कोणाला फसवताय?

0
205

क्षुल्लक, क्षुल्लक म्हणत राज्य सरकार निकालात काढू पाहात असलेला कोरोना आता गोमंतकीयांच्या गळ्याला फास बनू लागला आहे. काल खुद्द मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या गावी – साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडले. मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या सरकारी गृहनिर्माण वसाहतीपर्यंत हे लोण पोहोचले आहे. एकीकडे कोरोनासंदर्भात आपली तथाकथित ‘कर्तबगारी’ सांगणार्‍या नेत्यांच्या सरकार पुरस्कृत मुलाखतींची जाहिरातबाजी चालली असली तरी या ‘पेड न्यूज’ मुळे गावोगावचे कोरोनाचे प्रत्यक्ष वास्तव काही आता लपून राहू शकत नाही. गोव्याच्या खेड्यापाड्यांमध्ये त्याबाबत अतिशय चिंतेचे वातावरण आहे आणि कोरोनाला अटकाव करण्यात सरकारला आलेले सपशेल अपयश ते जेवढे झाकू पाहते, तेवढेच दिवसागणिक ते अधिकाधिक उघडे पडत चालले आहे.
गेले काही दिवस मोठ्या प्रमाणावर कोरोनाची रुग्णसंख्या सापडू लागताच दैनंदिन पत्रकार परिषद घेणार्‍या आरोग्य सचिव एकाएकी गायबच झाल्या. गेल्या नऊ – दहा दिवसांत त्यांनी आपली रोजची पत्रकार परिषदच घेतलेली नाही. आरोग्य खात्याने केवळ एका प्रसिद्धी पत्रकातून मोघम आकडे देण्याचा कातडीबचाऊ मार्ग स्वीकारला आहे, मात्र, या प्रसिद्धी पत्रकांतले आकडेदेखील आधल्या दिवसाच्या आकड्यांशी जुळताना दिसत नाहीत, एवढ्या बेफिकिरीचा कारभार सध्या राज्यात चाललेला आहे. गावोगावचे कोरोना रुग्णांचे आधल्या दिवशीच्या पत्रकात दिलेले आकडे दुसर्‍या दिवशीच्या पत्रकात त्याहून कमी दाखवण्याचा चमत्कारही नित्याचा झाला आहे. गेले काही दिवस सातत्याने सत्तर, ऐंशी नवी रुग्णसंख्या सापडल्याची कबुली दिली जाते, परंतु त्या नव्या रुग्णांची बेरीज देखील जुळत नाही. राज्याचे आरोग्य संचालक, आरोग्य सचिव त्याबाबत अवाक्षर काढताना दिसत नाही. खुद्द आरोग्यमंत्र्यांची ट्वीटस् पाहिली तर त्यात राज्याची सद्यस्थिती मांडण्याऐवजी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांचे लक्ष पदोपदी स्वतःकडे वेधण्याची धडपडच दिसते. मुख्यमंत्री आपल्या सार्वजनिक कार्यक्रमांमधून सामाजिक दूरी पाळा, मास्क घाला वगैरे आवाहने जनतेला करीत असले, तरी त्यांच्याच कार्यक्रमांमध्ये सामाजिक दूरीचा फज्जा उडालेला पाहायला मिळतो त्याचे काय? म्हापशातील शिवपुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्याची छायाचित्रे काय सांगतात?
एक गोष्ट एव्हाना पुरेपूर स्पष्ट झाली आहे ती म्हणजे सरकार कोरोनाबाबतची वस्तुस्थिती पुन्हा पुन्हा लपवू पाहते आहे. कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यात आलेले अपयशच त्यातून त्यांना झाकायचे आहे हे उघड आहे. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी जनतेला वस्तुस्थिती सांगा, तिला विश्वासात घ्या, तिचा सहभाग घ्या असे वारंवार सांगून आम्ही थकलो, परंतु जनतेला ना विश्वासात घेतले जाते आहे, ना तिला सत्यस्थितीबाबत अवगत केले जाते आहे. सारा लपवाछपवीचा केविलवाणा कारभारच अजून चालला आहे.
एखाद्या गावी रुग्णसंख्या वाढली की तेथे अतिशय नाईलाजाने कंटेनमेंट झोन घोषित केला की आपले काम संपले असा आरोग्य खात्याचा समज झालेला असावा. त्यातून या कंटेनमेंट झोनांमागचा उद्देशच विफल होताना दिसतो आहे. मांगूर तत्परतेने कंटेनमेंट झोन घोषित होऊनही तेथून रुग्णसंख्या वास्को शहरात आणि इतरत्र फैलावत गेलीच ना? मांगूरशी संबंधित जे दोनशेहून अधिक रुग्ण आहेत ते गोव्यात कोणकोणत्या गावी किती सापडले आहेत याचा तपशील सरकारने अजूनही जाहीर केलेला नाही. तो केला जाण्याची शक्यताही दिसत नाही, कारण ते केले तर कोरोना संपूर्ण गोव्याला कसा व्यापून राहिला आहे हे लख्खपणे समोर येईल याची सरकारला भीती आहे.
