Home बातम्या केसांचा टोप

केसांचा टोप

0

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे

तात्या टोपे, नाव ऐकलंत का? १८५७ च्या लढ्यातील एक स्वातंत्र्यसेनानी. त्याच्या डोक्यावरच्या टोपावरून त्यांना ते नाव पडले होते. पूर्वी टोप पुष्कळजण घालत असत. आता ते दुर्मिळ झाले आहेत. मला टोप घालायचाय! हो विचारा ना? आता तो टोप घालायचा बेत आहे म्हणजे? अहो तो टोप नव्हे… मला टोप घालयचा, तोही दररोज. ‘कलप’ या कथेत मी कलप लावायला सुरूवात केली. हिच्या काळ्याभोर केसांबरोबर माझ्या केसांचे तेव्हा मॅचिंग होत नव्हते ना! आता तर मामला आणखीनच गंभीर झालाय. कलप लावायला केस कमी पडलेत. टक्कल जास्त दिसायला लागले होते. आता बहुदा केसांचा नकली टोप घालावा लागणार!

पूर्वी मी शिक्षणासाठी माझ्या नातेवाईकाकडे रहात होतो. नेहमीप्रमाणे कामावरून घरचे मालक घरी परतायचे… दारावरची कडी वाजली. मालकिणीने दार उघडले… समोर अनोळखी माणूस… तिने म्हटले, ‘‘मालक अजून घरी आले नाहीत, मग या.’’ असे म्हणत तिने दार लावून घ्यायचा प्रयत्न केला, तोच तो अनोळखी माणूस हसतच आत घुसला. अग मीच तुझा मालक! ती तर चकितच झाली होती. मालक साठीतून अगदी पस्तीसीत उतररले होते. त्यांनी हळूच डोक्यावरचा टोप खाली काढला व ते साठीत परतले. डोक्यावरच्या टोपाने कमालच केली होती.

मागे मी परदेशात गेलो होतो. मॉलमध्ये फिरताना नकरी टोपांचे दुकान दिसले. नाना प्रकारचे, निरनिराळ्या रंगाचे टोप टांगले होते. वाटले होते आपणही एक घ्यावा. बरोबर मुलगा, सूनबाई पण होती. पण कुणीही टोप घ्यायचा मला आग्रह केला नाही. कुणाच्याही मनात किंचितसुद्धा तो विचार डोकावला नव्हता. ही तर मॅचिंगच्या ह्या गोष्टी करायची, पण याबाबत आमचे दोघांचे मॅचिंग होत नव्हते. ते तिला मॉलच्या झगमगाटात दिसले नाही. बाकीच्या दोघांना मी तर परफॅक्ट वाटत होतो. पण मला तरुण व्हायचे होते ना! म्हणजे मॅचिंग कसे परफेक्ट!! त्यावेळी टक्कलावर टोपी होती. त्यांची काहीही चूक नव्हती. टक्कल टोपीखाली लपले होते ना. तर मंडळी तरुण दिसायची संधी मी घालवली होती. माझा एक डॉक्टर मित्र म्हणायचा, टक्कल पडणे सगळ्यांच्याच नशिबी नसते. टक्कलावर म्हणे बायका भाळतात. टक्कलाच्या ह्या खासियतीवर मला गर्व वाटायचा. आपणही सर्वांना आपले टक्कल दाखवत राहायचे असे वाटायचे. पण हिच्याबरोबर बाहेर जाताना मॅचिंग नाही व्हायचे त्याचे काय?

