स्पष्टीकरण मागणार : सुधाकर रेड्डी
प्रदेश कॉंग्रेस समितीने आयोजित केलेल्या लोकसमृद्धी यात्रेच्या समारोप सोहळ्यास अल्प प्रतिसाद मिळाला. या समारोप सोहळ्यास उपस्थित न राहिलेल्या आमदार मंत्र्यांकडून कॉंग्रेस पक्ष स्पष्टीकरण मागणार असल्याचे राष्ट्रीय सचिव सुधाकर रेड्डी यांनी काल समारोप सोहळ्यात बोलताना सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला निवडून दिल्यास गोवा हे आदर्श राज्य घडविण्यासाठी पक्ष सर्व प्रकारचे सहकार्य देऊन गोव्याचा रंगरुप बदलून कायापालट करण्याचे आश्वासन रेड्डी यांनी दिले. या वेळी गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली. पक्षासाठी कोण काम करत आहेत त्याची माहिती आपण कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यात्रा यशस्वी करण्यासाठी वावरलेले प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांचे व त्यांच्या सहकार्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
गोव्यात नेतृत्व बदल होणार अशा अफवा पसरविल्या जातात, असे सांगून नेतृत्वबदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
महिला सबलीकरण
राज्यातील प्रत्येक महिला स्वावलंबी होणार यासाठी आपले सरकार प्रयत्न करीत असल्याचे सांगून समाजातील प्रत्येक घटकांच्या कल्याणासाठी आपल्या सरकारने योजना राबविल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या भाषणात दिली.
या यात्रेच्या निमित्ताने गेल्या साडेचार वर्षात सरकारने काम केले याची जनतेला माहिती देणे शक्य झाले. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्यावेळी कार्यकर्त्यांना उत्तरे देणे कठीण होणार नाही, असे ते म्हणाले.
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी गेल्या पन्नास वर्षांच्या काळात गोव्याने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी जनमत कौल दिला नसता तर काय झाले असते, असा प्रश्न शिरोडकर यांनी केला. प्रत्येक बाबतीत गोव्याच्या विकासावर कॉंग्रेस पक्षाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री रवी नाईक व सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचे भाषण झाले. फर्नांडिस यांनी आपल्या भाषणात मलेरिया कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे कळकळीचे आवाहन सरकारला केले.
या सोहळ्यात आलवार पेरेरा, विश्वास देसाई, कांता घाटवळ, फ्लावीयन डायस, शेख अब्दुल गनी, रामा सावंत, सुकडो चिमणो नाईक, सदानंद नाडकर्णी या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
पक्षाचे उपाध्यक्ष कांता गावडे यांनी स्वागत केले. अमरनाथ पणजीकर यांनी सूत्रसंचालन केले. आलविन गोम्स यांनी सत्कारमूर्तींची माहिती दिली. यात्रेचा प्रवेश आझाद मैदानावर झाल्यानंतर हुतात्मा स्मारकाजवळ मेणबत्त्या पेटवून हुतात्मांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास आमदार प्रताप गावस व शाम सातार्डेकर उपस्थित होते. वरील मान्यवर वगळता सरकारातील एकही मंत्री, आमदारांनी सोहळ्यास अनुपस्थित राहणेच पसंत केले.