कॉ. गोविंद पानसरे यांचे अखेर निधन

0
92

कोल्हापुरात झाला होता प्राणघातक हल्ला
अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले डाव्या चळवळींचे पितामह कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी काल रात्री ११च्या सुमारास ब्रीच कँडी इस्पितळात अखेरचा श्‍वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने काल त्यांना नानावटी इस्पितळातून पुढील उपचारासाठी ब्रीच कँडी इस्पितळात महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार हलविण्यात आले होते.मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळामध्ये उपचारा दरम्यान पानसरे यांच्या फुफुसात रक्तस्त्राव झाला तसेच त्यांना रक्ताची उलटी झाल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. गेल्या सोमवारी १६ रोजी सकाळी गोविंद पानसरे त्यांच्या पत्नी उमा यांच्यासोबत सकाळी फिरून परतत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून पळ काढला होता. त्या हल्ल्यात ते तसेच त्यांची पत्नीही गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर पानसरे यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, काल त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी विमानाद्वारे मुंबईच्या ब्रीड कँडी इस्पितळात हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे इस्पितळातील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, पानसरे यांच्यावर हल्ला झालेल्या घटनेला चार दिवस उलटूनही हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नसल्याने सर्व स्तरांतून पोलीस तसेच सरकारवरही प्रखर टीका होत आहे.
या हल्लाप्रकरणी पोलिसांनी तीन मोटारसायकली जप्त केल्या असून संशयितांची रेखाचित्रे जारी केली आहेत. मुंबई क्राइम ब्रँचचे एक पथक कोल्हापुरात स्वतंत्रपणे तपास करीत आहेत. या जीवघेण्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असल्याने तपासाला गती मिळाली असली तरी हल्लेखोरांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.