Home बातम्या कोकणचा राजा झिम्मा खेळतो…

कोकणचा राजा झिम्मा खेळतो…

0

– श्रीरंग व्यंकटेश जांभळे

फळांचा राजा- आंबा. उन्हाळा सुरू झाला की सर्वांना आंब्याचे वेध लागतात. पण या वर्षी या राजाने त्याच्या चाहत्यांना बरीच हुलकावणी दिली आहे. तसे आंब्याच्या काही जाती सोडल्या तर बर्‍याचशा जाती या दरवर्षी लागणार्‍या नव्हेत. गोव्याचा नावाजलेला ‘मानकुराद’ हा त्याच प्रकारातला. त्यामुळे एक वर्षी चांगले पीक व दुसर्‍या वर्षी ‘खाडा’ अशी स्थिती सर्वदूर पाहायला मिळते. पण तरीही सरासरी उत्पादन दरवर्षी आपण अनुभवतो. पण या वर्षी मात्र बाजारात फारच कमी प्रमाणात आंबा दिसतोय. आंबा मोहरण्याच्या वेळेपासून शेतकरी वर्गात ‘यंदा आंब्याचे पीक कमी असणार’ अशी चर्चा ऐकायला मिळत होती. फोंडा तालुक्यातील कुंडई, मडकई हा भाग आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. कुंडईतील आंब्याच्या एका व्यापार्‍याने (रेनकार) तर कुंडई गावात हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच झाडे लागली असल्याचे सांगितले. हे असे का?

सध्या बदलत्या हवामानाची चर्चा जोरात सुरू आहे. सर्व पिकांमधील उत्पादनात होणारे बदल, येणारी रोगराई ही बदलत्या हवामानाच्या परिणामस्वरूप असल्याचे बोलले जाते. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार देशाच्या अग्नेय किनार्‍यावर थैमान घातलेल्या त्सुनामीनंतर हे हवामान बदल जाणवण्याइतपत पुढे आले आहे. म्हणजे अवेळी पाऊस, थंडीचा लपंडाव, तापमानात वाढ अशा गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. याचा परिणाम झाडांच्या वाढीवर व पिकाच्या उत्पादनावर होताना दिसतो.

त्यात आंबा हे हवामान बदलाच्या दृष्टीने फारच संवेदनशील पीक आहे. गेल्या काही वर्षांत हिवाळा सुरू झाल्यावर सलग थंडी पडलेली अनुभवास येत नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात मोहोर येत नाही. जसजशी टप्प्याटप्प्याने थंडी पडेल तसतसा थोड्या-थोड्या कालांतराने मोहोर येतो. अशा प्रकारे आलेला सर्व मोहोर टिकत तर नाहीच, उलट यामुळे झाड अशक्त होते. गेल्या ३-४ वर्षांत अभ्यास व निरीक्षणातून पहिला मोहोरच जास्त चांगले पीक देतो असा निष्कर्ष निघतो. यंदा आंब्याच्या बागांसाठी प्रसिद्ध आपल्या जवळच्या असलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी भागात आंब्याचे उत्पादन ५० टक्के असल्याचे सांगितले जाते. त्यातही मोहोर उशिरा आल्याने आंबा उशिरा हाती येईल. अर्थात काही पीक पावसात वाया जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून खवय्यांना मनसोक्त आंबा खायला मिळणार नाही आणि शेतकर्‍यालाही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी सहन करावी लागेल.

तसेच सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते. फुलोर्‍याच्या वेळी तापमान अचानक वाढल्यास फुलातील परागीकरणाला व त्यानंतर फलधारणेसाठी आवश्यक भाग कोरडे पडल्याने परागीकरण व फलधारणेच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन नंतर मोहोर करपतो. फलधारणा झाल्यानंतर तापमानात मोठी वाढ झाल्यास बाष्पीभवनाद्वारे (र्एींरिेींीरपीळिीरींळेप) पाणी कमी झाल्याने फळाची गळ होते.

अशा या हवामानातील बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर होतो.

गोव्यात राज्याच्या कृषी संचालनालयाच्या अंदाजानुसार ४७६० हेक्टर जमीन आंबा लागवडीखाली आहे. येथील सरासरी उत्पादकता पावणे दोन टन प्रति हेक्टर असून एकूण उत्पादन ८५३६ टन इतके आहे. अर्थात राज्यात आंब्याची सलग लागवड नसल्याने अशा प्रकारची पक्की आकडेवारी उपलब्ध करणे फार कठीण आहे. राज्यात शेती-बागायतीत इकडे-तिकडे अशी काही झाडे शेतकर्‍यांकडे आढळतात. उपलब्ध माहितीनुसार आंब्याची सलग मोठी लागवड राज्यात फारच कमी शेतकर्‍यांनी केली आहे. सासष्टी तालुक्यात सर्वात जास्त (१५२५ हेक्टर) जमीन आंब्याखाली आहे. गोवा जसा काजूसाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो आंब्याच्या विशेष जातींसाठीही प्रसिद्ध आहे. मानकुराद, मालगेस, शावेर, फेर्नादीन, कुलासो अशा अनेक जाती त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु व्यापारी दृष्टिकोनातून आंब्याची लागवड करण्याचे शेतकर्‍यांनी मनावर घेतलेले दिसत नाही.

