केरी-सत्तरी येथील टोल नाक्यावर काल रात्री १२.३० च्या सुमारास गोप्रेमींच्या जागृतीमुळे बेळगाव येथून आणलेले ३ टन गोमांस जप्त करण्यात आले. प्राणीमित्र अमृतसिंह व त्यांचे सहकारी फोंडू राणे, विराज नाईक, संतोष गावस यांनी पोलिसांच्या मदतीने ही कामगिरी केली. हे गोमांस म्हापसा व मडगाव येथे नेण्यात येत होते.बेळगाव येथून गोमांस आणले जात असल्याची माहिती अमृतसिंह यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकार्यांसमवेत टोल नाक्याजवळ सापळा रचला. प्रथम एक गाडी अडवून पोलिसांना माहिती दिल्यानंतर गाडीतील चालकाने आणखी एक गाडी मागून येत असल्याचे सांगितले. त्यानुसार दुसरी गाडी १ वाजता केरी नाक्यार पोहचताच ती गाडीही वाळपई पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानकावर आणली. त्यावेळी नाणूस गोशाळेचे कार्यकर्ते लक्ष्मण जोशी, अमृतसिंह व सहकारी दाखल झाले.
गाडीच्या चालकाने सदर गोमांस बेळगाव येथील कॅम्पमधून आणल्याचे सांगून प्रमाणपत्रही सादर केले. सदर प्रमाणपत्रावर डॉ. शशिधर नाडागौडा या पशुवैद्य अधिकार्याची सही व शिक्का असून प्रमाणपत्र आर. ए. चौधरी नावाच्या व्यक्तीला देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण ते प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा अमृतसिंह यांनी केला आहे.
यावेळी पशुवैद्यांना बोलावून तपासणी केली असता मडगाव येथे नेणारे मांस खाण्यायोग्य तर म्हापसा येथे नेण्यात येणारे खाण्यायोग्य नसल्याचा अहवाल त्यांनी दिला. त्यामुळे मडगावला वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी सोडून दिले. मात्र, म्हापसा येथे पुरवठा करणारी गाडी जप्त करून इम्तियाज अब्दुल कोतवाल (डिचोली) व मलीक खालाल बेपारी (बेळगाव) या दोघांना अटक करून नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. बेळगावच्या वैद्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात ९ बैल असल्याचे लिहिले होते. मात्र, जप्त केलेल्या गाडीत १० प्राण्यांची मुंडकी सापडली आहेत. यावरून प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, काल सायंकाळी वाळपईत कचरा प्रकल्प जागेत जेसीबी मशीनद्वारे खड्डा खोदून जप्त केलेल्या गाडीतील गोमांस पुरण्यात आले. यावेळी पोलिसांसमवेत गोप्रेमी शांती मणेरकर, लक्ष्मण जोशी उपस्थित होते. वाळपई पालिका कामगारांच्या सहाय्याने मांसाची विल्हेवाट लावण्यात आली.

