कॉंग्रेस आमदारांचा विधानसभेत गदारोळ

0
72

काल सकाळी ११.३० वा. सभागृहाचे कामकाज सुरू झाले असता आज होऊ घातलेली पणजी महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक पुढे का ढकलली याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करीत विरोधी कॉंग्रेस आमदारांनी सभागृहात एकच गोंधळ घातला. भाजप आमदार सुभाष फळदेसाईही आरोग्य खात्याशी संबंधीत प्रश्‍न विचारीत असताना आलेक्स रेजिनाल्ड लारेन्स, बाबुश मोन्सेर्रात, विजय सरदेसाई, पांडुरंग मडकईकर व जेनिफर मोन्सेर्रात यांनी सभागृहातील सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन सभापतींशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

पणजीचे महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक आजच्या आज घ्यायला लावा, असा हट्ट या सदस्यांनी यावेळी सभापतींशी धरला. मात्र तो अधिकार आपला नसल्याचे सांगून सभापतींनी मागणी फेटाळली. मात्र त्यामुळे संतप्त बनलेल्या वरील सदस्यांनी आणखी जोरजोरात गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर सभापतींनी १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. याच दरम्यान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व बाबुश मोन्सेर्रात यांच्यात बाचाबाचाही झाली. यावेळी बाबुश मोन्सेर्रात हे अत्यंत संतप्त बनले होते. १० मिनिटानंतर कामकाज पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर कॉंग्रेस सदस्यांनी पुन्हा सभागृहात गदारोळ माजवला. यावेळी पुन्हा एकदा आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, बाबुश मोन्सेर्रात, जेनिफर मोन्सेर्रात, पांडुरंग मडकईकर व विश्‍वजित राणे यांनी सभापतींच्या आसनाकडे पुन्हा धाव घेऊन तेथे जाऊन गोंधळ घातला. ‘लोकशाही हाय हाय, नगरपालिका वेचणुको जाय जाय’, अशा घोषणा त्यानी यावेळी दिल्या. मात्र, त्याही परिस्थितीत सभापतींनी सभागृहाचे कामकाज चालू ठेवले. एका बाजूने विरोधक गोंधळ घालीत असतानाच दुसर्‍या बाजूने भाजप आमदार सुभाष फळदेसाई हे सांगे आरोग्य केंद्राविषयीचा प्रश्‍न विचारत होते व आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे त्याना उत्तरे देत होते.

मात्र नंतर अपक्ष आमदार नरेश सावळ हे प्रश्‍न विचारत असताना व आरोग्यमंत्री त्याना उत्तर देत असताना कॉंग्रेस आमदारांनी सभागृहात फेर्‍या मारीत गोंधळ घालायला सुरवात केल्यानंतर सभापतीनी आमदार बाबुश मोन्सेर्रात, विजय सरदेसाई व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स याना आपल्या चेंबरमध्ये येऊन भेटण्याची सूचना करून १२.३० वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. मात्र नंतर पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा मॉविन गुदिन्हो सोडून सर्व कॉंग्रेस आमदारांनी सभागृहावर बहिष्कार घातला. यावेळी मॉविन गुदिन्हो यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना आपली मते मांडली.