केंद्राकडून 100 रुपयांचे खास नाणे जारी होणार

0
11

>> ‘मन की बात’च्या 100 व्या भागाचे औचित्य; विशेष स्वरूपाची रचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100 व्या भागानिमित्त केंद्र सरकारने 100 रुपयांचे नाणे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे.
रजत, तांबे, निकेल आणि जस्त या चार धातूंपासून हे 44 मिलीमीटरचे 100 रुपयांचे गोलाकार नाणे बनवण्यात आले आहे. नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभ असणार आहे. त्याच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले असेल. डाव्या बाजूस देवनागरीमध्ये ‘भारत’, तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ असे लिहिलेले असेल.

नाण्याच्या मागच्या बाजूला ‘मन की बात’च्या 100 व्या भागाचे प्रतीक असलेले खास चिन्ह असणार आहे. मायक्रोफोनचे चित्र आणि त्यावर 2023 असे लिहिलेले असेल. तसेच या चित्राच्या वरच्या बाजूला देवनागरी आणि इंग्रजीतही ‘मन की बात 100′ असे लिहिलेले असेल.
नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाची देशभरात चर्चा आहे. तसेच परदेशात देखील या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. 100 व्या भागात ‘पद्म भूषण’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या दिग्गजांचा सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत आपल्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यासाठी भाजप 30 एप्रिलपासून भव्य प्रचाराला सुरुवात करणार आहे. मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या 100 व्या भागाने याचा शुभारंभ होईल.