केरी–सत्तरी दोन माड परिसरातील सहा दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व वस्तू चोरून नेल्या. मिळालेल्या माहितीप्रमाणे शुक्रवारी रात्री ११ नंतर चोरट्यांनी हे काम केले. रात्री पाऊस भरपूर पडत असल्याने दुकाने जरा लवकरच बंद केली गेली होती व सर्व रोख रक्कम आतच ठेवून काही जण मासे पकडायला गेले.
सकाळी दुकानदार आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता दुकाने फोडल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यावेळी ताबडतोब केरी पोलीस स्थानकावर कळविले. पण ७.३० च्या दरम्यान कळवूनही पोलीस १० पर्यंत आले नाहीत व पोलीस आल्यानंतर योग्य पद्धतीने तपास करायला सुरुवात केली नाही असे दुकानदारांचे म्हणणे आहे. ते आल्यावर साधा पंचनामा सुद्धा तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना लिहिता आला नसल्याचे तेथील दुकानदार चंद्रकांत परब यांनी सांगितले. चोरी झालेल्यांमध्ये चंद्रकांत परब यांच्या दुकानातील फक्त संगणक वाचले. लाडू कुष्टा गावस यांच्या दुकानातील रोख चारशे रुपये व पाच हजार रुपयांची सिगारेट पाकिटे, याह्या करोल यांच्या दुकानाला पत्र्याचे रूफिंग असल्याने त्यांना आत उतरता आले नाही. त्यांनी आत उतरण्याचा प्रयत्न केला. गोविंद मोहन गावस यांच्या दुकानातील सहा हजार रुपये रोख व सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये रोख लंपास केले. अल्ताफ सय्यद यांच्या दुकानातील तीस हजार रोख रुपये,व दहा हजार रुपयांची सिगारेट पाकिटे,तसेच श्याम गावस यांच्या दुकानातील बर्याच वस्तू गायब केल्या. श्वान पथकाच्या सहाय्याने माग काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण यश आले नाही. पोलीस निरीक्षक उदय गावडे, तुळशीदास गावस, लक्ष्मण परब, सुलेश नाईक हजर होते.