कॉंग्रेस, आप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

0
14

कॉंग्रेस पक्षाने येत्या १४ फेब्रुवारीला होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सात उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेली दुसरी यादी काल जाहीर केली. तर आपनेही आपल्या दहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

कॉंग्रेसने पेडण्यातून जितेंद्र गावकर, सांताक्रूझमधून रूडाल्फ फर्नांडिस, कुंभारजुवेतून राजेश फळदेसाई, वाळपईतून मनीषा शेणवी उसगावकर, दाबोळीतून कॅप्टन व्हिराटो फर्नांडिस, कुठ्ठाळीतून ओलांसिओ सिमॉंन्स, नावेलीतून आवेर्तान फुर्तादो यांच्या नावाचा समावेश आहे.
कॉंग्रेसच्या पहिल्या यादीतील आलेक्स रेजिनाल्ड यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला आहे. पर्येचे आमदार, ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. ज्येष्ठ नेते राणेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसच्या केंद्रीय समितीने मये आणि फातोर्डा हे दोन मतदारसंघ गोवा फॉरवर्डला दिले आहेत.

उमेदवारी जाहीर केल्यानंतरच
प्रचार सुरू करणार ः बाबूश

पणजीचे भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात बाबूश मोन्सेरात यांनी आपला प्रचार आज सोमवारपासून सुरू करणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. मात्र आता त्यांनी आपली ही घोषणा मागे घेत पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानतंरच प्रचाराला प्रारंभ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आपचे दहा उमेदवार घोषित

आम आदमी पक्षाने काल रविवारी आपल्या आणखी दहा उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर केली.
या यादीत सांतआंद्रे मतदारसंघात पक्षाने रामराव वाघ यांना उमेदवारी दिली असून कळंगुट मतदारसंघात सुदेश मयेकर, ताळगाव मतदारसंघात सेसिल रॉड्रिग्ज, मये मतदारसंघात राजेश कळंगुटकर, कुंकळ्ळी मतदारसंघात प्रशांत नाईक, म्हापसा मतदारसंघात राहूल म्हांबरे, वेळ्ळी मतदारसंघात क्रुझ सिल्वा, काणकोण अनुप कुडतरकर, सावर्डे अनिल गावकर तर फातोर्डा संदेश तेलेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या पहिल्या १० उमेदवारांची यादी ७ डिसेंबर रोजी जाहीर केली होती.

दोघे माजी आमदार
आम आदमी पक्षाने आतापर्यत जाहीर केलेल्या त्यांच्या उमेदवारांच्या यादीत दोघा माजी आमदारांचा समावेश आहे. महादेव नाईक व एलिना साल्ढाणा हे ते दोघे माजी आमदार असून दोघेही भाजपचे माजी आमदार आहेत.

आमदारकीचा राजीनामा देत प्रसाद गावकर कॉंग्रेसमध्ये

सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आमदारकीचा राजीनामा काल सादर करून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गोवा विधानसभेच्या आठ आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर, आमदार चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटाचे तृणमूल कॉंग्रेस पक्षात विलीनीकरण केले आहे.

राजीनामा दिलेल्यांमध्ये कॉंग्रेसचे लुईझीन फालेरो, रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड, भाजपच्या एलिना साल्ढाणा, कार्लुस आल्मेदा, गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर, अपक्ष रोहन खंवटे आणि प्रसाद गावकर यांचा समावेश आहे. कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी माजी आमदार प्रसाद गावकर यांचे कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात स्वागत केले. सांगेचे माजी आमदार गावकर यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा काही महिन्यांपूर्वी निर्णय घेतला होता. माजी आमदार गावकर यांनी आपल्या निर्णयात बदल करून तृणमूल कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांचे बंधू आणि समर्थकांनी तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी माजी आमदार गावकर यांनी राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्यासमवेत नवी दिल्ली येथे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचीदेखील त्यांनी भेट घेतली होती. दरम्यान, भाजयुमोचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन तिळवे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे गोवा प्रभारी गुंडूराव यांनी तिळवे यांचे स्वागत केले.