केरी-सत्तरीला वादळाचा जबरदस्त तडाखा बसला असून बागायती तसेच सरकारी मालमत्तेची लाखो रुपयांची हानी झाली आहे.
काल दुपारी ३ वाजता मुसळधार पावसाबरोबर वादळ होऊन केरी गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकर्यांच्या बागायतीत केळी, सुपारी झाडाची पडझड झाली.
केरी येथील बी.एस.एन.एल एक्सेंजवर दोन सुरूची झाडे पडल्याने सुमारे १० लाख रुपयांची हानी झाली. तसेच आयडीया टॉवरवर सुरूची झाडे पडल्याने १४ लाख रुपयांचे नुसकसान झाले. अबकारी खात्याच्या गेट जवळ महेश गावस यांच्या घरावर सागवान झाड पडून २० हजार रुपयांचे नुकसान झाले. शिरोली केरी येथे भगवान शेटकर यांच्या घरावर झाड पडून सुमारे ३ हजार कौले व इतर साहित्य मिळून ८० हजार रुपयांची हानी झाली.
आजोबा देवस्थानजवळ झाड पडल्याने वीज वाहिनी तुटून पडली. केरी परिसरात २० ठिकाणी विजेचे खांब कोसळून पडले आहेत. सुमारे तीन तास गोवा-बेळगाव रस्ता ठप्प झाला होता. पावसाचा जोर संपूर्ण दिवस कायम होता. केरी-सत्तरीत झालेल्या वादळामुळे शेतकर्यांना जबरदस्त फटका बसला आहे. बागायतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. गेले आठ दिवस पाऊस थांबून येत होता पण काल सकाळपासून पावसाने बराच जोर धरला. त्यामुळे सत्तरीतील इतर भागातही मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. वाळपई जिथे आदर हॉटेल, लेको गोपीनाथ तेली यांच्या मालकीच्या हॉटेलवर झाड पडून १० हजार रुपयांची नुकसानी झाली. केरी येथील वादळामुळे झालेले सर्व अडथळे वाळपई आग्निशामक दलाचे अधिकारी हरूण माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली ८ अग्निशामक जवान व १८ कामगार आज उशीरापर्यंत प्रयत्न करीत होते.
केरी वादळाचा चोर्ला बेळगाव महामार्गावर परिणाम जाणवला असून त्या मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.