केरीत शिंगाडी मृतावस्थेत सापडले

0
63

अज्ञातांनी शिंगे कापून नेली

केरी येथील अंजुणे धरण परिसरात (हरण) सांबर कुळातील शिंगाडी (नर) या वन्य प्राण्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याच्या मृत्यूनंतर अज्ञातांनी एक्सो ब्लेडच्या साहाय्याने त्यांची शिंगे कापून नेल्याचे आढळून आले असून या प्रकरणी वन अधिकारी तपासकामात गुंतलेले आहेत.

म्हादई अभयारण्याच्या जवळच असलेल्या काजू बागायतीत वीज तारा गेलेल्या असून काजूची झाडे वाहिन्यांना लागलेली होती. रान कुत्रे शिंगाडीच्या मागावर असताना या वीज तारांना झाडांना स्पर्श झालेला असताना शिंगाडीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर त्याची दोन्ही शिंगे अज्ञाताना धारदार ब्लेडच्या वापर करून कापून नेल्याचे उघडकीस आले.

सदर घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी परेश परब व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाली व त्यांनी या ठिकाणी पाहणी केली असता हा शिंगे कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. पशू वैद्यक डॉ. नरेंद्र नाईक यांनी शिंगाडीची शवचिकित्सा केली असता विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

या ठिकाणी पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी सांगितले की, ही घटना आजच घडलेली असून प्रत्यक्ष पाहणी केली असता त्याच्या नाकातून फेस येत असल्याचे केरकर यांनी सांगितले.

सदर शिंगाडी हे पूर्ण विकसित असून या परिसरात रान कुत्रे व इतर श्‍वापदांचा वावर वाढलेला असून रानकुत्र्यांनी पाठलाग केला असावा. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी लोकवस्तीच्या आसपास वावरत असून चोर्ला मार्गे वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने वन्यप्राणीही बिथरले आहेत. वीज खात्याच्या बेपर्वाईमुळेच हा अपघात झाला असून काजू बागायतींवरून जाणार्‍या वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. या प्रकरणी परेश परब यांनी पंचनामा करून शववविच्छेदनानंतर तर शिंगाडीला जाळण्यात आल्याचे सांगितले. या प्राण्याची शिंगे मौल्यवान असून बाजारपेठेत त्याची किंमत ४० ते ५० हजारांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. १५ दिवसांपूर्वी विर्डी सीमेवर शिरोडा येथे एक सांबर मृतावस्थेत आढळले होते.