कोलवाळ येथील मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या काही वजनदार कैद्यांना पंचतारांकित दरात चिकन, मटण, मासळी व त्यांच्या आवडीचे अन्य खाद्यपदार्थ पुरवले जात असल्याचे जे कथित वृत्त आहे त्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यानी केली आहे.
या तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या ‘हाय प्रोफाईल’ कैद्यांना 7 हजार रुपयांत तंदुरी, 1 हजार रुपयांत फ्राईड राईस, 500 रु. मासळी अशा पंचतारांकित दरात अन्नाचा कथित पुरवठा केला जात असल्याचे वृत्त आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब चौकशीचे आदेश द्यावेत, अशी आपली मागणी असल्याचे काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे. त्याशिवाय ज्या कैद्यांना दूरचित्रवाणी संच हवा असेल त्यांना तो 15 हजार रु.त उपलब्ध करून दिला जात असल्याचेही पणजीकर यांनी म्हटले आहे.
राज्यातील मध्यवर्ती तुरुंगात सुरू असलेला हा अवैध व्यवहार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून यात गुंतलेल्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे पणजीकर यानी म्हटले आहेे. या सगळ्या कथित गैरव्यवहारांची स्वतंत्रपणे चौकशी केली जावी, असे पणजीकर यांनी म्हटले आहे. या कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी जावी, तसेच तुरुंगात कोण येतात जातात त्यांची माहिती गोळा केली जावी, तसेच स्वयंपाकघरातील रेशन कोठ्याची नोंदणी तसेच जो माल आणला केला त्यासंबंधीची कागदपत्रे आदीची माहिती गोळा केली जावी, अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे. त्याद्वारे सगळी माहिती उघड होणार असून त्याद्वारे संबंधितांना पकडून त्यांची चौकशी केली जावी असे पणजीकर यांनी म्हटले आहे.