इंदिरानगर – चिंबल, जुवारीनगर, मोतीडोंगर अशा गच्च वस्तीच्या वस्त्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडणे ही फार गंभीर बाब आहे याचे भान सरकारला येणार कधी? मोठी रुग्णसंख्या सापडली तरी तेथे कंटेनमेंट झोन घोषित करायलाच आज सरकार तयार दिसत नाही. त्यात जी टाळाटाळ केली जाताना दिसते ती अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी की आपल्याला त्या कंटेनमेंट झोनचे व्यवस्थापन झेपणार नाही या भीतीपोटी? एखाद्या ठिकाणी फारच निरुपाय होताच कंटेनमेंट झोन घोषित केला की आपली जबाबदारी संपली असा प्रशासनाचाही समज झाला आहे की काय नकळे, परंतु ज्या प्रकारे मांगूर हिलमधील जनतेच्या संतापाचा कडेलोट झालेला दिसून आला, ते पाहता त्या नागरिकांना किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तताही प्रशासनाला तेथे करता आलेली नाही हे कळून चुकते. नुसते कंटेनमेंट झोन घोषित करून नागरिकांना महिनोन्‌महिने डांबून ठेवणे हा त्यांच्यावरील अन्याय आहे.
बघता बघता मांगूरचे ‘स्थानिक संक्रमण’ राज्यव्यापी ‘सामाजिक संक्रमणा’च्या रूपात केव्हा प्रकटले हे जनतेला कळले देखील नाही. गावोगावी नव्याने सापडणार्‍या रुग्णांचा बादरायण संबंध मांगूरशी जोडून मोघम आकड्यांत ते रुग्ण निकाली काढण्याचा आरोग्य खात्याचा आटापिटा पुढे पुढे हा संबंधही जोडता येईनासा झाल्यावर केविलवाण्या स्थितीला पोहोचला. सरतेशेवटी स्वतः मुख्यमंत्र्यांना राज्यात सामाजिक संक्रमण झाले असल्याची कबुली देण्याची नामुष्की पत्करावी लागली. दिल्लीमध्ये आज देशातील सर्वाधित रुग्णसंख्या आहे, परंतु तेथे देखील सामाजिक संक्रमण झालेले नाही हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेथे आम आदमी पक्षाचे सरकार असून देखील स्पष्ट केलेले आहे आणि आपल्या एवढ्याशा गोव्यामध्ये मात्र सरकारला सामाजिक संक्रमण रोखता आलेेले नाही ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. गोवा हे देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य झाल्याची शेखी मिरवण्यासाठी पुढे आलेल्यांनी आजच्या या दारुण अपयशाची जबाबदारी स्वीकारण्यासाठीही पुढे येण्याची जरूरी आहे. आधी राज्यातील कोरोनाचा फैलाव नाकारत हे सगळे बाहेरून आलेले रुग्ण आहेत असे सरकार सांगत राहिले. नंतर मांगूरच्या नावे शिमगा घातला गेला. आता गोव्याचा एकही तालुका असा राहिलेला नाही की जिथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडलेले नाहीत. कोविड चाचण्यांचे प्रमाण सरकारने वाढवण्याऐवजी खाली आणले असतानाची ही स्थिती आहे. देशातील कोरोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवणार्‍या केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांच्या पावलावर पाऊल टाकून उद्या खरोखरीच राज्यात सार्वत्रिक चाचण्या झाल्या, तर प्रत्यक्षातील रुग्णसंख्या किती असेल याची कल्पनाही करवत नाही. लक्षणविरहित रुग्णांना सामान्य जनतेने चाचण्यांविना ओळखायचे कसे? सर्वसामान्य जनतेचा जीव सरकारने धोक्यात आणला आहे. बेपर्वा नेत्यांनी तिला कोरोनाच्या जबड्यामध्ये ढकलले आहे. या राज्याला बेजबाबदार राजकीय नेतृत्वच खड्‌ड्यात घालील असे आम्ही म्हटले होते. आजचे वास्तव वेगळे काय सांगते आहे?
आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका निर्धाराने कोरोनाशी लढत आहेत याचे गोमंतकीयांना कौतुक निश्‍चितपणे आहे, परंतु राजकीय नेतृत्व ज्या प्रकारे परिस्थितीपुढे हतबल झालेले दिसते आहे आणि तसे असूनही ‘पडलो तरी नाक वर’ म्हणतात तसे जणू कुठे काहीच घडलेले नाही अशा पवित्र्यात बेदरकारपणे वावरत आहे ते पाहणार्‍या जनतेच्या मनामध्ये आज त्याप्रती तीव्र संताप खदखदू लागला आहे. स्वयंप्रेरणेने गावोगावी सुरू राबविल्या जाणार्‍या लॉकडाऊनमधून त्याप्रती अविश्वास व्यक्त होऊ लागला आहे. स्वतःच स्वतःच्या कोरोना हाताळणीचे कितीही गोडवे जरी गायिले, भाट आणि चारणांनी त्याची री ओढली, तरी गावोगावी दिवसागणिक सापडणारे मोठमोठे आकडे काही वेगळेच वास्तव सांगत आहेत. जनता सुज्ञ आहे. तुम्ही कोणाला फसवता आहात? स्वतःच स्वतःची फसवणूक तर करून घेत नाही ना?