येथे आयोजित भारत विजय मेळाव्यात बोलताना मोदी यांनी देशाच्या सध्याच्या दुर्दशेस कॉंग्रेस, सपा आणि बसपा यांचे व्होट बँकेचे राजकारण कारणीभूत असल्याचा दावा केला. आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी उदाहरणही दिले. ते म्हणाले की युपीए सरकारने तीन वर्षांपूर्वी बुलंदशहर जिल्ह्यासह देशभरातील मुस्लिमबहुल ९० जिल्ह्यांची निवड विकासकामांसाठी केली होती; परंतु हे सरकार त्यांच्यासाठी निधीची तरतूद करण्यात अपयशी ठरले याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘‘त्यांना (कॉंग्रेसला) मुस्लिम, धर्मनिरपेक्षता व व्होट बँक यांची आठवण होते ती केवळ निवडणुकीवेळी’’ असे ते म्हणाले.
या सभेसाठी मोदी निर्धारीत वेळेपेक्षा दीड तास उशिरा पोचले. त्याबद्दल त्यांनी भाषणाच्या प्रारंभी दिलगिरी व्यक्त केली. आपण जम्मूतील वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेल्याने विलंब झाल्याचे ते म्हणाले. २०१४ची निवडणूक ही सर्वार्थाने वेगळी आहे. कारण कॉंग्रेस, सपा, बसपा व रालोद असे सर्व पक्ष एका गरीब चहावाल्याविरोधात (स्वत:कडे अंगुली निर्देश) उभे आहेत.
मोदींच्या गयातील सभेत गोंधळ; लाठीमार
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभास्थानी काल गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मोदींच्या भाषणाच्या थोड्या अवधीअगोदर ही घटना घडली. येथील गांधी मैदानावर सुमारे सात तास सभेची वाट पाहत थांबलेले लोक अस्वस्थ बनले व त्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. काहींनी बॅरीकेड्स मोडल्या तर काहीजण प्रसार माध्यमांसाठी आरक्षित केलेल्या जागेत घुसले. पोलिसांनी लाठीचार्जची तयारी केल्याचे दिसून आल्यावर जमाव अधिकच गोंधळला व पळापळ सुरू झाली. पोलिसांवर चपलेही फेकून मारण्याचा प्रकार घडला.
दरम्यान, नंतर भाजप नेत्यांनी शांततेचे आवाहन केले व सभा घेण्यात आली. गेल्यावर्षी पटना येथील मोदींच्या सभेत स्फोट झाले होते.

