केसांपासून पायापर्यंत उपयोगी- मेथी

0
44
  • – डॉ. मनाली महेश पवार

अशा या बहुगुणी मेथीचा समावेश प्रत्येकाने आपल्या आहारात करावा. कडू आहे म्हणून वापरूच नये असे करू नये व अतिरेकही करू नये. कारण फायद्याप्रमाणे मेथीचा अतिरेक केल्यास दुष्परिणामही होऊ शकतात.

भारतीय आहारामध्ये मेथीचा उपयोग फक्त फोडणीपुरताच मर्यादित नाही. अनेक पदार्थांमध्ये एक मुख्य घटक म्हणूनदेखील मेथी वापरली जाते. मेथीचे सेवन स्वास्थ्यासाठी उत्तम आहे.

मेथी म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती मेथीची भाजी. जिथे मधुमेहाचे निदान झाले, तिथे मेथीची भाजी खायला सुरू. मेथीमध्ये जो थोडा कडवटपणा असतो तो डायबिटिस नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. मेथीच्या पानांची भजी, मेथीचे पराठे आदी स्वरुपातदेखील मेथीची पाने आहारात वापरली जातात. मेथीच्या पानांहूनही जास्त गुणकारी आरोग्यदायक मेथीचे दाणे (बिया) आहेत. त्यामुळे मेथीदाण्यांबद्दल विशेष माहिती असणे आवश्यक आहे.

मेथी हे थंड हवामानात पिकणारे पीक आहे व कमी दिवसांत तयार होणारे पीक आहे. मेथीच्या लागवडीसाठी मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. हिवाळ्याच्या दिवसांत पूर्वीचे लोक मेथीचे लाडू खायचे. प्रसूतीपश्‍चात स्त्रियांना स्तन्य येण्यासाठी मेथीचे लाडू, मेथीची पेज देण्याची अजूनही पद्धत आहे. त्याचप्रमाणे सांधेदुखीमध्येदेखील पौष्टिक म्हणून मेथीचे लाडू खायला देतात.

मेथीचे आरोग्यदायी फायदे
केसांसाठी उपयुक्त ः स्त्रियांचे सौंदर्य म्हटले की प्रथमदर्शनी लक्ष केसांवरच जातो. मऊ, मुलायम, काळेभोर, लांबसडक, घनदाट केस कुणाला आवडत नाहीत? केसांच्या स्वास्थ्यासाठी मेथीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. मेथीमध्ये असणारे प्रचूर मात्रेतील प्रोटीन केसांच्या वाढीसाठी, केसांच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरते.

  • मेथीमुळे केस गळती कमी होते. डोक्यात कोंडा होत नाही. केसांना घनदाट, मजबूत व निरोगी बनवते.
  • केसगळतीमध्ये मेथीची भाजी खावी.
  • मेथीच्या पानांचा रस किंवा मेथीचे दाणे भिजत घालून, ते फुगल्यावर वाटून बारीक पेस्ट करावी व ती केसांना लावावी. केस गळती कमी होते.
  • दोन चमचे मेथीच्या दाण्याची पेस्ट नारळाच्या दुधात घालावी व ती केसांना लावावी. साधारण दोन तास केसांना लावून ठेवावे व नंतर केस धुवावे. केस काळे होतात व गळणार नाहीत.
  • १ वाटी तेलात १ चमचा मेथीची पेस्ट किंवा २ चमचे मेथी दाणे टाकून चांगले शिजवावेत व हे तेल कोमट असता केसांच्या मुळाशी लावून मसाज करावा, केसातील कोंडा, केस गळती थांबते.

त्वचेकरिता ः मुलायम, नितळ कांती, चमकदार व मुरूम नसलेला चेहरा प्रत्येक स्त्रिला हवाहवासा वाटतो. मग अशी त्वचा प्राप्त करण्याकरिता काही उपाय तर करावेच लागतात. शरीराची त्वचा मुलायम बनवण्यासाठी मेथीच्या पानाचा रस काढून त्यात लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावा. यामुळे त्वचा चमकदार, मऊ व मुलायम होते.

