26.1 C
Panjim
Friday, June 25, 2021

कॉंग्रेसने जे पेरलेय, तेच आज उगवतेय!

  • देवेश कु. कडकडे

आज कॉंग्रेसवाले लोकशाही बुडाल्याचा जो कांगावा करतात, संविधानावर हल्ला झाल्याचे आरोप करतात, त्याची सुरूवात कॉंग्रेसनेच केली आहे. आमदार फोडणे ही काही नवी बाब नाही.

राज्यकर्ता कसा असावा, याचे विवेचन अनेक ग्रंथांत केले आहे. राजा हा उपभोगशून्य स्वामी, चारित्र्यसंपन्न असा आदर्श असावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. आधीचे राजा साधुसंतांच्या आशिर्वादाबरोबरच त्यांचे मार्गदर्शन घेत असत. आजचे राजकारणी आपल्याच पक्षाच्या विचारसरणीला बांधील नसतात. ते कशाही रीतीने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नरत असतात. पक्षनिष्ठ, बांधिलकी, तत्त्वनिष्ठा, विचारसरणी फक्त व्याख्यानातून उगाळायची असते. वेळ आली की हे सर्व बासनात गुंडाळून सत्तेसाठी इतरत्र पळापळी करायची. आजच्या नेत्यांच्या विचारात आणि कृतीत काहीच एकवाक्यता नाही, तसेच राजकीय पक्ष म्हणून या देशात कोणत्याच पक्षाला कसलीच प्रतिष्ठा उरलेली नाही. आज भारतीय राजकारणात पांडित्य, राजकारणाचा अभ्यास, चारित्र्य वगैरे गोष्टींची मुळीच आवश्यकता नाही. तुम्ही किती आमदार विकत घेऊ शकता, लोकांना फसवणारी किती वक्तव्ये करता येतात की नाही यावर तुमची राजकीय ताकद अवलंबून असते. सत्तेपुढे सर्व काही क्षम्य आहे. प्रतिपक्षावर तोफा डागाव्या लागतात. वेळ आली तर आमदार फोडावे लागतात किंवा फुटून दुसर्‍या पक्षात जावे लागते. खोटी आश्‍वासने, विकृत विचार सर्व काही खपून जाते. सध्या ज्या राजकीय पक्षाच्या दिशेने सत्तेचे वारे वाहते, त्या पक्षात जास्त पळण्याची शर्यत लागते. सत्तेसाठी तर पक्षच काय, आपल्या कुटुंबियांचीही तमा बाळगली जात नाही.
सध्या गोव्यात जे नाटक चालू आहे ते काही नवीन नाही. ती आपली परंपरा आहे. या नाटकांतील अभिनेते जरी नवीन असले तर संहिता जुनीच आहे. २०१७ साली गोव्यात भाजपा घटक पक्षाचे सरकार अस्तित्वात आले, तेव्हापासून घटक पक्षाची अवाजवी लुडबूड, अपक्षांची अरेरावी वर्तन हे मुख्यमंत्री पर्रीकर असताना उफाळून आले नाही, परंतु ही ब्याद नवीन मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात कितपत राहील याची शंकाच होती. त्यामुळे या घटक पक्ष आणि अपक्षांना दूर ठेवण्यासाठी हा मोठा सापळा रचण्यात आला आणि कॉंग्रेसवाले त्यात अलगद अडकले. केंद्रात परत भाजपचीच सत्ता आल्याने गोव्यातील भाजपाची राजवट कधीतरी पडेल ही शक्यता दुरावली गेली. अशावेळी सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेणे किंवा जमल्यास सत्तेत सहभागी होणे हा पवित्रा काही कॉंग्रेसवाल्यांना योग्य वाटला. जोडीला मतदारसंघाचा विकास होत नाही, हे सबळ कारण होतेच, त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. कॉंग्रेसमध्ये पक्षाशी इमान राखण्याची परंपरा ही कधीच नव्हती. आजच्या काळात तर असण्याची शक्यता तसुभरही नाही. हे पक्ष सोडून जे भाजपात आले आहेत, त्यांच्यापैकी काहीजणांच्या धरसोडपणाची आणि जाहीर वाच्यता यापूर्वीही झाली आहे.

