Home बातम्या केप्यात आठ लाखांची घरफोडी

केप्यात आठ लाखांची घरफोडी

0

आमोणे-केपे येथील प्रकाश आमोणकर यांच्या बंद असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी मागील दारातून प्रवेश करून आठ लाखांचा ऐवज लंपास केला. मागील काही दिवसांपूर्वी शिवनगर येथे घडलेल्या चोरीत व या चोरीत साम्य असल्याचा पोलीस अधिकार्‍यांचा कयास आहे. सदर घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.

प्रकाश आमोणकर यांचे पुत्र चंदन याने केपे पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे की अज्ञात चोरट्यांनी घराचे मागील दार फोडून घरात प्रवेश केला व घरातील तीन कपाटे फोडली व त्यात असलेले सोन्याच्या पाटली, बांगड्या, भांगतिळे, साखळी व माश्कोद मिळून एकूण आठ लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याचे नमूद केले आहे.

प्रकाश आमोणकर यांचे पुत्र चंदन व सून नोकरी करतात तर दुसरा पुत्र बोटीवर काम करतो. तो सध्या घरी आलेला आहे. तो आपल्या वडिलांसमवेत काणकोणला गेला होता. त्यामुळे घर बंद होते. चंदन जेव्हा सव्वासातच्या सुमारास घरी परतला त्यावेळी त्याला घराला कुलूप असल्याचे आढळले. त्याने आपल्या भावाला फोन केला तेव्हा त्याने आपण वडिलांसमवेत काणकोणला असल्याचे त्याला सांगितले. त्याने सहज घराच्या मागील दारापाशी जाऊन बघितले असता त्याला दार फोडलेले आढळले. त्याने घरात प्रवेश केला तेव्हा त्याला वरील चोरीचा प्रकार समजला. त्याने त्वरित केपे पोलिसात तक्रार नोंदवली. केपेचे पोलीस उपअधीक्षक उमेश गावकर, निरीक्षक शिवराम वायंगणकर, कुडचडेचे पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर, सांगेचे पोलीस निरीक्षक गुरुदास गावडे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांची मदत घेऊन तपास घेण्याचा प्रयत्न केला. श्‍वानपथक घरापासून १०० मीटर असलेल्या रस्त्यापर्यंत गेले व तेथून परतले. सदर घटना घडली त्या सुमारास सफेद रंगाच्या लाल पट्टे असलेल्या यामहा एफ. जी. मोटरसायकल वरून दोघेजण त्या भागात वावरत होते व ते सामंत यांच्या घराची विचारपूस करीत असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवनगर भागातही अशाच प्रकारची चोरी करून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज चोरला होता. त्यावेळीही अशाच रंगाच्या मोटर सायकलवरून संशयास्पदरित्या फिरणारे दोघेजण सामंत यांच्याच घराची विचारपूस करीत होते, असे पोलिसांना आढळून आले आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी मोटरसायकलचा नंबर कोणीही लक्षात ठेवला नाही. मात्र त्यांचे चेहरे लक्षात असल्याचे या पहाणार्‍या लोकांनी पोलिसांना सांगितले. अशा प्रकारची चोरी करणार्‍या काही चोरट्यांना केपे पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला. पण त्यांची ओळख पहाणार्‍या लोकांकडून पटली नाही. केपेचे पोलीस उपअधीक्षक गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केपे पोलीस तपास करीत आहेत.