

चौपाटी घराण्याच्या गणपतीचे जसे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे, तद्वत चोपडे येथे एकनाथ चोडणकर यांच्या निवासस्थानी गणपती ऐवजी शंकरपार्वती पुजण्याची परंपरा आहे. आगरवाडा येथील बगळी व कांचोळेवाडा, मोरजी येथील सदानंद शेटगावकर यांच्या घरात एकाच माटोळीखाली दोन गणपती पुजण्याची प्रथा आजही आहे.

…………..