केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजप सरकारविरुद्ध तक्रार

0
18

>> छळवणूक करत असल्याचा कॉंग्रेस, गोवा फॉरवर्डचा आरोप

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपच्या काळजीवाहू सरकारने कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उमेदवारांबरोबरच अन्य विरोधी पक्षांच्या उमेदवारांनाही पोलिसी बळाचा वापर करून छळण्यास सुरुवात केली असल्याची तक्रार कॉंग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर व गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर, तसेच अन्य काही विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर खोटे गुन्हे नोंद करण्यासाठी भाजप सरकार पोलिसांवर दबाव आणत आहे. खोटे गुन्हे नोंद करून जबाब नोंदवून घेण्यासाठी तसेच चौकशीसाठी त्यांना पोलीस स्थानकावर बोलावून घेऊन तासनतास् त्यांना तेथे स्थानबद्ध करून ठेवले जाते, त्यांचा मानसिक छळ केला जातो, हा भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमच्या उमेदवारांची प्रतिमा खराब करण्याचा हा डाव आहे. निवडणुका या भयमुक्त वातावरणात व्हायला हव्यात; मात्र मतदारांच्या मनात आमच्या उमेदवारांविषयी संशयाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी हे सगळे केले जात आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.