गोवा मुस्लीम फोरम
कॉंग्रेस पक्षाने मुसलमान बांधवांचा विश्वासघात केलेला असून त्याचा बदला म्हणून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील दीड लाख मुसलमान बांधव कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करणार असल्याचे गोवा मुस्लिम फोरमचे मुख्य समन्वयक शेख इफ्तिकार यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही मुरगांव मतदारसंघातून सैफुल्ला खान याना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. एम. के. शेख याना उमेदवारी देण्याची, तसेच फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी आम्ही कधीही केली नव्हती, असे ते म्हणाले. फातोर्डा मतदारसंघात फक्त १८०० मुसलमान मतदार असून त्या मतदारसंघात आम्ही उमेदवारी मागितली नव्हती, असे ते म्हणाले. राज्यातील मुसलमानांच्या विविध समस्या व प्रश्न असून ते विधानसभेत मांडण्यासाठी एका मुसलमान आमदाराची आवश्यकता असल्याचे शेख इफ्तिकार म्हणाले.
मुरगांव मतदारसंघातून सैफुल्ला खान याना उमेदवारी द्यावी यासाठी गोवा मुस्लिम फोरमचे कॉंग्रेसचे गोवा प्रभारी जगमितसिंग ब्रार, सुधाकर रेड्डी तसेच गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांना निवेदने दिली होती. वरील नेत्यांनीही सैफुल्ला खान याना उमेदवारी देण्याचे मान्य केले होते.
मात्र, शेवटच्या क्षणी त्याना डावलून संकल्प आमोणकर याना उमेदवारी देण्यात आल्याचे ते म्हणाले. गेल्या १५ वर्षांपासून कॉंग्रेसने मुसलमाना बांधवांना उमेदवारी न देण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे शेख इफ्तिकार म्हणाले.
गोवा मुस्लिम फोरमचे सदस्य राज्यातील चाळीसही मतदारसंघात कॉंग्रेसविरोधी प्रचार करणार असल्याचे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला गोवा मुस्लिम फोरमचे समन्वयक फिरोज खान, शेख हसन मन्सूर, अली शेख व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे गोवा अध्यक्ष झिया रिकार्टी हेही हजर होते.