वारंवार होणार्‍या पक्षांतराला लगाम घालण्यासाठी १/३ संख्येच्या पक्षांतरावर बंदी लादून ती २/३ संख्येच्या पक्षांतराला मान्यता देण्यात आली, जेणेकरून कमीत कमी पक्षांतराला संधी मिळावी. त्यामुळे मोठ्या संख्येच्या पक्षांतराला लगाम बसला, मात्र काही आमदारांनी सरळ राजीनामा देऊन पक्षांतर केले आणि परत निवडणुका लढविण्याचे नवीन तंत्र शोधून काढले. मोठी घाऊक पक्षांतरे घडविणे ही तशी महाकठीण बाब मानली जाते. मात्र असे अवघड कृत्य गोव्यातील आमदारांनी सिद्धीस नेले तेव्हा अनेकांनी आश्‍चर्याने तोंडात बोटे घातली. खरेच गोव्यातील एकेक आमदारांची कामगिरी पाहिली की, एक नवे नीतीशतक रचता येईल. फक्त निती या शब्दाचा अर्थ बदलला की झाले. गोव्यात जे घडले, ते काही अकस्मात नव्हते तर पूर्वनियोजित होते. त्याची जमवाजमव चालू होती. फुटिरांचे नेतृत्व करणार्‍या कॉंग्रेसच्या सेनापतींनी काही दिवसांपूर्वी विधानभवनातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राला विरोध दर्शविला होता. आता ते तिथे नतमस्तक होणार असे दिसते. मोदींच्या कामाने प्रेरित होऊन आपण भाजपात प्रवेश केला आहे, असे जे त्यांनी उद्गार काढले तेव्हा तर गोव्याच्या जनतेचे कान तृप्त झाले. काल ज्यांच्या नावाने बोटे मोडली, त्यांच्याच नावाचा जप करावा लागत आहे. ही कसरत मोठी अडचणीची असली तरी सत्तेशी जुळवून घेतल्याशिवाय राजकारणातील मानसन्मान कुठून लाभणार?
कॉंग्रेसची आजची अवस्था कशी झाली, याला त्या पक्षातील मुजोर नेते कारणीभूत आहेत. कॉंग्रेसला नेता निवडण्यासाठी चार-पाच दिवस लागतात. मला नेतेपद मिळाले नाही तरी चालेल, परंतु पक्षातील इतर नेत्याला मिळता कामा नये, हाच सदैव दुष्ट बुद्धीचा खेळ चालू असतो. कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे कॉंग्रेस नेते छाती फुगवून सांगतात. या स्वातंत्र्याबरोबरच आणखी एका स्वातंत्र्याची भर घातली, ते म्हणजे आपल्या चेल्यांना लुटण्याचे स्वातंत्र्य दिले. प्रत्येकाचा काही एक काळ असतो. कॉंग्रेसने ५० वर्षांचा सुवर्णकाळ आनंदात भोगला. तशीच परिस्थिती अनंत काळापर्यंत राहील ही आशा करणे हावरट प्रवृत्तीचे लक्षण आहे. आज कॉंग्रेसवाले लोकशाही बुडाल्याचा जो कांगावा करतात, संविधानावर हल्ला झाल्याचे आरोप करतात, त्याची सुरूवात कॉंग्रेसनेच केली आहे. आमदार फोडणे ही काही नवी बाब नाही. पक्ष सोडणे, दुसर्‍या पक्षात प्रवेश करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. अर्थात तो कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे. याची प्रथम सुरुवात इंदिरा गांधींनी ४०-५० वर्षांपूर्वी केली. १९८० साली कॉंग्रेसचे सरकार येताच इंदिरा गांधींनी देशातील जनता दलाचे सरकार असलेली ८ राज्ये बरखास्त केली. अपवाद हरियाणाचा होता, कारण तेथील जनता दलाचे नेते भजनलाल यांनी तेथील जनता पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला आणि आपले मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवले. गोव्यात तर अनेक वेळा मगो पक्षाच्या आमदारांना मंत्रीपदे देऊन कॉंग्रेस पक्षात घेण्यात आले. जिकडे बेरीज मोठी तिकडे सत्ता हा सिद्धांत कॉंग्रेसने सुरू केला. आज तोच त्यांना भोवतो आहे. आज कॉंग्रेसची पडती बाजू आहे. कधी नव्हे इतकी कॉंग्रेसची क्रूर चेष्टा आज नियतीने चालविली आहे. ‘घर फिरले की घराचे वासे फिरतात’ असे म्हणतात ते हे असे.

आपल्याला हे विदारक चित्र पाहून हळहळ वाटते, परंतु त्याचा काय उपयोग! वेळ आली की आपणच या नेत्यांबरोबर फरफटत जातो. जनताच अशा फुटीर नेत्यांच्या आरती ओवाळत असते. जनतेच्याही आशा-आकांक्षा वाढलेल्या आहेत. त्यांना नोकर्‍या हव्यात, आपल्या गावात साधन-सुविधा हव्यात. विरोधी पक्षात राहून आमदारांना हे करणे शक्य नाही. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या आमदारांची कामे अडवून ठेवतात. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहात कितीही आवेशपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण भाषण केले किंवा हिरारीने मुद्दे मांडले तरी त्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नसते. फक्त आपल्या भागाचा सर्वांगिण विकास झालेला हवा. निवडणुकीच्यावेळी लोक जाब विचारतात. अशाने कोणत्या तोंडाने मते मागणार? या सर्व गोंधळात जे पक्षाशी इमान बाळगणारे, कार्यक्रमावर श्रद्धा ठेवणारे, स्वतःचा स्वार्थ न बघता क्रियाशील सर्वस्व देणारे कार्यकर्ते मात्र हतबल होतात. संधिसाधू लोक यात आपले हात वाहत्या गंगेत धुवून घेतात. भाबडे कार्यकर्ते मात्र तोंडघशी पडतात.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच

>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...

राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...

ALSO IN THIS SECTION

आयएमएफचा वेधक अंदाज

हेमंत देसाई जागतिक नाणेनिधीने भारताचा जीडीपी दर साडेबारा टक्के तर चीनचा ८.६ टक्के असेल असा थेट अंदाज व्यक्त...

अलक्ष लागले दिवे

(‘नवप्रभा’ दिवाळी अंक- २०२० मध्ये प्रसिद्ध) डॉ. अनुजा जोशी(नामवंत कवयित्री) दिवे लागले रे दिवे लागले...

कोरोना संकटाचा पुढील टप्पा घातक

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सध्या देशात कोरोनाची ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी...

कोविड-१९ ला अटकाव करायचा कसा?

अमिताभ कांत आणि ऋचा रश्मी या आजारामुळे शहरी अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि देशाच्या जीडीपीमध्ये शहरे महत्त्वाचे योगदान देतात हे नाकारता येणार नाही....

चीन संकटात, भारताला संधी

शैलेंद्र देवळणकर कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण...