कोने-प्रियोळ येथे हमरस्त्यावर काल दुपारी १.२० च्या दरम्यान झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात तिघेजण जखमी झाले. अपघातातील चारही वाहनांची मोडतोड झाली. हमरस्त्यावर अपघात झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागून बराच वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अपघातात सापडलेल्या वाहनांत दोन रीक्षा, एक मारुती कार व एका टेम्पोचा समावेश होता. दरम्यान, जखमींपैकी आयुब खान (४७) रा. कुर्टी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला गोमेकॉत पाठविण्यात आले. महमंद अक्तर (३४) व पांडुरंग हनुमंत पाटील (३८) रा. कुर्टी यांना येथील आयडी इस्पितळात दाखल केले आहे. फोंडा पोलिसांना खबर दिल्यानंतर फोंडा पोलीस स्टेशनचे हवालदार दिलीप सिनारी यांनी सहकार्यांसह जाऊन पंचनामा केला व वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, काल दुपारी काराय-शिरोडा येथे जुवारी नदीच्या पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. येथील लोकांनी फोंडा पोलिसांना खबर दिल्यानंतर फोंडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मोहन गावडे यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित यंत्रणेचा आधार घेऊन मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

