कॉंग्रेसची गळती सुरूच

0
19

गुलाम नबी आझादांपाठोपाठ आनंद शर्मांसारखा ज्येष्ठ नेता कॉंग्रेसला रामराम ठोकून पक्षाबाहेर पडला आहे. हे एवढे ज्येष्ठ नेते पक्षातून तर बाहेर पडले आहेतच, शिवाय गुलाम नबी जम्मू काश्मीरच्या आणि शर्मा हिमाचल प्रदेशच्या निवडणूक सुकाणू समितीमधूनही बाहेर पडले आहेत हे लक्षात घेतले तर याचा राजकीय फटकाही त्या राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाला सोसावा लागू शकतो. जहाजाला गळती लागल्यागत एकेक ज्येष्ठ नेता कॉंग्रेस पक्षातून निमित्त शोधून बाहेर पडतो आहे आणि जाणार्‍यांना थांबवण्यासाठी पक्षाला नवचेतना देण्याऐवजी कॉंग्रेस नेतृत्व मात्र हताशपणे हे जाणे बघत बसले आहे.
वास्तविक या महिन्यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड व्हायची आहे. २३ नेत्यांच्या गटाने दोन वर्षांपूर्वी सोनिया गांधींना खरमरीत पत्र लिहिल्यानंतर पक्षामध्ये आमूलाग्र संघटनात्मक फेररचना करण्याची घोषणा झाली, त्यानुसार कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष आता निवडला जायला हवा. पण ज्या प्रकारे पक्षामध्ये हताश वातावरण आहे, एकेक निष्ठावंतही साथ सोडून चालता होतो आहे ते पाहता कॉंग्रेसचे भविष्य अंधःकारमयच दिसते. गुलाम नबी काय, आनंद शर्मा काय, एकेकाळी हे सोनिया गांधींचे उजवे हात होते. सीताराम केसरींना अध्यक्षपदी आणून सोनियांना कोपर्‍यात ढकलण्याचा जेव्हा जोरदार प्रयत्न झाला, तेव्हा सोनियांची साथ देणारे जे मोजके नेते होते, त्यात आनंद शर्मा होते. असे निष्ठावंत आज पक्षात भवितव्य नसल्याचे जोखत बाहेर निघाले आहेत.
राहुल गांधींनी पक्षात नवसंजीवनी आणण्यासाठी पुढील महिन्यापासून भारत जोडो यात्रेची घोषणा केली होती. देशाच्या बावीसही राज्यांतून ही यात्रा नेण्याचा स्वप्नवत व महत्त्वाकांक्षी कार्यक्रम त्यांनी आखला आहे. पण भारत जोडायला निघालेल्या राहुल गांधींमुळेच पक्ष तुटत चालला आहे त्याचे काय? सततच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांच्याकडे कोणी कधीच गांभीर्याने पाहात नाही. जरा कुठे चमक दाखवल्याने देशातील कॉंग्रेसजनांमध्ये त्यांच्याविषयी अपेक्षा निर्माण व्हावी, तर हे महाशय इटलीत सुटीवर निघालेले दिसतात. मध्यंतरी त्यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे मोठ्या अपेक्षेने सुपूर्दही केली गेली, परंतु निवडणुकीतील एका पराभवाने ते एवढे हवालदिल झाले की निवडणुकोत्तर मंथनासाठीच्या बैठकीला अर्ध्यावर टाकून ते बाहेर पडले ते पुन्हा अध्यक्षपद स्वीकारायलाही राजी झाले नाहीत. परिणामी १९९९ पासून २०२२ पर्यंत मधला थोडासा राहुल यांचा कार्यकाळ सोडल्यास सोनिया गांधींवरच कॉंग्रेसची धुरा राहिली आहे. या काळात भाजपामध्ये कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जनकृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथसिंग, नितीन गडकरी, अमित शहा आणि जगत्प्रकाश नड्डा एवढे अध्यक्ष होऊन गेले, पण लोकशाहीची बात करणार्‍या कॉंग्रेसमध्ये मात्र सोनिया एके सोनियाच चालले आहे.
आता ज्या प्रकारे एकेकाळचे सोनियानिष्ठच बंडाचा झेंडा फडकावून पक्षाबाहेर चालले आहेत, ते पाहता येत्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एक तर राहुल गांधींनी किंवा झालेच तर प्रियांका गांधींनी पक्षाध्यक्षपदाची धुरा घेऊन गांधी घराण्याची पकड कायम ठेवणे किंवा लोकशाही मार्गाने पक्षातील अशोक गेहलोतांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवून पक्षाच्या पुनरूज्जीवनाचा प्रयत्न करणे हे विकल्प उरतात. मल्लिकार्जुन खडगे, सुशिलकुमार शिंदे, मुकुल वासनिक अशी जी मोजकी ज्येष्ठ मंडळी पक्षात आहेत, ती जरी राष्ट्रीय स्तरावर वावरली, तरी प्रादेशिक नेतेपदाच्या मर्यादा पार करून कधी राष्ट्रीय नेते बनूच शकलेली नाहीत. त्यामुळे राहुल यांच्याकडेच डोळे लावून कॉंग्रेसजन बसले आहेत.
पण राहुल यांना पक्षाध्यक्षपद स्वीकारून गांधी घराण्याची पकड पक्षावर कायम ठेवायची असेल तर त्यासाठी आधी पक्षजनांमध्ये स्वतःप्रती विश्वास निर्माण करावा लागेल. पूर्वीसारखी धरसोड वृत्ती करणार नाही हे दाखवावे लागेल. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्याआधी आपला मोडकळीला आलेला पक्ष सांधावा लागेल. भारतीय जनता पक्ष दिवसेंदिवस अधिकाधिक सुदृढ स्थितीमध्ये कॉंग्रेससमोरील आव्हान मोठे मोठे करताना दिसतो आहे. भाजपला मात देऊ शकतात ते ठिकठिकाणचे प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर. १३६ वर्षांची परंपरा सांगणारा कॉंग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष असूनही घसरणीलाच लागला आहे आणि ही घसरण थोपविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते राहुल गांधी अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत. आता पक्ष वाचवायचा असेल तर फार वेळ त्यांच्या हाताशी उरलेला नाही.