  • मुरूमं जास्त प्रमाणात असल्यास रोज आंघोळीपूर्वी अर्धातास मेथीच्या दाण्यांची पेस्ट किंवा मेथीच्या पानांची पेस्ट लावा. हळूहळू पिंपल्स कमी होतात व लवकर येत नाहीत.
  • चेहर्‍यावरील काळे डाग घालवण्यासाठी मेथीची पेस्ट लिंबाच्या रसात मिसळून लावावी व मुरूमांमुळे चेहर्‍यावर जळजळ होत असल्यास मेथ्याची पेस्ट गुलाबपाण्यात कालवून लावावी.

रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरिता ः काही संशोधनानुसार मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईड्‌स सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायगयीसराईडचे शोषण टाळले जाते.

हृदयविकारामध्ये ः मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे हृदयाचे आरोग्य नियंत्रणात राहते. त्याचप्रमाणे मेथीमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे सोडियमच्या कार्यावर नियंत्रण राहते, ज्यामुळे हृदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रित करण्याकरिता ः मधुमेहींनी मेथीचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश करावा. फक्त अतिरेक मात्र करू नये. कारण अतिरेक झाल्यास तिक्त गुणाच्या वृद्धीने वात वाढू (दूषित) होऊ शकतो व रक्तातील साखर वाढू शकते. उचित मात्रेत मेथीचे सेवन केल्यास मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते. तसेच मेथीमधील अमिनो ऍसिड या घटकामुळे इन्शुलीनच्या निर्मितीसदेखील चालना मिळते.

पचनक्रियेकरिता ः मेथीमधील फायबर व ऍण्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व पचनास मदत होते. अपचन अथवा पोटदुखीवर मेथीचा चहा घेतल्यास आराम मिळतो. सकाळी उठल्यावर मेथीचा उकळलेला अर्क घेतल्यास बद्धकोष्टतेमध्ये फायदा होतो.

छातीत जळजळ होत असल्यास ः
छातीत जळजळ होत असल्यास एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवावेत व हे दाणे आहारात वापरावेत.

वजन कमी करण्याकरिता ः वजन कमी करण्याकरिता रात्रभर भिजत ठेवलेले मेथीचे दाणे सकाळी उपाशी पोटी चावून खावेत व पाणीही प्यावे.

स्तन्यांमध्ये वृद्धी करण्याकरिता ः
मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकामुळे आईच्या दुधाच्या प्रमाणात वाढ होते. म्हणून स्तन्यपान करणार्‍या प्रत्येक महिलेने मग ती नैसर्गिक प्रसूती असो वा ऑपरेशन झालेली प्रसूती असो- मेथीमुळे वात नियंत्रणात येतो. रक्तधातूची वाढ होते, भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन्स मिळते. म्हणून प्रसूताने किमान दहा महिने तरी मेथी खावी. त्यामध्ये मेथीचे लाडू (लाडू बनवताना मेथ्या थोड्या तुपावर भाजून त्याची पूड करून दोन दिवस तूपातच भिजत ठेवाव्यात, म्हणजे कडवटपणा जातो व रुचकर बनतात) मेथीची पेज, (मेथीची पेज करताना पेज पातळ असावी. तांदूळ कमी व मेथी जास्त असावी) मेथीच्या पानांची भाजी (मुख्यत्वे करून लसुणीची फोडणी देऊनच करावी), मेथीच्या दाण्यांना मोड आणून केलेली उसळ अशा विविध तर्‍हेने कोणत्या ना कोणत्या स्वरुपात प्रसूताने मेथी सेवन करावी.

मासिकपाळीच्या समस्यांकरिता ः मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन, आयसॉफ्लॅवेन्स, ऍस्ट्रोजिन या घटकांमुळे मासिक पाळीमध्ये आराम मिळतो. उष्णतेच्या समस्येमध्येदेखील आराम मिळतो.

कोलन कॅन्सरमध्ये ः मेथीमधील फायबर या घटकामुळे अन्नातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे कोलन कॅन्सर टाळण्यास मदत होते.

अशा या बहुगुणी मेथीचा समावेश प्रत्येकाने आपल्या आहारात करावा. कडू आहे म्हणून वापरूच नये असे करू नये व अतिरेकही करू नये. कारण फायद्याप्रमाणे मेथीचा अतिरेक केल्यास दुष्परिणामही होऊ शकतात.