राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नव्या योजना राबविण्याच्या दृष्टीकोनातून केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव राजसिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कृषी खात्याच्या अधिकार्यांशी बैठक घेऊन विविध नव्या योजनांवर चर्चा केली. कृषी उत्पादनात वाढ व्हावी या हेतूनेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये नव्या योजना राबविण्याचे ठरविले आहे.
सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येथील कृषी प्रकल्पांची पहाणी करण्याचे काम केले. कृषी मंत्रालयाच्या खाली पशुसंवर्धन, मच्छीमारी येत असल्याने या क्षेत्रातही नव्या योजना राबविण्यावर चर्चा करण्यात आली. कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या केंद्र सरकारच्या योजनांवर अधिक भर असेल, असे कृषी संचालक सतीश तेंडुलकर यांनी सांगितले. येथील समुद्रात मोठा पिंजरा करून मत्स्य उत्पादन करण्याच्या अडीज कोटी रुपयांच्या योजनेस यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. वरील योजनेच्या अंमलबजावणीसाठीची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ करण्यास या योजनेची मदत होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही कृषी उत्पादनात वाढ करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. खाण व्यवसाय बंद असल्याने अनेक जण शेतीकडे वळले आहेत. त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे सरकारने ठरविले आहे.