कॉंग्रेसचे ‘चिंतन’

0
72

गेली अडीच वर्षे जवळजवळ अज्ञातवासात गेलेल्या गोवा प्रदेश कॉंग्रेसला पुन्हा पालवी फुटू लागल्याचे दिसते आहे. जॉन फर्नांडिस यांच्याकडे प्रदेश कॉंग्रेसची सूत्रे गेल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या झाडाझडतीत पक्षाची सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी पक्षापासून दुरावली होती. लुईझिन फालेरोंकडे प्रदेशाध्यक्षपद येताच ही मंडळी पुन्हा जवळ आली आणि आता पक्षाला पुन्हा सत्तेच्या दिशेने नेण्यासाठी काय करावे लागेल याचे ‘चिंतन’ नुकत्याच झालेल्या चिंतन शिबिरामध्ये त्यांनी केले. या चिंतनातून विद्यमान भाजप सरकारवर पंधरा कलमी आरोपपत्र जारी करण्यात आले आहे. आरोपांची ही नामावली पाहिली, तर यापैकी बर्‍याच गोष्टी खुद्द कॉंग्रेसच्याच शासनकाळात सुरू झाल्या होत्या असे दिसेल. त्यामुळे त्यांचे खापर विद्यमान सरकारवर फोडणे कितपत योग्य असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये उभा राहिल्यावाचून राहणार नाही. राज्यातील खाणींमध्ये बेेबंदशाही कोणाच्या राजवटीत मातली होती? नोकर्‍यांना खिरापतीचे स्वरूप कोणाच्या राजवटीत आले होते? कॅसिनोंपासून अंमली पदार्थांपर्यंतच्या गैर गोष्टींना कोणी गोव्यात मुक्तद्वार मिळवून दिले? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले, तर कॉंग्रेसच्या गेल्या राजवटीकडेच अंगुलीनिर्देश होतो. त्यामुळे या आरोपपत्राचा पायाच कमकुवत होताना दिसतो. खरे तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतरच पक्षाने आपल्या पराभवाची कारणे शोधून त्या चुकांची भरपाई करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतु ते घडले नाही. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारवर विरोधी पक्ष म्हणून अंकुश ठेवणे हे कॉंग्रेसचे कर्तव्य आणि जबाबदारीही होती. परंतु त्यातही अक्षम्य कसूर झाली. सरकारविरुद्ध ब्र काढण्याची कोणाची प्राज्ञा झाली नाही. त्यामुळे आता एवढ्या कालावधीनंतर आरोपपत्र जारी करणार्‍या प्रदेश कॉंग्रेसला तिच्या नेत्यांनी गेली अडीच वर्षे मौन का बाळगले होते याचे उत्तर आधी द्यावे लागणार आहे. गेल्या विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाचे कारण पक्षाची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले असा साक्षात्कार या चिंतन शिबिरात नेत्यांना झाला. त्याचे खापर अर्थातच प्रसिद्धी माध्यमांवर फोडण्यात आले आहे आणि आता स्वतःची वृत्तवाहिनी किंवा स्वतःचे मुखपत्र सुरू करण्याचा गांभीर्याने विचार कॉंग्रेस पक्ष करीत आहे. पण कॉंग्रेसच्या राजवटीत, मग ती केंद्रातली असो किंवा गोव्यातली असो, चांगल्या गोष्टींपेक्षा गैरगोष्टीच जास्त घडल्या होत्या आणि जनता त्यांना विटली हे मात्र मान्य करण्याची कॉंग्रेस नेत्यांची तयारी दिसत नाही. केंद्रातील डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये घोटाळ्यांमागून घोटाळे घडले तिला काय ‘कामगिरी’ म्हणायचे? देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जाऊन पोहोचली, महागाईच्या कडाक्याने जनता हैराण झाली हिला ‘कामगिरी’ म्हणायचे? हे सगळे बदलले पाहिजे अशी तीव्र आकांक्षा जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याचाच फायदा घेत मोदी सरकार सत्तेवर आले. गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय घडले? घराणेशाहीने गोव्यात कॉंग्रेस पक्ष गिळंकृत केला आहे की काय असे जनतेला वाटावे अशा तर्‍हेने तिकीटवाटप झाले. मतदारसंघ ही आपली पिढीजात जायदाद असल्याच्या थाटात नेते वागत राहिले. त्याचा फटका अर्थातच मतदानयंत्रातून जनतेेने दिला. आता जेव्हा कॉंग्रेस आगामी विधानसभा निवडणुकांकडे नजर ठेवून पुन्हा नव्याने उभारी घेऊ पाहात आहे, अशा वेळी आपल्याकडून घडलेल्या चुकांचे चिंतन करण्याचा खुलेपणाही नेत्यांनी ठेवला पाहिजे. केवळ विद्यमान सरकारप्रती नकारात्मक प्रचार करणे ही पक्षाच्या पुनरुज्जीवनाची योग्य दिशा म्हणता येणार नाही आणि स्वतःची मुखपत्रे सुरू केली आणि वृत्तवाहिन्यांवर स्वतःच्या आरत्या ओवाळून घेतल्या म्हणजे जनमत आपल्या बाजूने वळेल असा जर कोणाचा समज असेल तर त्याला शहाणपण म्हणता येणार नाही. आधी जनतेच्या मनामध्ये स्वतःविषयी व स्वतःच्या पक्षाविषयी विश्वास तर निर्माण करा. गेल्या काही वर्षांमध्ये सपशेल गमावलेली विश्वासार्हता पुन्हा प्राप्त केल्याखेरीज आपल्या शब्दांवर विश्वास ठेवणार कोण? कमकुवत नेतृत्व, दिशाहीन कारभार, नकारात्मक वृत्ती हे जोवर बदलणार नाही, तोवर अशा चिंतनाला काही अर्थ नाही!