आज जो मानकुराद प्रसिद्धीच्या झोतात आहे, ती झाडे फार जुनी व बियांपासून केलेली लागवड आहे. कलमांपासून केलेली लागवड अगदी अलीकडच्या काळातील व फारच कमी प्रमाणात आहे. त्यामुळे या जुन्या लागवडीत वैविध्य (इळेवर्ळींशीीळींू) फार आहे. हे वैविध्य एवढ्या प्रमाणात आहे की त्यामुळे आंब्याच्या निर्यातीतही अडचणी येऊ शकतात असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच ही जुनी झाडे फार मोठी असल्याने फळे काढणी, बांडगूळ काढणी ही कामे जिकिरीची ठरतात. मोठ्या झाडांवर चढून ही कामे करणे हा कौशल्याचा भाग असून असे कौशल्यपूर्ण मजूर मिळणे आता दुरापास्त झाले आहे. मजुरीचे प्रमाणही महागाईच्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ग्राहकाच्या घरात पोचलेला आंबा गोड लागला तरी त्यामागचा प्रवास हा एक प्रकारे दिव्यातून गेलेला असतो.

गोव्यात काजूची व्यापारी तत्त्वावर लागवड व मशागत करण्याचे जसे शेतकर्‍याने मनावर घेतले आहे, तसे आंब्याच्या बाबतीत होताना दिसत नाही. आंबा दरवर्षी न लागणे, काजूपेक्षा जास्त कुशल कामगारांची आवश्यकता, फळांचा टिकाऊपणा (डहशश्रष श्रळषश) कमी असल्याने असलेली जोखीम यामुळे असावे, पण आंब्याच्या बाबतीत शेतकर्‍याने व्यापारी दृष्टिकोन आत्मसात करण्याचा विचार केलेला दिसत नाही. येथे आंब्याची झाडे फुलोरा आल्यावर किंवा फलधारणा झाल्यावर पारंपरिक व्यापार्‍यांना (रेनकाराना) दिली जातात. त्यामुळे शेतकर्‍यापेक्षा हे रेनकार आंब्याच्या बाबतीत जास्त व्यापारी दृष्टिकोन बाळगतात. सलग व सघन लागवडीत ज्याप्रकारे तुडतुडे व इतर किडी व रोग आढळतात त्याप्रकारे गोव्यात विरळ असलेल्या झाडांमध्ये कीड व रोगाचा प्रादुर्भाव आढळत नाही. परंतु बांडगुळांनी वेढलेल्या फांद्या खूप ठिकाणी आढळतात. बांडगुळे आंब्याच्या फांद्यांतील रस शोषून घेतात. वेळीच बांडगुळे काढून न टाकल्यास झाड सुकून मरून जाते. अशा प्रकारे बांडगुळे काढायला कुशल मजूर न मिळाल्याने किंवा शेतकर्‍याचे दुर्लक्ष झाल्याने बरीच चांगली झाडे मरून गेली. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बांडगुळासोबत झाडावरील मेलेल्या फांद्या कापणेही महत्त्वाचे आहे. यामुळे सूर्यप्रकाश खेळता राहतो.

सूर्यप्रकाश खेळता राहावा यासाठी अन्यही काही मशागतीची कामे तज्ज्ञांनी सांगितली आहेत. झाडाचा मध्यभाग उघडा राहावा याप्रकारे मधल्या फांद्या कापाव्यात. जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन केल्यास २-३ वर्षांत झाडे पुन्हा जोमाने पीक देण्यास सुरुवात करतात. यासाठी पाऊस संपल्यावर बाहेरील, मनगटाएवढ्या जाडीच्या फांद्या कापण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे झाडाला योग्य आकार प्राप्त होऊन सूर्यप्रकाश खेळता राहतो व याचा चांगले उत्पादन मिळण्यात उपयोग होतो.

