राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुढील विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडे १२ जागांची मागणी करताना आणखीही काही पूर्वअटी कॉंग्रेसपुढे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
आम्ही युतीसंबंधीचे आमचे पर्याय खुले ठेवले आहेत, असे कालच्या आघाडीच्या बैठकीत स्पष्ट केल्याचे मगो पक्षातील सूत्रांनी सांगितले तर आम्ही युतीसाठी इच्छुक आहोत मात्र आमच्या ज्या काही अटी आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत, असे आम्ही बैठकीत स्पष्ट केले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सूत्रांनी सांगितले. मात्र, निवडणूकपूर्व युतीबाबत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काल जी बोलणी झाली ती सकारात्मक अशीच होती, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात युती झाल्यास त्यात दोन्ही पक्षांचा फायदा आहे हे दोन्ही पक्षातील नेत्यांना पटले आहे, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. मात्र, आम्हाला युतीची गरज नाही. कॉंग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशा स्वरूपाची जी विधाने गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसचे जे काही नेते करू लागले आहेत त्यांनी ती करणे बंद करावे व युतीसाठीचा मार्ग मोकळा करावा, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचे पक्षांतील सूत्रांनी सांगितले.
मगोने मात्र आपण युतीसाठीचे पर्याय खुले ठेवले असल्याचे कालच्या बैठकीत स्पष्ट करताना युतीसाठीचा निर्णय घेण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे तीच योग्य वेळी काय तो निर्णय घेईल, असे यावेळी स्पष्ट केले.
कालच्या बैठकीला मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, कॉंग्रेसचे गोवा प्रभारी जगमितसिंग ब्रार, सुधाकर रेड्डी तर राष्ट्रवादीच्यावतीने डॉ. प्रफुल्ल हेदे, पक्षाच्या केंद्रीय निरीक्षक भारती चव्हाण, प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र सिरसाट व मंत्री जुझे फिलीप डिसोझा हे हजर होते. ही प्राथमिक टप्प्यातील बैठक होती. आता पुढील बैठक नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सूत्रानी स्पष्ट केले.