याबाबत माझे एक डॉक्टर मित्र लकी होते. तरुण वयातच त्यांना टक्कल पडलेले. ते टोप वापरायचे. त्यांचा तो नकली टोप चटकन समजून जायचा. मी म्हणतो, गावठी टोप तो कशास घ्यायचा? बाकी राहिलेल्या केसांबरोबर अगदी मॅचिंग टोप घ्यायचा, अगदी फॉरेन… मग सगळे असली भासायचे. हल्ली कित्येक वर्षांनंतर परत ही वल्ली मला दररोज संध्याकाळी दिसते. त्यांची घरी जायची व मी घरी परतायची वेळ एकच. मला त्यांचे कौतुक वाटते व भयही. कारण मोटारसायकलवरून जाताना ते हेल्मेट घालत नाहीत. माझी हेल्मेटवरची कथा बहुदा त्यांनी वाचली नसावी. एवढा वारा वाहतो की त्या वार्‍याबरोबर दोन चाकीवाल्यांच्या टोप्या उडून जात असतात. हां, त्यांचा टोप उडाला तर… तर परिस्थिती बिकट व्हायची. आज त्यांच्या डोक्यावर हेल्मेट होते… व माझी भिती दूर झाली. पूर्वी इस्पितळात रात्रपाळीवर असताना त्यांची चांगलीच पंचाईत व्हायची. झोपताना टोप तर काढावाच लागायचा. मग इमर्जन्सी केस आली तर चांगलीच त्यांना दहा मिनिटे लागायची… कारण डोक्यावर तो टोप बसवता वेळ निघून जायची. एके दिवशी तर टोप वाकडा लागलेला.. पोट धरून रडणारा पेशंट… त्यांना बघून आपले रडे विसरला… नर्स डॉक्टरकडे बघतच राहिली. डॉक्टराना काहीतरी चुकल्यासारखे वाटले. ते धावतच रूमवर परतले… टोप नीट करूनच मग ते वार्डात परतले.

मला राकेश रोशनचे नेहमी कौतुक वाटते. त्याचे टक्कल पाहून हल्लीच मला समजले, की हा नट गेली कित्येक वर्षे टोप घालूनच नायिकांमागे नाचत-धावत होता… खलनायकाबरोबर हाणामारी करायचा… तेव्हा त्याचा तो केसांचा टोप जाग्यावरचा हललाही नव्हता. टोप अगदी नैसर्गिक वाटायचा.

आमचे एक डॉक्टर मित्र तर डोक्यावरचा टोप वजन ठेवल्यागत चालायचे. डोक्यावर टोप आल्यापासून त्यांचे चालणे एवढे बदलले की ते टक् टक् टक् चालायला लागले. त्यांचे चालणे कृत्रिम वाटायचे. त्यांच्या चालण्यामुळेच त्यांचा तो टोप चटकन् लक्षात यायचा. तो टोप आपले अस्तित्व विसरला होता… पण त्या डॉक्टरना त्याचा अजूनपर्यंत विसर पडला नव्हता.

मी म्हणतो, आम्ही माझ्या टक्कलाविषयी बोलतो ना? मग एवढा वेळ आपण दुसर्‍याच्या टक्कलाचा विचार तो का करावा? स्वत:ला टोप घालावयाचा… दुसर्‍यांना टोपी नाही. उगाचच हात डोक्यावर म्हणजे टक्कलावर गेला. त्या डॉक्टरसारखा टोप वार्‍यावर उडाला तर! नाहीतर हेल्मेट काढतेवेळी निघाला तर? हां, आयडिया छान होती. फॅव्हिकलने टोप डायरेक्ट टक्कलावर चिकटला तर! त्या दुसर्‍या डॉक्टरासारखे टोप घातल्यावर डोके ओझे घेतल्यासारखे… टक्‌टक् चालावे लागणार?

कितीतरी प्रश्‍न डोळ्यांसमोर थुईथुई नाचत होते. डोक्यावरचे संकट डोळ्यासमोर उभे ठाकले होते. त्या डॉक्टर मित्राचे टक्कलावरचे सुभाषित… तो टक्कलाचा वेगळेपणा… हळूहळू त्याचे म्हणणे मला पटू लागले होते. मॅचिंगचा विचार बाजूला ठेवायला हवा. नाही तर टोपाला सांभाळता सांभाळता डोक्यावर अर्थात टक्कलावर हात मारायची वेळ यायची!

…………..