केरी मतदारसंघात भाजपला अभूतपूर्व यश

0
14

जिल्हा पंचायत निवडणूक; नीलेश परवार 13264 मतांनी विजयी

केरी पंचायत निवडणुकीमध्ये भाजपने अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे. भाजपाचे उमेदवार नीलेश परवार यांनी 12128 मतांची आघाडी घेऊन या ठिकाणी विजयी होण्याचा मान मिळविला. त्यांनी विरोधकावर मात करून मिळविलेल्या यशाबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांनी अभिनंदन केले आहे.

केरी जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये भाजपतर्फे नीलेश परवार काँग्रेस पक्षातर्फे आयुष्य केरकर आम आदमी पक्षातर्फे नावसो जाधव उमेदवार रिंगणात होते. या पंचायतीमध्ये एकूण चार ग्रामपंचायतीचा समावेश आहे. केरी, मोर्ले म्हाऊस व ठाणे या चार ग्रामपंचायतीमधून सर्वच मतदान केंद्रामधून भाजपला सातत्याने आघाडी मिळाली.

पहिल्या फेरीमध्ये भाजपला सुमारे 6000 पेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या फेरीमध्ये ही आघाडी कायम राखत निलेश परवार यांनी विजय संपादन केला.

मिळालेले मतदान पुढील प्रमाणे. भाजपच्या नीलेश परवार यांना 13264 मते, काँग्रेसच्या आयुष्य केरकर यांना 1136 तर आपच्या नावाचे जाधव यांना फक्त 457 मतावर समाधान मानावे लागले.

विजयी उमेदवार नीलेश परवार यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वांनी मेहनतीने काम केल्यामुळे हा यश संपादन झाले आहे. भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये विकासाच्याबाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही. जनतेच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले आहे. या भागाच्या लोकप्रतिनिधी आमदार डॉ. दिव्या राणे सातत्याने जनतेची संवाद साधून विकासाच्या बाबतीत सातत्याने सकारात्मक पावले उचलली असून त्यामुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.