आंब्याची व्यापारी क्षमता खूप आहे. पिकलेला चांगला आंंबा जसा खाण्यासाठी वापरला जातो तसाच तो कॅनिंगसाठीही वापरला जातो. परंतु मानकुराद आंब्यात केसराचे प्रमाण असल्याने कॅनिंगसाठी तो निरुपयोगी ठरतो. गोव्यात आंबापोळी (आंब्याचे साट) प्रसिद्ध आहे. परंतु यासाठी गोटी आंबा (घोट) वापरला जातो. त्याच्या आंबट-गोड चवीमुळे त्याला बरीच मागणी आहे. आंबापोळी करण्याचा छोटेखानी घरगुती व्यवसाय गावातील बर्‍याच घरांमध्ये आढळतो. कैर्‍यांचे लोणचे, लहान कैर्‍या मिठात घालून टिकवणे (दोणातल्या आंबल्या) अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने केलेले पदार्थ गोव्यात फारच लोकप्रिय आहेत. यामुळे खाण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पिक्या फळांच्या सोबत प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार्‍या जातींचाही लागवडीच्या वेळी व्यापारी दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. याद्वारे रोजगार निर्मितीलाही मदत होते. याबाबतही शेतकर्‍यांमध्ये जागृती व योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.

आंबा हे कोरडवाहू पीक (पावसाच्या पाण्यावर जगणारे व सिंचनाची गरज नसणारे) म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला कलमाद्वारे लागवड केल्यानंतर आधीची ३-४ वर्षे पाणी दिल्यास कलमाची वाढ चांगली होते. एकदा झाड स्थिर झाल्यावर ते फक्त पावसाच्या पाण्यावर जगू शकते, ही संकल्पना आता बदलण्याची आवश्यकता समोर येत आहे. व्यापारी दृष्टिकोनातून पीक घेणार्‍यांसाठी फुलोरा येऊन कणी धरेपर्यंत थोड्या सिंचनाची उपलब्धता करून दिल्यास बदलत्या हवामानात अचानक वाढणार्‍या तापमानाचा पिकावर जास्त प्रतिकूल परिणाम होणार नाही. सेंद्रिय पद्धतीने या पिकाची मशागत केल्यास बदलत्या हवामानाचे धक्के सहन करण्याची झाडाची आंतरिक क्षमता वाढते असेही तज्ज्ञांच्या लक्षात आले आहे. यामुळे पिकाचा उत्पादन खर्चही कमी होतो व जोखीमही कमी होते. मशागतीवर जास्त खर्च करूनही पीक हाती न आल्यास मोठे आर्थिक नुकसान होते. कल्टार या संजीवकाचा सर्रास वापर करणारे कोकणातील आंबा बागायतदारही या नुकसानीने पोळल्यानंतर हळूहळू सेंद्रिय पद्धतीकडे वळताना आढळतात.

आंबा पीक येणार्‍या प्रदेशात सरसकट कुठेही आंब्याची लागवड करणे फायदेशीर नसल्याचे आता तज्ज्ञ सांगतात. यासाठी काही विशिष्ट भाग (िेलज्ञशींी) शोधणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे. यासाठी आंब्याची नवीन लागवड करताना तज्ज्ञांचा, अनुभवी शेतकर्‍यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन केल्यास हवामानाशी जुळवून घेण्याची पिकाची क्षमता वाढेल, शेतकर्‍याची जोखीम कमी होईल व या चांगल्या प्रतीच्या प्रदूषणरहित उत्पादनाला बाजारपेठही चांगली मिळाल्याने शेतकर्‍याला चांगला फायदा मिळेल.

हवामानाच्या बदलाबाबत अतिसंवेदनशील असल्यामुळेच असेल कदाचित, असे म्हटले जाते की, ज्यावर्षी आंब्याचे उत्पादन चांगले येते त्यावर्षी कोकणातील अन्य फळफळावळ (उदा. काजू, जांभूळ, करवंदे इ.) पीक चांगले येते. आंब्याच्या राजेशाहीला सर्वदूर मान्यता आहे. काही भागातील आर्थिक क्षेत्रातील निर्विवाद वर्चस्व ओळखून काही राज्यांनी हवामान बदलामुळे आंबा उत्पादनाच्या होणार्‍या नुकसानीला विम्याचे कवच उपलब्ध करून दिले आहे. तसेच कवच राज्य सरकारने गोव्यातील आंबा उत्पादकांना उपलब्ध करून दिल्यास आंबा उत्पादकांना नक्कीच दिलासा मिळेल. तसेच जास्ती शेतकरी आंबा उत्पादनाकडे वळू शकतात.

आंब्याचे महत्त्व साहित्यातूनही समोर येते. ‘आंबा पिकतो, रस गळतो! कोकणचा राजा झिम्मा खेळतो!’ या ओळी लहानपणापासून आपल्याला परिचित आहेत. आंब्याचे दर्शन व प्रत्यक्ष चव आपल्या सर्वांना सुखावून जाते. अशा या राजाबरोबर झिम्मा खेळण्यासाठी त्याला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढणे आवश्यक आहे. याकामी कृषी शास्त्रज्ञ, शासकीय यंत्रणा, शेतकरी व ग्राहक या सर्वांनीच प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.